आयुष्य कसे असते ना ?
एखाद्याच्या येण्याने
एखादा सामान्य दिवससुद्धा
सोन्याच्या शुभेच्छांनी फुलून येतो
आणि
एखाद्याच्या जाण्याने
तोच सोनेरी दिवस सुद्धा
सामान्य कदाचित मातीमोल बनून जातो
- रुपाली ठोंबरे .
पाहुनि या लोचनी ऐकुनि नाना ध्वनी, तरंग उठले अंगावरी त्या मुग्ध स्पर्शातुनी, गंधित होते सारे फुलता ती रातराणी, चांदण्या राती भेटता दो मधूर एका क्षणी, कधी ओठांवरी हासू कधी नयनी पाणी, स्मरता अताशा पुनर्जन्मल्या आठवणी, कधी रेखाटल्या रेषा कधी शब्दरुपातुनी, साकारले चित्र जे अनुभवले या कवीमनी, जे न देखिले कधी स्वप्नी, ते भाव सारे आज उमटले मनी …
ढग दाटून येतात , मन वाहुनी नेतातपावसाळा आला कि माझ्याही मनात आठवणींचे पूर वाहू लागतात. पण खरा पाऊस आठवतो तो बालपणीचा. १०० पैकी ९० जणांना बालपणीच्या पावसाची आठवण अधिक प्रिय असेल. बालपणी ' ये रे ये रे पावसा' किंवा 'ये ग ये ग सरी ' म्हणत येणारा पाऊस अजूनही हृदयाच्या एका कप्प्यात कोसळत असतो. त्यात कधीतरी सोडलेली इवलीशी नाव आजही मनाच्या तरंगांत तशीच हेलकावे खात पुढे जात असते.त्याकाळचा पावसाळा काही औरच असायचा. कारण तेव्हा या पावसाळ्यात शाळा नव्याने सुरु होत एका मोठ्या सुट्टीनंतर, त्याआधी ३ महिने ना कोणता क्लास ना अभ्यास आणि एक वैशिष्ट्य म्हणजे जुनेच सखे सोबती तेव्हा नव्याने भेटत. आता सारखे कुठलेही संवादाचे माध्यम तेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत उपलब्ध नसे, ना तंत्रज्ञानाच्या हव्याहव्याशा वाटणाऱ्या इतर निरर्थक गोष्टी आणि म्हणून या मोठ्या सुट्टीनंतर रिमझिमणाऱ्या पावसात होणारी अशी ही भेट सर्वानाच लाखमोलाची वाटे जी आजच्या युगात तर दुर्मिळच झाली आहे. गडगडणारा पाऊस असो वा थांबत थांबत येणारा रिमझिम पाऊस...बाल्यातला तो एक अनोखा आणि प्रिय छंद प्रत्येकासाठीच. पाऊस आणि शाळा सुरु होताच मातीच्या सुगंधासोबत आणखी एक गंध आम्हां बालमनांना भारावून टाकत असे... तो म्हणजे नव्या करकरीत पुस्तकांचा एक वेगळाच हवाहवासा वाटणारा नवा सुवास. आजही आठवते मराठीच्या पाठयपुस्तकातली ती पहिली कविता पावसाची ' गवताचे पाते , वाऱ्यावर डोलते' किंवा ' श्रावण मासी हर्ष मानसी '... आणि तीसोबतच मोठ्या जोमाने सुरु होणारा आमचा नवा अभ्यासक्रम.खूप सुंदर आणि हवेहवेसे ते सारे दिवस...आठवणींच्या खाणींमध्ये आजपर्यंत दडवून ठेवलेले. पण त्यावेळचे एक अजूनही न उलगडलेले कोडे म्हणजे कितीतरी वेळ आकाशात दडून बसलेला हा पाऊस नेमका आमची शाळा भरण्याची किंवा सुटण्याची वेळ झाली कि कसा अचानक प्रकट व्हायचा कोण जाणे? कदाचित आम्हां बालमनांना रिझवण्यासाठी... ते बाल्यातले दिवस चिंब चिंब भिजवण्यासाठी.त्या भिजण्यात आजारी पडण्याची भीतीही नसे आणि कोणाची ओरड खाण्याची तमाही नसे. आपल्याच मस्तीत धुंद करत असे तो पाऊस आणि आम्हीसुद्धा बेधडक स्वतःला त्याच्यात सामील करण्यासाठी सदा तत्पर असायचो. आजही रेनकोट घातलेल्या लहान मुलांना ओढत शाळेत घेऊन जाणाऱ्या आयांना पाहिले कि मला मी, माझी आई आणि माझा भाऊ समोर पावसात चालताना दिसतात...निळ्या-गुलाबी रेनकोटमधले बहीणभाऊ उगाच पावसाच्या पाण्याने भरलेल्या छोट्या छोट्या तळ्यांमध्ये उड्या मारणारे... आईची छत्री पागोळ्यांतून येणाऱ्या पाऊसधारेत गर्र्कन फिरवणारे...गरम गरम भजी खात घरासमोर साचलेल्या कमरेपर्यंतच्या पाण्यात लोकांची होणारी मज्जा पाहणारे...फणस घरी आणले कि भर पावसासोबत त्यातील गरे काढून खाणारे...जरा नेहमीपेक्षा जास्त पाणी साचले कि सुट्टीसाठी आतुरलेले. अशा एक ना हजार बालआठवणी...आणि त्यांत मीही आज भिजते आहे...समोरच्या रिमझिम पावसाला एकटक पाहत...अनावधानाने कानांवर येणारे एफ एम वरचे नव्या पिढीचे पावसाळी बालगीत ऐकत,
ऋतू पावसाळी सोळा थेंब होऊनि गातात
झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची
सर येते... माझ्यात !
अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ
ढगाला उन्हाची केवढी झळ
थोडी न थोडकी लागली फार
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार....
अनुरागाचें थेंब झेलती प्रीत-लतेची पानेअसा हा कधी टप टप थेंब वाजवत, कधी धो धो कोसळणारा पाऊस घराघरांवर, कौलारांवर, पानांवर बरसतो आणि मनामनांत एक नवे वेगळेच नाते वसवतो. जुन्या आठवणींना आठवतो आणि नव्या आठवणींना घडवतो... असा हा आबालवृद्धांच्या जीवाभावाचा लाडका पाऊस...
तुझ्या नि माझ्या भेटीमधुनी फुलते धुंद तराणे
तो येतो आणिक जातो
येताना कधी ओलेती आठवण आणितो
अन जाताना नवती आठवण देऊन जातो...
नभ मेघांनी आक्रमिले ।तेव्हा या आसमंती आता एका काळ्या चादरीविना काही उरले नाही पण थोड्याच वेळात ती चादर फाटेल आणि कुबेराचा तारांगणाहूनही दिव्य खजिना तुझ्या आसपासच बरसेल. तू जरा धीर धर.
तारांगण सर्वही झाकून गेले ।।
कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आलाश्रीधर फडकेंच्या शब्दांनी माळलेले हे गीत सुरेश वाडकरांच्या स्वरांत रेडिओवर वाजत होते. आणि या क्षणापासून पृथ्वीवर सुरु झालेला हा जलसोहळा पाहून मनात दाटलेल्या भावनांतून एकाच वेळी कितीतरी गाणी ओठांतून झरू लागली.
कधी टपोर्या थेंबांचा आला ऋतू आला