Sunday, November 29, 2015

लग्न शुभेच्छा

आज गुंफले रेशीमबंध प्रीतीचे
क्षणात दरवळले गंध सुखांचे

रेशीमगाठीत या जन्मले
इंद्रधनू नव नात्यांचे
सोहळ्यात या सोनेरी
पसरले अलगद रंग प्रेमाचे

मधू स्वरांत गुणगुणले
मिलन हे मृदू भावनांचे
आरंभता संसार रुपेरी
आले घरा वारे शुभेच्छांचे

- रुपाली ठोंबरे.



Wednesday, November 25, 2015

धुंद ती मधुमालती...


धुंद ती मधुमालती 
रात अनोखी अशी 
बहरली काल ती 

विना तुझ्या सर्व रिते 
तुज संगतीत उपभोगते 
स्वर्ग जीवनी जिथे तिथे 

 मंद सुगंध बेधुंद-दंग करी 
अनुराग-रंग तो दाट करी 
 नकळत बंध गुंफले करी 

जन्मांचे सुख घेऊन सारे 
वाहू लागले प्रीतीचे वारे 
स्वप्नांच्या दुनियेत नेणारे

नभी उजळल्या अनंत वाती 
प्रीतसाक्ष देत उभी चंद्रकोर ती 
प्रेमज्योत तेवते तशी तीरावरती 

- रुपाली ठोंबरे



Wednesday, November 18, 2015

मोठ्या विचारांची जादू दाखवणारे पुस्तक

त्या दिवशी वाचनालयात नवे पुस्तक घेण्यासाठी गेले आणि सहज नजर पडली ती " THE MAGIC OF THINKING BIG" by David Joseph Schwartz,Ph.D. या पुस्तकावर . शिर्षकानेच माझे लक्ष लगेच त्याकडे वेधले गेले आणि मी ते घरी घेऊन आले. खूप उत्सुकता होती माझ्या मनात काय बरे असेल नक्की या पुस्तकात …. आणि त्याच दिवशी वाचनास सुरुवात केली. वाचता वाचता बऱ्याच उपयोगी टिप्स , चांगल्या गोष्टी नजरेस पडल्या आणि मनासही पटल्या. आणि मी लगेच टिपण्या काढण्यास सुरुवात केली. सर्वांनाच हितावह असलेल्या त्याच इथे मांडते आहे.

पुस्तकाची सुरुवात होते ती " Believe You Can Succeed And You Will "  या प्रथम धड्यापासून. आपण जसा विचार करतो ते होत जाते. जर स्वतःवर , स्वतःच्या कर्तृत्वावर, प्रयत्नांवर ,यशावर आपला पूर्ण विश्वास असेल तर ती व्यक्ती कितीही अडचणी आल्या तरी शेवटी यशस्वी होतेच हा या धड्याचा संक्षिप्त संदेश. पण असा विश्वास प्रत्येकाच्याच अंगी नसतो तर आपण तो वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. १. नेहमी यशाचा विचार करा, अपयशाचा नाही, २. प्रत्येक दिवशी स्वतःला आठवण करून द्या कि तुम्ही तुम्हाला वाटते त्यापेक्षा अधिक पात्र आहात ३. तुमचा विश्वास नेहमी विशाल असू दया या तीन गुरुकिल्ल्यांच्या आधारे हा विश्वास अंगी बाळगणे कसे शक्य आहे ? तेही या पाठात अगदी अचूक सांगितले आहे.

कोणतेही अपयश एखादे कारण पुढे करून पचवणे हा किंबहुना सर्वांचाच गुणधर्म आहे. मग ती कारणे सतत असलेली नाजूक तब्येत, देवाने दिलेली कमी बुद्धी , वयमर्यादा , नशिब अशी अनेक असतात. पण नेहमी ही अशी यशात अडथळा निर्माण करणारी कारणे  गोंजारत बसून आयुष्य काढले तर यशाचा मार्ग आपणच नाहीसा करतो. पण त्याउलट आपल्याकडे नसलेल्या गोष्टींचा विचार करत राहण्यापेक्षा स्वतःच कणखर बनून येणाऱ्या परिस्थितीचा सामना केला तर यशालाही कधीतरी आपल्या दारी यावेच लागते. आणि ते कसे शक्य होऊ शकते याचे उत्तर म्हणजेच पुस्तकाचा दुसरा धडा "Cure Yourself Of Excusitis,The Failure Disease".

"Build Confidence And Destroy Fear" …नीट वाचले तर या तिसऱ्या पाठाच्या शीर्षकातच खूप काही सांगितले आहे. विश्वास आणि कृती असू द्या म्हणजे भीती आपोआपच नष्ट होईल. नेहमी सकारात्मक विचारांना खतपाणी घातले तर मनातील नकारात्मक तण अपोआपच काळाच्या ओघात नाहीसे होतात आणि आयुष्य एखाद्या वटवृक्षाप्रमाणे बहरून जाईल , विशाल होईल.इतराना बोध देणारी सावली ठरेल .

तुम्ही म्हणाल पुस्तकाच्या शीर्षकाप्रमाणे मोठा विचार करा हे ऐकायला ,वाचायला तर योग्यच वाटते पण Think big म्हणजे नक्की काय करायचे ? तर हेही "How To Think Big" या चौथ्या धड्यात योग्य उदाहरणांसहित  छान स्पष्ट केले आहे .

"How To Think And Dream Creatively" हा पाचवा धडा मला सर्वात जास्त आवडला.इतका कि "कल्पनात्मक विचार "या विषयावर एक पोस्टसुद्धा मी ब्लॉगवर टाकली आहे.नक्की वाचा …खात्री आहे आवडेलच.

सातवा धडा "You Are What You Think You Are", वाचता वाचता खूप काही सांगून जातो. इतराना आपण कसे दिसतो , वाटतो हे सर्वस्वीरीत्या आपल्या स्वतःबद्दलच्या विचारांवरच अवलंबून असते . जणू एक आरसाच. म्हणून नेहमी स्वतः , स्वतःचे काम यांना महत्त्व दया , इतरांकडून आपल्याला महत्त्व अपोआपच मिळेल . आयुष्यात कोणत्याही प्रसंगी स्वतःला एक प्रश्न विचारा "महत्त्वाचे लोक अशा प्रसंगी काय निर्णय घेणार " आणि त्या उत्तराच्या मार्गावर चाला… ही एक खास गुरुकिल्ली इथे मिळते .

जे काही कराल ते उत्तम करा. आपला सभोवताल नेहमी तुमच्यासाठी चांगलाच ठेवा. आपल्या सभोवतालचा आपल्यावर आणि आपल्या कार्यक्षमतेवर कसा परिणाम करतो आणि त्यापासून चांगले कसे मिळवता येईल हे सोप्या शब्दांत समजून घेण्यासाठी " Manage Your Environment : Go First Class"या पुस्तकातील आठव्या धड्याची पाने चाळावीच लागतील .

आपली शरीरस्थिती ,दृष्टीकोन हे सर्व आपले विचार न सांगता समोरच्याच्या मनात सहज उतरतात. म्हणून 'मी सक्रिय आहे ','मी महत्त्वाचा आहे ' हे सर्व न सांगताच इतराना जाणवून देणे कसे योग्य आणि फायदेशीर हे सांगणारा नववा धडा आहे " Make Your Attitude Your Allies".

यश हे इतरांच्या सहकार्यावर कुठेना कुठे अवलंबून असते हा एक प्रत्येकासाठी स्वीकारता येणारा नियमच आहे . माणूस कितीही मोठा , यशस्वी असला तर ते यश त्याचे एकट्याचे असूच शकत नाही. त्यात अनेकांचा वाटा असतो. पण आपणही कृतज्ञता बाळगून या नात्यांना अधिक घट्ट करण्यासाठी प्रयत्नरत असलो पाहिजे. वेळप्रसंगी मदत करणारे , समजून घेणारे, प्रोत्साहन देणारे अशा सर्वांचीच आठवण करून देणारा दहावा धडा " Think Right Toward People" अशाच असंख्य सहकार्यांना ,प्रिय व्यक्तींना समर्पित.

नुसती पोपटपंची ही कोणत्याही यशासाठी पूरक ठरू शकत नाही. कृती ही नेहमीच खूप महत्त्वाची असते. सर्व काही ठीक होईल तेव्हा मी करेल अशी कारणे देत दिवस पुढे ढकलणे या अपयशाचा मूळ पाया असू शकतो. नुसते हे पोस्ट वाचून छान आहे , पुस्तक वाचायला हवे असे म्हणण्यापेक्षा आत्ताच हे पुस्तक शोधून यातील अकरावा धडा "Get The Action Habbit " वाचून अंमलात आणला पाहिजे.

प्रत्येकाचे यश आणि अपयश हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते . आयुष्यात प्रत्येक गोष्टीतच विजय मिळेल हे जरी शक्य नसले तरी मिळालेल्या अपयशातूनही ज्याला यशाचा मार्ग प्राप्त करता आला तो खरा यशस्वी. प्रत्येक गोष्टीत चांगली बाजू शोधून न हरता सामना खेळत राहिलो तर यशाची ट्रॉफी कधीतरी आपल्या नावावर असेलच , हेच सांगणारा बारावा पाठ " How to Turn Defeat Into Victory" खरेच वाचण्यालायक आहे.

"Use Goals To Help You Grow" हा तेरावा पाठ म्हणजे आपल्या स्वप्नांना, इच्छांना पूर्ण करणारा मार्गच. जोपर्यंत आपले ध्येय आपल्यापाशी नसते तोपर्यंत आपले आयुष्य , काम सर्वच अस्ताव्यस्त असते . एकदा का ध्येय मनाशी बाळगले आणि त्याच्या पूर्ततेचा ध्यास मनात धरला कि अपोआपच जीवनाला एक शिस्त लागते ,नवी दिशा ,नवा मार्ग मिळतो … त्या लक्ष्या पर्यंत पोहोचवणारा.

आजच्या चढाओढीच्या आयुष्यात प्रत्येकालाच कोणत्याही क्षेत्रात मुख्य सूत्रधार बनण्याची लालसा असतेच. या स्वप्नपूर्तीसाठी लेखकाकडून मिळालेली भेट म्हणजेच या पुस्तकातील शेवटचा धडा " How to Think Like A Leader ".

खरेच हे पुस्तक नावाप्रमाणेच जादुई आहे … आपल्या रोजच्या जगण्यात केलेल्या थोड्याशा बदलाने थोर व्यक्तिमत्त्व घडवणारे.




- रुपाली ठोंबरे . 

Monday, November 16, 2015

उमलणारी नवी सकाळ....मालवणारी तीच संध्याकाळ


कोवळी उमलणारी नवी सकाळ आणि एका काळानंतर मालवणारी तीच संध्याकाळ….दिवसाच्या या दोन्ही प्रहरी सारखाच देखावा …. सूर्याचे अस्तित्व शीतल मोहक…. अगदी  हवेहवेसे वाटणारे…. कापसाच्या शुभ्र मेघमयी पुंजक्यांतून डोकावणाऱ्या निळ्याभोर आकाशी….  लाल-गुलाबी-केशरी रंग उधळीत रंगलेली होळीच जणू…एखाद्या चित्रकाराने फिरवलेल्या अदृश्य कुंचल्याचीच ही कमाल…. दूर सौम्य धुक्यातून डोकावणारी धूसर वनराई…. झाडांची ती सुंदर नक्षी…. जिथे विसावती हजार पक्षी…. खाली हिरव्यागार गवताच्या गालिच्यावर सांडलेले सोनेरी ऊन…. जलाशयाच्या दर्पणात आभाळ निळे उतरून …. रंगछटांचा हा खेळ निसर्गात रंगतो ….या रंगसोहळ्यात पाऊलवाटही होऊन सोनेरी….नवदिशा दाखवी आयुष्याला…. दृश्य जरी सारखे…. तरी अंतर तासांचे तयांत….आयुष्य म्हणजे काय?…. या तासांत रोज नवा खेळ खेळून…थकून क्षितिजाशी या देखाव्यात… जरा विसावा घेणे…. 


- रुपाली ठोंबरे

Tuesday, November 10, 2015

सण दिवाळीचा...


"दिवाळी आला सण मोठा , नाही आता आनंदाला तोटा " म्हणत येणाऱ्या या मंगल सोहळ्याच्या सर्वाना खूप खूप शुभेच्छा. 


लक्ष चंद्र आज उतरले धरतीवरी 
कोटी चांदण्या झिलमिल…. या भूवरी , या अंबरी

रंगांचे मोरपीस बहरले माझिया अंगणी 
मनात सुख अलगद गवसले….धुंद त्या मधूर क्षणी 

 घराघरांत गोड-तिखट फराळांचा दरवळ
 स्वानंदाचा सडा दूर करी….जीवनव्यथांची ती तळमळ 

झेंडूच्या गंधात मिसळतो उटण्याचा मृदू सुगंध 
सण दिवाळीचा घट्ट करी …. नात्यांचे रेशीमबंध 

दुनियेच्या रंगमहाली रंगली भव्य आतिषबाजी 
शरदाच्या चांदण्यात उधळू आनंद…. दूर करू नाराजी 

हर्ष-शुभेच्छांच्या वर्षावात सुरु झालेले हे नववर्ष 
तुम्हा सर्वांच्या जीवनी आणू दे….सुखसमृद्धीचा नवा स्पर्श

 - रुपाली ठोंबरे.
( umatlemani.blogspot.in)





Monday, November 9, 2015

इराणातून सुटका


" आउट ऑफ इराण " ही एका सुझान आझादी नामक धाडसी इराणी स्त्रीची कथा…एका श्रीमंत घराण्यात वाढलेल्या, लहानपणापासूनच श्रीमंतीत वाढलेल्या सुझानला आईच्या मृत्यूनंतर शिक्षणासाठी दूर परदेशी जावे लागते…तिथे अशा काही घटना घडतात आणि तिला तिथूनही पुन्हा शाहच्या अमलाखाली असलेल्या इराणमध्ये परत यावे लागते. त्यानंतर झालेले तिचे लग्न, लग्न झाल्यानंतर प्रकाशात येणारी त्या इराणी पुरुषाची मानसिकता, आणि शेवटी त्याचा झालेला मृत्यू या अनपेक्षित घडत जाणाऱ्या घटनांसोबतच इराणात त्या काळात झालेली क्रांती आणि तिचे लेखिकेच्या जीवनावर झालेले परिणाम हाच या लघू कादंबरीचा विषय आहे.

शाहच्या काळात,इराणवर असलेल्या पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव अयोत्तुल्ला या नव्या राजकीय सत्तेला मान्य नव्हता. आणि त्याने श्रीमंत, उद्योगपती, पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणाऱ्या सर्वांनाच ताघौती घोषित केले आणि त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे छळ सुरु केला. त्यांची संपत्ती महागड्या गाडया जप्त करण्यात आल्या . लहानसहान कारणावरून तुरुंगात डांबून शारीरिक, मानसिक व सामाजिक छळ केला गेला.

या सर्व प्रकारात नेहमी श्रीमंती अनुभवलेली सुझान अगदी विचित्र पद्धतीने गुरफटून गेली होती. आजारात मरण पावलेल्या नवऱ्याचा तिच्यावर नसलेला विश्वास आणि सासरच्या मंडळींची नसलेली साथ यामुळे ती अधिकाधिक मरणयातना भोगत होती.ताघौतींवर दिवसेंदिवस वाढत असणारा अयोतुल्लाचा जुलूम, अंगावर काटा आणणारे तिचे तुरुंगातील दिवस आणि सुटकेसाठी मुल्लाकडे मान्य केलेली एक अट… हे सर्व तिचे लाडक्या मुलासोबत इराणमध्ये राहणे अशक्य करत होते.

आणि शेवटी इराण सोडण्याचा तिचा घेतलेला ठाम निर्णय, त्यासाठी केलेली तडजोड, तुर्कीस्तानमध्ये सुखरूप पोहोचवण्याची हमी देणाऱ्यांकडून ऐन प्रसंगी मिळालेली अनपेक्षित वागणूक, इराणबाहेर पडण्याचा निवडलेला खडतर मार्ग, त्या मार्गातील असंख्य काटे, बर्फात गारठलेल्या त्या जीवांची झालेली दैना या सर्वांचे भयकारी, धाडसी सादरीकरण हाच या लघुकथेचा मुख्य कणा आहे. या सत्यकथेचा शेवट आणि आज कसा असेल हे जाणण्यासाठी सुझान आझादी आणि एंजेला फेरान्ते लिखित "आऊट ऑफ इराण" (इराणातून सुटका-मराठी अनुवाद ) या पुस्तकाची पाने उलटवून पाहणेच योग्य.

- रुपाली ठोंबरे

Monday, November 2, 2015

तुझं हसणं....आनंदाचं देणं


जे कधीकधी अथक प्रयत्नांनी साध्य होत नाही ते एका हसण्यानेही सहज शक्य होते. रूप, रंग सर्वांपलीकडेही जाऊन भावनांचा अनोखा संवाद मुग्धपणाने सांगणारी, स्वतः सोबतच इतरांच्याही जीवनात सुख-हास्य-आनंदाचा मुक्तपणे सडा शिंपणारी प्रत्येकाला लाभलेली एक देणगी….आपलं हसणं. 

या वर्षावात आनंदरंग उधळत न्हाऊ दया सबंध सृष्टीला….आणि अशाच तृप्तीत या मनाला.






 जरी नसेल मोत्यांचं लेणं
 तरी असावं आनंदाचं देणं
 दुःखाच्या गडद मेघातून जणू
 पसरणारं सौख्याचं चांदणं

  भावनांचं असं खोल जाऊन मनात लपणं
  ओठांच्या कोरीतून तेच हळुवार सांगणारं
  तुझ्या-माझ्या मनाला जोडणारा दूवा जणू
  असंच असावं नकळत उमलणारं तुझं हसणं

 आसवांनाही माझ्या असं मुग्ध तुझं जाणणं
 त्या आसवांतही हळूच नवी चमक आणणारं
 तुझ्या-माझ्यातला अनोखा मुग्ध संवाद जणू
 असंच नित राहावं चेहऱ्यावर मंद तुझं हसणं 

- रुपाली ठोंबरे.

Blogs I follow :