आकाशातून खाली कोसळणाऱ्या थेंबाप्रमाणे कधीकधी माणसावरही अशी वेळ येते आणि तो अपयशाने खचून जातो आणि आणखी दुःखात राहतो . ज्याप्रमाणे वरून येणाऱ्या प्रत्येक थेंबाला मातीत विलीन व्हायचेच असते त्याचप्रमाणे जन्मलेल्या प्रत्येकाला कधीतरी मृत्यूला सामोरे जावे लागतेच . अशावेळी परिस्थितीने खचून गेलेला एक आधार शोधत असतो .त्यला वाटत असते कि थोडे आणखी जगावे ,आनंद अनुभवावा, इतरांसाठी आपल्या जीवनाचा उपयोग करून या जीवनाचे सार्थक करावे. आणि अशावेळी एका इवल्याशा गवताच्या पात्याचा आधारही अगदी हवाहवासा वाटतो . आणि त्या पात्यासोबत वाऱ्यासोबत आनंदाचे झोके घेत जीवन जगण्याची एक वेगळीच कला असते . आणि यातूनच एक नवे नाते जन्माला येते. उन्हात हाच थेंब आकाशातील इंद्रधनुष्यासारखा सप्तरंगांत चमकत प्रत्येकाचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरतो .पण कधीतरी पावलांना आणि नेत्रांना सुखद स्पर्श देत तो पात्यावरून खाली ओघळत जातो आणि जीवनाचे सार्थक झाल्याच्या समाधानाने मातीत विलीन होतो. पाते मात्र या नात्याच्या सहवासाने आणखी ताजे आणि उत्साही होवून नवीन नात्याच्या शोधत वाऱ्यासोबत परत डोलत राहते.
कोसळणाऱ्या पावसासोबत
पार वरून येणाऱ्या थेंबाला वाटे ।
झेलावे असे कुणीतरी
आणखी थोडेसे जीवन जगावे ।।
वाऱ्या-पावसात मुग्ध डोलताना
अलगद झेलून घेई इवलेसे गवताचे पाते ।
भुईमध्ये विलीन होण्या आधी
झालेली ही भेट जन्मते एक नवे नाते ।।
ढगांच्या पसाऱ्यातून वाट काढत
झेप घेत येई खाली दिवे प्रकाशाचे ।
दिसते आकाशी सप्तरंगी कमान
भाग्य उजळले चमचमणाऱ्या थेंबांचे ।।
गवताच्या पात्यावर डोलताना
थेंब सप्तरंगी दवाचे रूप घेते ।
नेत्रांना सुखद इशारा देणाऱ्या
त्या थेंबाचे मन भरून कौतुक होते ।।
पावलांना सौम्य-शीत -सुखस्पर्श देत
हळूच ते पात्यावरून खाली ओघळते ।
गवताचे पाते पांघरून आठवणींच्या खुणा
डोलते परत वाऱ्यासोबत शोधत नवे नाते ।।
- रुपाली ठोंबरे .