Monday, November 9, 2015

इराणातून सुटका


" आउट ऑफ इराण " ही एका सुझान आझादी नामक धाडसी इराणी स्त्रीची कथा…एका श्रीमंत घराण्यात वाढलेल्या, लहानपणापासूनच श्रीमंतीत वाढलेल्या सुझानला आईच्या मृत्यूनंतर शिक्षणासाठी दूर परदेशी जावे लागते…तिथे अशा काही घटना घडतात आणि तिला तिथूनही पुन्हा शाहच्या अमलाखाली असलेल्या इराणमध्ये परत यावे लागते. त्यानंतर झालेले तिचे लग्न, लग्न झाल्यानंतर प्रकाशात येणारी त्या इराणी पुरुषाची मानसिकता, आणि शेवटी त्याचा झालेला मृत्यू या अनपेक्षित घडत जाणाऱ्या घटनांसोबतच इराणात त्या काळात झालेली क्रांती आणि तिचे लेखिकेच्या जीवनावर झालेले परिणाम हाच या लघू कादंबरीचा विषय आहे.

शाहच्या काळात,इराणवर असलेल्या पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव अयोत्तुल्ला या नव्या राजकीय सत्तेला मान्य नव्हता. आणि त्याने श्रीमंत, उद्योगपती, पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणाऱ्या सर्वांनाच ताघौती घोषित केले आणि त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे छळ सुरु केला. त्यांची संपत्ती महागड्या गाडया जप्त करण्यात आल्या . लहानसहान कारणावरून तुरुंगात डांबून शारीरिक, मानसिक व सामाजिक छळ केला गेला.

या सर्व प्रकारात नेहमी श्रीमंती अनुभवलेली सुझान अगदी विचित्र पद्धतीने गुरफटून गेली होती. आजारात मरण पावलेल्या नवऱ्याचा तिच्यावर नसलेला विश्वास आणि सासरच्या मंडळींची नसलेली साथ यामुळे ती अधिकाधिक मरणयातना भोगत होती.ताघौतींवर दिवसेंदिवस वाढत असणारा अयोतुल्लाचा जुलूम, अंगावर काटा आणणारे तिचे तुरुंगातील दिवस आणि सुटकेसाठी मुल्लाकडे मान्य केलेली एक अट… हे सर्व तिचे लाडक्या मुलासोबत इराणमध्ये राहणे अशक्य करत होते.

आणि शेवटी इराण सोडण्याचा तिचा घेतलेला ठाम निर्णय, त्यासाठी केलेली तडजोड, तुर्कीस्तानमध्ये सुखरूप पोहोचवण्याची हमी देणाऱ्यांकडून ऐन प्रसंगी मिळालेली अनपेक्षित वागणूक, इराणबाहेर पडण्याचा निवडलेला खडतर मार्ग, त्या मार्गातील असंख्य काटे, बर्फात गारठलेल्या त्या जीवांची झालेली दैना या सर्वांचे भयकारी, धाडसी सादरीकरण हाच या लघुकथेचा मुख्य कणा आहे. या सत्यकथेचा शेवट आणि आज कसा असेल हे जाणण्यासाठी सुझान आझादी आणि एंजेला फेरान्ते लिखित "आऊट ऑफ इराण" (इराणातून सुटका-मराठी अनुवाद ) या पुस्तकाची पाने उलटवून पाहणेच योग्य.

- रुपाली ठोंबरे

1 comment:

  1. ब्लॉग मध्ये केलेल हे वर्णन खरच उत्सुकता वाढवनार आहे..

    ReplyDelete

Blogs I follow :