प्रवास रोजचा …भाग १
सकाळचे ७. २५
झाले
आहेत . जानेवारी महिन्याची अगदी
आल्हाददायक थंडी पसरली
आहे. आणि मी जणू या थंड
वातावरणात अतिशय वेगात जुने
क्षण मागे सारत
पुढे पुढे तरंगत
धावत आहे. वेगाच्या
उलट दिशेने येणारा
गार वारा उगाचच
अंगाशी बिलगून त्रास देतो
आहे. वाऱ्याचे एक वेगळेच गायन
सुरु आहे. आकाशात सूर्याची लाली
आता उतरते आहे
आणि कोवळ्या
सोनेरी उन्हाची चादर जग
पांघरत आहे . आकाशात पक्षी
असो वा जमिनीवर
माणूस ,सर्व अगदी
लगबगीने घराबाहेर पडत आहेत.
माझ्या एका बाजूला
घरे-इमारती ,रस्ते,झाडे,डोंगर
सारे सारे जगच
म्हणा उलट दिशेला
पळताहेत. आणि मी
धावते आहे एका
प्रचंड गर्दीसोबत. माझ्या एका
बाजूला क्षणाक्षणाला
डोळ्यांसमोर नवे चित्र
रेखाटले जात आहे
तर दुसऱ्या बाजूला
रोजचेच तेच ते
चित्र नव्या रंगानी
भरलेले आहे .तिच
बायकांची गर्दी,तोच कोलाहल
,काही अनोळखी तर
काही ओळखीचे तसेच
चेहरे ,तेच भाव
…. हेच सर्व मी
रोज अनुभवते जेव्हा
चढते मुंबईच्या लोकलच्या
लेडीज डब्यामध्ये. बाहेर
पक्ष्यांचा किलबिलाट आणि आत
बायकांचा कलकलाट अशा क्षितिजावर
उभी आहे मी.
मागच्याच स्टेशन वर कशीबशी
चढून मी
दोन पायांपुरती जागा
मिळवण्यात यश संपादन
केले असले तरी
या महिलांच्या घोळक्यातून
वाट काढत पुढे
सुरक्षित जागी पोहोचणे
ही दुसरी पायरी
आहे. आणि त्यासाठीच
मीही सुरु असलेल्या
चढाओढीत सहभागी झाले. पुढे
जावून बसायला योग्य
जागा मिळवणे आणि
नंतर अगदी सुरक्षितपणे
हव्या त्या स्टेशनवर
उतरणे हे टप्पे
गाठायचे असतात. आणि हेच
उद्दिष्ट या डब्यात
चढणाऱ्या प्रत्येकीचे असते. माझ्या
मागे अगदी दरवाजावर २ लहान मुले होती ज़ेमतेंम १०-१२ वर्षांचीं. म्हटले यांना वाट काढुन
आत जावू द्यावे तर त्यांना तिथेच आनंद मिळत होता.सर्रास एक हात आणि एक पाय हवेत सोडून
गाडीच्या बाहेर अगदी अर्धे शरीर झोकून दिले होते . त्यांना पाहून आपल्यालाच भीती वाटेल
पण त्यांना काही फरक नाही.
केवढासा तो डबा.
ज़ेमतेम १५ बसण्यासाठी
आणि २० उभ्या
राहू शकतील एवढी
जागा. पण या
क्षणाला पहिले कि माणसाने मनात
आणले तर अशक्य
ते शक्य कसे
साध्य करता येते
हे प्रत्ययास येते.
क्षमतेपेक्षा जवळजवळ दुप्पट-तिप्पट
ताफा घेवून हा
लोहरथ त्याच्या कमी-अधिक वेगात
सरळ तर कधी
नागमोडी वळणे घेत
प्रत्येक टप्पा गाठत पुढे
जात आहे. नवी
गाडी असल्याने थोडी
हवेशीर आहे म्हणून
बरे !
तरुण ,मध्यमवयीन ,ज्येष्ठ अशा
सर्ववयीन महिला एकाच प्रवाहात
एकाच दिशेला वाहत
आहेत.
"अरे पुढे
सरका ",
"जागा नाही
पुढे ",
"तुम्हाला कुठे उतरायचे
आहे",
“तुम्ही या इथून",
"जरा बाजूला
व्हा ",
"पुढचे हलत
नाही तर मी
काय करू"
अशा सर्व
अनेक वाक्यांची पुन्हा पुन्हा उजळणी
होत होती . प्रत्येकीला
आपल्याला पुढे कसे
जाता येईल आणि
जागा कशी मिळेल
हीच सर्वात मोठी
चिंता असावी असे
क्षणभर वाटते. लाल-पिवळा-गुलाबी-निळा-पांढरा
असे वेगवेगळे सर्वच
रंग इथे पाहायला
मिळतात. पण गर्दीमध्ये
कोणाचेच कपड्यांकडे फारसे लक्ष
जात नाही.पण
हो, छताकडे पहिले
कि रंगबिरंगी बांगड्या-कडे घालून
लटकलेल्या हातांचे सुरेख तोरण
पाहायला मिळते. सुगंधित अत्तरे
,मेकअप,परफ्युमचा निरनिराळा सुगंध
इतका दरवळत असतो
कि कधीकधी डोके
दुखायला लागते.पण या
महागड्या सौंदर्यप्रसाधनांनाही लाजवेल असा हवाहवासा
वाटणारा सुगंध देणारी एक
तरी महिला या
डब्यात असते. ती शक्यतो
मध्यमवयीन,जास्त मॉडर्न नसलेली
पण टापटीप असते
. आणि या सुवासाचे
स्त्रोत असतो तिच्या
केसात माळलेला मोगऱ्याचा
गजरा.
लोकलच्या डब्यातील सकाळच्या आणि संध्याकाळच्या
प्रवासातील फरक नाक
हे ध्यानेन्द्रीय अचूक
ओळखते . संध्याकाळी दिवसभरच्या थकाथकीमुळे
हेच सर्व सुगंध
कोमेजलेले घामेट्लेले नकोसे झालेले
असतात . गर्दीचे म्हणाल तर
दिवसाचे काही २-३ तास
सोडले तर ती
कायम सोबत असते.
या महिलांच्या डब्यात
प्रत्येकीचे कपडे,दागिने,चपलांचे निरीक्षण करण्यात
मला विशेष आनंद
प्राप्त होतो.पण
आता हा निरीक्षणाचा
क्षण नाही हे
उमगताच मी पुन्हा
सर्व शक्तीनिशी स्वतःला
पुढे ढकलत आत
जाण्याचा प्रयत्न सुरु करते.
त्या डब्यातील सर्वच
जणी या प्रयत्नात
असल्याने सामना चुरशीचा रंगलेला
आहे.
"आई आई
गं ! या पोरी
कशाला असल्या टाचा
वापरतात कोण जाणे
"
एक चाळीशीतील बाई एका
छान फॉर्मल पेहरावात
असलेल्या मुलीवर किंचाळलीच. या
मुलीच्या पेहरावातीलआकर्षण असलेल्या सैन्डलची टोकदार
टाच या बाईंच्या
नक्कीच पायावर पडली असणार.
आणि असे झाले
कि अंगात जी
वीज शिरल्यासारखी कळ
मेंदूपर्यंत पोहोचते तेव्हा मनात
किंवा बाहेर तोंडावर
हे असेच उद्गार
निघतात.
समोरच्या मुलीचे वाऱ्यावर
उडणारे केस नकळत
आपल्या चेहऱ्यावर आले कि
भयंकर वैताग येतो.
आणि मग कृपया
आपले केश सांभाळून
ठेवावे असा सल्ला
देण्याचा योग चालून
येतो. त्यावर ती
मुलगी कशी प्रतिक्रिया
देते हे महत्वाचे.
एखादी रागाने पाहून
केस पुढे घेईल
तर कोणी हसून
एक सॉरी बोलून
. कोणी या वरून
भांडायला सुद्धा कमी करणार
नाही.
लोकलचा महिला वर्गासाठी असलेला
डबा आणि त्यातील
भांडण हे जणू
समीकरणच बनले आहे
. मग तो डबा
प्रथम श्रेणीचा असो
वा द्वितीय श्रेणीचा.
फरक फक्त भाषा
आणि शाब्दिक व्याकरणाचा
येतो. असे म्हणतात
कि जिथे दोन
बायका एकत्र येतात
तिथे वादावादी ही होतेच.मग एकाच
ठिकाणी एवढया बायकांना सामावून
घेणाऱ्या या डब्यातून
आणखी काय अपेक्षा
करणार.कलकलाट हा
होणारच. पुढे जाताना
चुकून धक्का लागला
,जागा गेली किंवा
आणखी काही अशा
कोणत्याही शुल्लक कारणावरून येथे
भांडण होवू शकते.
कधी कधी शाब्दिक
चकमकीचे केव्हा मोठ्या भांडणात
रुपांतर होते ते
कळतच नाही . मग
त्यात चूक कोणाचीही
असो एकीने शांत
बसल्याखेरीज याला शेवट
नाही. ज्यांना असल्या
भांडणात विशेष रुची नसते
किंवा ज्या या
कलेत कच्च्या असतात
त्या वेळीच नमते
घेवून शांत बसतात.
विरुद्ध पार्टी आपले एकतर्फी
भांडण चालूच ठेवते
काहीवेळ. पण जर
दोघींपैकी एकही माघार
घेणाऱ्यापैकी नसेल तर
ते अगदी शिव्या-शापांपर्यंत पोहोचून एकमेकांचा
उद्धार करतात.त्यात जर
घरी अगर ऑफिसमध्ये
काही मनाविरुद्ध झाल्याने
राग साचून असेल
तर तो एखाद्या
धगधगत्या अग्नीप्रमाणे जीभेद्वारे शब्दांच्या ज्वाळा
बाहेर फेकत असतो
.आजूबाजूच्या साऱ्या फक्त बघ्याची
भुमिका पार पाडत
असतात.एकमेकींकडे बघून
गालातल्या गालात हसत ‘आम्ही
त्यांपैकी नाहीच मुळी’ असा
अविर्भाव चेहऱ्यावर आणतात. काहीजणी
मध्ये मध्ये तेल
ओतुन भडकावण्याचे काम
करतात तर काही
लागलेली आग विझवण्यासाठी
उपदेशांचे फवारे भांडणाऱ्याच्या दिशेने
सोडत असतात .इतरांसाठी
मात्र ते
उत्तम
करमणुकीचे साधन असते.
या फर्स्ट क्लासच्या डब्याचे
आणखी एक सत्य
म्हणजे किमान १०% महिलांकडे
फक्त सेकंड क्लासचे
तिकीट असते. मी
तर एकदा असे
ऐकले होते कि
कधी एके दिवशी
कधी नव्हे तो
टीसी तिकीट तपासणीसाठी
आला तेव्हा डब्यातील
अर्धा महिलावर्ग हा
दुधाचे पैसे देवून
लोणी खाणाऱ्यापैकी निघाला.
त्यांपैकी १० जणींना
तर बसण्याचे भाग्य
सुद्धा लाभले होते. आता
हे कितपत योग्य
आहे. पण असो,
हा आज नेहमीचाच
प्रकार आहे. इतक्या
गर्दीत टीसीचे नियमित येणे
जवळजवळ अशक्यच. आणि म्हणून
याला आळा घालणे
कठीणच. मग आपणही
या बाबतीत मौन
पाळणे पसंत करतो.
पण वाचा फुटते
जेव्हा एखादी झोपडपट्टीतील स्त्री
या डब्यात शिरण्याचा
प्रयत्न करते. हे आता
सुचण्याचे कारण म्हणजे
माझ्या डावीकडे अशीच एक
बाई तिच्या अख्या
कुटुंबाला घेवून उपस्थित आहे.सोबत २-३ फुट
उंचीचे पोते भरून
समान पण आहे.
मध्यमवयीन ,ठिगळे लागलेली साडी
घातलेली ती एका
एक वर्षाच्या बाळाला
घेवून गर्दीत स्वतःसाठी
आणि तिच्या सोबत
असलेल्या दोन मुलींसाठी
जागा मिळवण्याची धडपड
करत असते.त्यांचे
ते झिपरे केस
, ढिले कपडे मातकट-तेलकट चेहरा एकंदरीत
त्यांना पाहता त्या बाजूच्या
झोपडपट्टीतून आलेल्या असल्याचे ओळखायला
फारसा वेळ लागत
नाही. मग तिचा
जरा जरी धक्का
डब्यात कोणाला लागला कि
लगेच सगळ्यांना चेव
चढतो.
आणि मग त्यातली
एखादी तिला म्हणते,
"अगं तुला
माहित नाही का
हा कोणता डबा
आहे. आणि केवढे
समान ते .फर्स्ट
क्लासच्या डब्यात यायचे नाही
असे".
मग लगेच दुसरी
सांगते ,
"माहित कसे
नसणार . चांगले माहित असते
या लोकांना.पण
तरी जाणून घुसतात.
आधीच गर्दी कमी
आहे का?"
"चाल आता
मुकाटपणे पुढच्या स्टेशनवर उतरून
जा.नहितर…. " अशी
धमकी सुद्धा एक-दोघी देण्याचा
प्रयत्न करतात.
सर्वच जणी
तिच्यावर जणू तुटून
पडतात. पण तिच्यावर
या सर्वाचा काहीच
परिणाम झालेला दिसत नाही.पण ती
त्यांच्याकडे लक्ष न
देता तिच्या मुलांशी
त्यांच्या कोणत्यातरी विचित्र भाषेत
बोलण्यात मग्न असते.इतक्यात लक्षात आले
कि मागची ती
टवाळखोर पोरं हिचीच
आहेत तर. अशा
वेळी त्या बोलणाऱ्या
इतर महिला निष्फळ
स्वतःची शक्ती वाया घालवत आहेत असेच
वाटते. अशी ही
पाच जणांची गर्दी
फर्स्ट क्लासचे तिकीट नसतानाही
सुखात प्रवास करत
आहेत. त्यांच्याकडे साधे
तिकीट तरी असेल
का हा प्रश्न राहतो
क्षणभर.