Wednesday, December 28, 2016

New year with new vision



नवे वर्ष...नवी दृष्टी... नवे विचार... नव्या कल्पना !!!
आणि या सोबतच या नव्या वर्षात भर पडते आहे ती आजच्या नव्या पिढीसाठी एक नवी दिशा घेऊन आलेल्या अक्षयाच्या नव्या अक्षरांच्या प्रदर्शनाची....
प्रत्येकाच्या आयुष्यात या नववर्षाच्या सोहळ्यात २०१७ साल नव्याने उजाडेल...नवे निश्चय आणि नवी आशा घेऊन. आणि याच नव्या वर्षीच्या पहिल्याच आठवडयात म्हणजे ३ जानेवारी २०१७, मंगळवारी, "नेहरू सेंटर आर्ट गॅलरी" येथे प्रख्यात सुलेखनकार ' अच्युत पालव' यांच्या मार्गदर्शनाखाली कॅलिग्राफीच्या क्षेत्रात समृद्ध होत असलेली अक्षया ठोंबरे, कॅलिग्राफीच्या क्षेत्रात असणारे तसेच या क्षेत्राशी फारसा संबंध नसणारे अशा सर्वांसाठीच हा चित्तवेधक विषय नव्याने तिच्या स्वतःच्या शैलीत मांडून हे अक्षरप्रदर्शन घडवून आणत आहे.

अक्षया ठोंबरे ही अक्षरांच्या विश्वातील कल्पना आणि त्यांतील सौन्दर्याने  प्रेरित झालेल्या नव्या पिढीच्या सुलेखनकारांपैकीच एक आहे. तिचे काम हे खूप विस्मयकारक आहे. पारंपारिक ढंगातील अक्षरांना तिने दिलेला आधुनिकतेचा स्पर्श प्रेक्षकांसमोर सुंदरतेचा एक नवा अविष्कार निर्माण करतो. अक्षयाने तिच्या या प्रदर्शनासाठी अजोड मेहनत घेतली आहे.या प्रदर्शनातील चित्रे आणि त्यांतील अक्षरे म्हणजे तिची मेहनत , तिच्या भावना , तिचे मन या सर्वांचा आरसा आहे. " New year with new vision" या अक्षयाच्या प्रदर्शनासोबत भारतीय अक्षरशैलीला पुढे समृद्धीस नेणारा एक उमदा कलाकार मिळणार असे अक्षयाचे गुरु अच्युत पालव अगदी ठामपणे सांगतात.

या अक्षर प्रदर्शनाबद्दल बोलताना अक्षया सांगते कि , 
"अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी" मधून एक विद्यार्थीनी म्हणून सुलेखनाचे मूलभूत धडे घेत असताना तिला अच्युत पालव सरांचे उत्तम मार्गदर्शन आणि प्रोत्साहन  लाभले. मूळ अक्षरांचा वारंवार सराव करत  तिने सुलेखनाचा पाया भक्कम केला.यासोबतच जसजशी तिची अक्षरांबद्दलची ओळख वाढू लागली तिने   Roundhand, Gothic , Fraktur ,unicial  अशा वेगवेगळ्या शैलीतील अनेक पारंपरिक रोमन अक्षरांचा अभ्यास सुरु केला.अक्षरांच्या या प्रवासात असतानाच Gothic आणि Fraktur या शैलीतील अक्षरे तिच्या मनाला विशेष भावली.त्यांच्यातील चलन, गती, ताठपणा इत्यादींचा अभ्यास करताना तिला या टंकांसोबत काम करायला आवडू लागले.Gothic आणि Fraktur या दोन शैलींचे एकत्रीकरण करून स्वतःचे असे काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा सफल प्रयत्न आजपर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय सुलेखनकारानी केला आहे. याच Black letter च्या संकल्पनेतून अक्षयाने Gothic आणि Fraktur या दोन शैलींचे एकत्रीकरण करून, तिचे स्वतःचे कौशल्य वापरून आणि कॅलिग्राफीमधील बेसिक अक्षरांचा स्पर्श देऊन स्वतःचे असे एक नवे प्रतिरूप तयार केले आहे. या Black letterच्या नव्या प्रतिरूपामधून तिने स्वतःची एक ओळख, स्वतःची जागा निर्माण केली.मूलतः Gothic आणि Fraktur मध्ये असलेली खूप सारी अक्षरे ओळखणे कठीण जाते आणि त्यामुळे सामान्य माणूस त्या अक्षरांसोबत,शब्दांसोबत एकरूप होऊ शकत नाही. अक्षयाच्या अक्षरांत तिने gothic चा स्पर्श तसाच ठेवला असल्याने त्यांची ओळख थोडी कठीण असली तरी तिने सामान्य माणसाला समजू शकेल या विचारातून तिच्या शैलीत ते सोपे करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. या अक्षर प्रदर्शनात ती फक्त अक्षरांपर्यंतच सीमित राहिली नसून तिने अक्षरांसोबतच वेगवेगळ्या रंगांबरोबर, वेगवेगळ्या माध्यमांसोबत रंगांचे विविध पोत,ऍबस्ट्रॅक्ट रूप आणि चित्रकलेच्या विविध तंत्रांमध्ये आपले बदल घडवून आणत भरपूर काम केले आहे.हे करताना चित्रकार कुलदीप कारेगावकर सरांनी केलेल्या मार्गदर्शनाचा सिंहाचा वाटा आहे. कोणताही आकार हे एक डिझाईन आहे असे ती मानते. तिच्या मते,एखादे अक्षर हे सुद्धा एक प्रकारचे डिझाईनच आहे. विविध अक्षरे योग्य ठिकाणी तोडून आणि हव्या त्या ठिकाणी जोडून निर्माण होणाऱ्या अद्वितीय विलीनीकरणातून कितीतरी विलक्षण रचना अक्षयाने तिच्या चित्रांत साकारल्या आहेत.

असे कितीतरी जण आहेत ज्यांना अजूनपर्यंत कॅलिग्राफी म्हणजे नक्की काय तेही माहित नाही.पण अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाले तर कॅलिग्राफी म्हणजे सुंदर अक्षरलेखन. अक्षरलेखन हा विषय खरेतर अगदी बालपणापासून आपल्या परिचयाचा पण कित्येकांच्या आयुष्यात हा विषय केवळ नाममात्र राहतो. अक्षयाच्या या प्रदर्शनातून कधीतरी अक्षरांबद्दल असलेली ओढ पुन्हा नव्याने जागृत होऊ शकेल.आणि जे अक्षरलेखनाबद्दल आधीच जागृत आहेत त्यांना या प्रदर्शनातून अक्षरलेखन म्हणजे फक्त सुंदर हस्ताक्षरच नव्हे तर त्या पलीकडेही असलेले सुंदर विश्व दिसेल. जे आहे त्यालाच चिकटून न राहता अक्षयासारखे नवे प्रयोग , नवे काहीतरी करण्याची जिद्द निर्माण होईल. अक्षरलेखनामध्ये आणि त्यासोबतच स्वतःमध्ये नवे काही शोधून काढून योग्य अन्वेषण घडवून आले कि आपोआपच दोघांचीही वाढ होईल. हेच उद्दिष्ट मनाशी बाळगून प्रत्येकाने अक्षयाचे  " New year with new vision" हे अक्षरप्रदर्शन एकदातरी पाहायला हवे. घरी परत जाताना खूप काही नवे अनोखे असे कधीही न अनुभवलेले घेऊन जाल यात शंकाच नाही.


- रुपाली ठोंबरे.

Friday, December 23, 2016

भूक


आयुष्यात कितीही कष्ट असतील तरी चेहऱ्यावर एक निरागस स्मित घेऊन वावरणारी एक चिमुकली.
खरेतर १०-१२ वर्षांची ही मुलगी.
तिचे हे वय खेळण्याबागडण्याचे, हवा तो खाऊ खाण्याचे,छान छान कपडे घालून खुश होण्याचे.
पण यांपैकी एकही गोष्ट पूर्णपणे तिच्या नशिबात नाही.
गरीब शेतकऱ्याची मुलगी.आई-वडील दोघे दिवसभर शेतात राब राब राबतात.
त्यांनाच हातभार लावण्याची धडपड करणारी ही चिमुरडी सकाळीच आईने दिलेला हिरव्यागार भाज्यांचा ताटवा घेऊन बाजारात जाणारी... ५ रुपये जुडी , ३ रुपये वाटा करत गावभर हिंडणारी....संध्याकाळी थकूनभागून घरी परतणारी...बाबांच्या हातावर दिवसाचे पैसे ठेवत त्यांच्या डोळ्यांत पाणी आणणारी.
या वयात असे जगणे... पण चेहरा मात्र प्रसन्न... कुठलीही चिंता नाही... उलट एखादे भाव दिसलेच तर ते असतील समाधानाचे,आनंदाचे....या जगण्यातूनही जे हवे ते मिळवत असण्याचे समाधान.
टोपलीत हिरव्यागार ताज्या भाज्यामधून डोकावणारी २ पुस्तके तिची खरी आवड दर्शवतात. गिऱ्हाईकांची गर्दी ओसरल्यावर जेव्हा जेव्हा वेळ मिळेल ती त्या पुस्तकांमध्ये दडलेल्या ज्ञानाची चव घेण्यास आतुर असे. पुस्तकांबद्दल असलेल्या आपुलकीसमोर तिला खेळणे,खाऊ ,कपडे अशा गोष्टी नगण्य वाटत होत्या. आणि हेच कारण होते या परिस्थितीतही चेहऱ्यावर पसरलेल्या आनंदाच्या लहरींचे. आपल्या वयाच्या इतर मुलांना जे काही मिळते त्याबद्दल ना कोणता हेवा आणि आपल्या नशिबात ते सुख नाही त्याबद्दल ना कोणती खंत. पण जी शिदोरी नेहमी तिच्यासोबत आहे ती कदाचित इतरांना सहज उपलब्ध असूनही त्यांना त्याची किंमत नसेल.पण या पुस्तकांतूनच माझे उद्याचे भविष्य  उज्ज्वल होईल हे मात्र त्या चिमुरडीला लहान वयातच उमगले असेल आणि ज्ञानाची असलेली हीच भूक तिला उदयाला यशस्वी करेल. एखाद्या गोष्टीची मनापासून आस ठेवली कि तो घेतलेला ध्यास स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर पूर्ण होईलच हे मात्र सत्य.

चालता चालता बाजारात दिसलेले एक दृश्य...एका चित्रकाराने कागदावर टिपलेले हे चित्र खरंच किती काही बोलून जाते... आपल्यासारख्यांना किती काही शिकवून जाते, नाही का ?

- रुपाली ठोंबरे.



चित्रसौजन्य  : हेमंत भोर.

Thursday, December 15, 2016

तुझ्या विना....मी?

                     

                                                                                                                                                               

  कितीदा नव्याने तुला पाहते मी
  कितीदा नव्याने तुला जाणते मी
  तुला पाहते मी
  तुला सांगते मी
  तुझ्या विना अर्थ नाही जीवनी
  तुझ्या विना सांग "जगू कशी मी?"

   तुझ्या प्रीतीची प्यास डोळ्यांत वाहे
  तुझ्या सोबतीची मला आस आहे
  तुझ्या आठवणींत माझ्या सख्या रे
  क्षणमाला निरंतर ही मीरा जपते रे

   जीव भिजतो बघ रोज हा उशाशी
  तू ये धावून आता तरी मजपाशी
  येऊन सारे उधळून सुख रंग तारे
  देऊन सारे तू न कधी परत जावे

   कितीदा नव्याने तुला पाहते मी
  कितीदा नव्याने तुला जाणते मी
  तुला पाहते मी
  तुला सांगते मी
  तुझ्या विना अर्थ नाही जीवनी
  तुझ्या विना सांग "जगू कशी मी?"

                                               - रुपाली ठोंबरे.

Wednesday, December 14, 2016

घुसमट

कधीकधी अशी वेळ येते जेव्हा भोवतीचे सारे जग अंधारलेले वाटते... अनेकदा आपले जवळचेही साथ देत नाहीत असे वाटते. तेव्हा आपोआपच बाहेरच्या जगात आधार शोधला जातो... कुठेतरी कधीतरी तो सापडतोही... हा नवा आधार एखादी व्यक्ती असू शकते किंवा एखादी नवी संधी जी आपले जग बदलून टाकेल आणि त्या काळोख्या जगातून बाहेर काढेल. पण खूपदा जे ठरवतो ते होतेच किंवा मनासारखे मिळतेच असे नाही. या नव्या संधीसोबत बऱ्याचदा वेगळा अनुभवही येतो जो  मनाला काही केल्या पटत नाही... कदाचित तो एखाद्या दुसऱ्या व्यक्तीनुसार बरोबरही असेल पण आपल्या बुद्धीला पटत नाही म्हणून तो वाईट अनुभव.आणि याचे एक वेगळेच जड ओझे मनावर निर्माण होते. आणि जेव्हा अशा वाईट अनुभवांची मालिका आयुष्यात दीर्घ होते तेव्हा जीव ज्याप्रकारे कासावीस होतो... तीच असते घुसमट.



     अंधाऱ्या बंद खोलीत
    अडकून पडलेला जीव
    सारी कवाडे तोडून
    बाहेर उडू पाहतोय
    आपल्याच घराच्या भिंती कधी
    आपलीच साथ देईनाश्या होतात
    काळोखात चाचपडत जीव तेव्हा
    क्षणाक्षणाला आत गुदमरत राहतो
    पडद्याआडून मग कधीतरी दिसतो
    एक किरण नव्या आशेचा,
    आणि मग नकळतच
    विश्वासाचा एक धागा
    अवचित जुळून येतो भाग्याचा
    त्या अंधाऱ्या खोलीत
    एक काजवा चमकू पाहतो
    विशाल सूर्याच्या प्रकाशात
    नवस्वप्नांचे मनोरे रचू लागतो
    अचानकच त्या किरणासोबत
    धुळीचा लोट वाहू लागतो
    मनाच्या गाभाऱ्यात न सांगता
    एक काळा ढग गर्दी करू पाहतो
    जीव गुदमरतो, आकांत करतो
    पुन्हा एकदा होऊन एकाकी
    त्या काळोखात तो चाचपडत राहतो
    पुन्हा नवा किरण शोधण्यासाठी
    प्रदूषणातही नव्याने जगू पाहतो
    काळ लोटला जातो तसे
    असे अनेक अनाहूत काळे ढग
    आसपास - आतबाहेर चोहीकडे
    पसारा करून जमत असतात
    जीव आता पुरता अडकून जातो
    गुदमरत राहतो , घुसमटत राहतो
    आसवांच्या पावसात भिजत राहतो
    पण तरी पुन्हा एकदा
    अंधाऱ्या बंद खोलीत
    अडकून पडलेला जीव
    सारी कवाडे तोडून
    बाहेर उडू पाहतोय

                                          - रुपाली ठोंबरे.



Monday, December 12, 2016

अक्षरयज्ञ-३

आसपास दृष्टीस पडतील ती फक्त नाना तर्हेची हिरवीगार झाडे, कानांना ऐकू येईल फक्त पोपट, चिमण्या आदी पक्षांची मधुर किलबिल आणि सोबतीला असेल अगदी नाजूक स्पर्शाने अंगाशी बिलगून जाणारा मुग्ध गारवा... अशी जागा मुंबईच्या कुशीत सापडणे खरेतर अशक्य. पण रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने ते शक्य करून दाखवले आहे. आज आमच्या सारख्यांना या नयनरम्य परिसराचे दर्शन घडू शकत आहे ते फक्त अच्युत पालव सरांनी आयोजित केलेल्या 'अक्षरयज्ञ-३' या ३ दिवसांच्या नवरस या गहन विषयावर आधारित कार्यशाळेमुळे. कॅलिग्राफीच्या जगतात प्रवेश केलेले त्यांचे सुमारे ५० विद्यार्थी आज इथे मोठया उत्साहाने जमले आहेत. निसर्गाच्या प्रेमात पाडणारी शांत जागा, सर्वांचा लाडका गुरु आणि नवरसासारखा भावनाप्रधान विषय या त्रिवेणी संगमामुळे सर्व विद्यार्थी फारच उत्सुक होते.


आज कार्यशाळेचा पहिला दिवस. मुंबई, अमरावती ,गुजरात, सावंतवाडी अशा निरनिराळ्या भागांतून आलेले सर्वजण राहण्याची सोय आणि न्याहारीचा आस्वाद घेऊन उत्साहात हॉलमध्ये जमले. काम करण्याची जागाही अतिशय सुंदर... प्रशस्त, हवेशीर, मोकळी आणि प्रकाशाची कमी नसणारी.कार्यशाळेचे उदघाटन झाले ते प्रसिद्ध कथक नृत्यांगना तन्वी अनिल पालव हिच्या नवरसांनी न्हाऊन निघालेल्या नृत्याने. तिच्या नृत्यातून आणि चेहऱ्यावरच्या हावभावांतून ओसंडणारा प्रत्येक रस आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर त्याची अचूक छबी उमटवून जात होता. तो खरंच एक सुंदर अनुभव होता. त्यानंतर सर्वांच्या आवडत्या विवा सरांनी रांगोळीचे सप्तरंग असे काही जमिनीवर उधळले कि नवरसांचे ठसे प्रत्येकाच्याच मनावर उमटू लागले. आणि या रंगांसोबत आमचा या ३ दिवसांच्या कार्यशाळेचा प्रवास सूरु झाला.

त्यानंतर सुरुवातीलाच अच्युत सरांनी विविध ब्रशेस, साहित्य या सर्वांशी निगडित प्रश्नउत्तरांचा कार्यक्रम ठेवला. अनेक प्रश्नांची उत्तरे थेट कागदावर त्यांनी उमटवली होती. इंजेक्शची सुई असो वा एखादा घरगुती वापरातला ब्रश, कॅलिग्राफीच्या दुनियेतले एखादे टूल असो वा रस्त्यावरून उचललेली एखादी दगडाची चिप.... अच्यूत सरांच्या हातून कागदावर एखादा जादुई स्ट्रोकच निर्माण होईल. आज म्हणूनच कॅलिग्राफीच्या जगातले एक उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख सर्वत्र आहे .

दुपारच्या चहानंतर संगीतकार , कवी आणि चित्रकार या तिन्ही रूपांत साहित्यक्षेत्रात वावरणारे मिलिंद जोशी आमच्या समोर उभे होते.... काहीतरी नवे घेऊन. त्या नुतनतेची उत्सुकता सर्वांनाच होती पण ते नक्की काय असेल हे मात्र आमच्यासाठी गूढच होते, जे काही क्षणांतच आमच्यासमोर उलगडले गेले. एक सुंदर त्यांचीच संगीतबद्ध केलेली धून सर्वांच्या कर्णपटलांवर राज्य करू लागली. या संगीताला  मनातून अनुभवून समोरच्या कागदावर चित्रबद्ध करण्याची अतिशय अवघड कामगिरी आमच्यावर होती. सुरुवातीला तर कित्येकांना काहीच सुचले नाही. कितीतरी कागद कोरेच होते. पण हळूहळू प्रत्येक नव्या संगीतफ़ितीसोबत एक नवा रस मनात वाहू लागला. कधी तो संथपणे मनात तरंगत होता तर कधी थैमान घालून उसळत होता.कधी प्रेमाची रासलीला सुरु होती तर कधी भयाने व्याकुळ झालेला जीव सैरावैरा धावत होता. आता आम्ही सुद्धा या रसांना व्यक्त करण्यास सुरुवात केली आणि कोरे कागद सुंदर, भडक रंगानी आणि अंतर्भावांतून उत्पन्न झालेल्या रसांनी रंगू लागले. कोणी चुकले तर कोणी बरोबर होते ... पण प्रत्येकाचे प्रयत्न मात्र निरंतर सुरु होते. शांत ,वीर शृंगार, भक्ती , भय या रसांचे चित्र आज प्रथमच मी कागदावर पाहत होते आणि तेही स्वतःच्या हातून साकारलेले.

त्यानंतर थिएटर दिग्दर्शक शिवदास घोडकेंसोबत आमची नवी शाळा सुरु झाली... शाळा अभिनयाची. कधीही न अनुभवलेले आज आम्ही शिकत होतो.प्रत्येक कलेमध्ये निपुण होण्यासाठी एक खूप मोठी प्रक्रिया असते हे या कार्यशाळेतून घेण्यासारखे होते. त्या प्रक्रियेचा एक भाग बनून मेहनत घेतली कि नक्कीच यश दूर नसेल . थिएटर... खूप खूप मजेदार भाग होता या कार्यशाळेचा. सर्वानी खूप मज्जा केली. अभिनयामध्ये दडलेले नवरस आज आमच्यासमोर मांडले गेले आणि तेच स्वतःच्या अभिनयातून सर्वांसमोर मांडण्याचा नवा उपक्रम सुरु झाला. या उपक्रमात कार्यशाळेतील इतर १० जणांसोबत मिळून नाटक प्रस्तुत करायचे होते आणि त्यातूनच ओळखी-अनोळखी सर्वांसोबतच  एक नवा संवाद सुरु झाला. आपापल्या परिने सर्वानीच छान काम केले. पण ते निश्चितच घोडके सरांच्या मनासारखे नव्हते. पण पुढे त्यांच्या मार्गदर्शनासाठी उभारलेले शोकसभेचे,करूण  रसाचे चित्र सर्वांच्याच लक्षात राहील. अप्रतिम झाले होते ते.रात्रीच्या साध्या पण चविष्ट जेवणानंतर विद्यार्थ्यांपैकीच पण आज स्वतःच्या मेहनतीच्या बळावर स्वतःचे अस्तित्त्व निर्माण करणाऱ्या भालचंद्र लिमये आणि अक्षया ठोंबरे या दोघांच्या कॅलिग्राफीच्या कामाचे सादरीकरण झाले. दोघांचेही कामाचे स्वरूप , पद्धत , विषय एकमेकांपेक्षा वेगळे असल्याने २ नव्या गोष्टी शिकण्याचे, बघण्याचे भाग्य आम्हांस लाभले .लिमयेचें काम कवितांच्या सानिध्यातले होते... खूप सुंदर आणि खूप बोलके. अच्युत सर आणि विवा सर यांच्यानंतर या कार्यशाळेत आम्हा विद्यार्थ्यांना बी जी सर हे एक उत्तम मार्गदर्शक म्हणून लाभले. त्यासाठी खरेच मनापासून त्यांचे आभार मानावेसे वाटते. अक्षयाचे काम तर खूप सुंदर आणि प्रेरणादायी होते. प्रबळ इच्छाशक्ती, मेहनत आणि अच्युत पालव सरांचे मार्गदर्शन या तिन्ही गोष्टींचा मेळ तिच्या प्रत्येक चित्रात जाणवत होता. थरांवर थर घेऊन मांडलेल्या विशिष्ट शैलीतील अक्षरांनी अक्षयाने सर्वानाच मंत्रमुग्ध केले होते. आणि हीच जादू तिच्या ३ जानेवारीला मुंबईत असलेल्या तिच्या चित्रांच्या प्रदर्शनातही दिसून येईल यात शंकाच नाही. अशाप्रकारे आजचा पहिला दिवस हसत-खेळत पार पडला.

दुसरा दिवस सुरु झाला तो लेखिका आणि निवेदिका म्हणून सर्वज्ञात असलेल्या अक्षदा विचारेंसोबत. त्या आदल्या दिवसापासूनच सोबत असल्यामुळे आमच्या मनातील नवरसांबद्दलचे विचार थोडेफार त्यांना समजून आले होते. आम्हाला रसांविषयी शाब्दिक माहिती देऊन त्यांनी आमच्या विचारांना खतपाणी घालून एक पोषक वातावरण निर्माण केले. आज विविध रसांविषयी अधिक माहिती मिळवण्यात आलेले यश पुढे आमच्या कामातून दिसून आले. कॅलिग्राफीमध्ये आजपर्यंत बेसिक शिकताना एका साच्यात काम करत होतो पण या कार्यशाळेत ते सर्व बंध मुक्त करून स्वतःला व्यक्त करण्याची संधी मिळाली होती.कविता, गाणी अर्थात शब्दांच्या माध्यमातून आम्ही रसांच्या अगदी जवळ जात होतो, त्यांना समजून घेत होतो,कागदावर त्यांचे ठसे उमटवून विचारांची छाप सोडत होतो. शृंगार ,भय,बिभत्स, रौद्र अशा सर्व रसांना शब्दांतून समजून घेणे आणि कागदावर व्यक्त करणे... हा एक खूप सुंदर अनुभव होता. खासकरून बिभत्स रस कागदावर व्यक्त करताना आलेले अपयश आणि पुढे मिळालेले मार्गदर्शन नक्कीच आपल्या सर्वांच्याच लक्षात राहील. आजच्या दिवसात अनुभवलेला आणखी एक सुंदर अनुभव म्हणजे ओमकारातून प्रत्येकाने शोधलेला आपापल्या अंर्तमनातील ओम... नेहमीच्या बघण्यातल्या ओमपेक्षा खूप वेगळे स्वरूप होते ते ... जे आपणच स्वतः मांडले होते यावर आपलाही आता विश्वास बसणार नाही कदाचित. त्यानंतर 'लय भारी ' चित्रपटातील 'माऊली माऊली...  ' गाण्यावर सरांसोबत सर्वच अगदी देहभान हरवून नाचले... जणू त्या भक्तिरसात, त्या जयघोषात स्वतःला हरवून घेतले होते. पुढे हाच भक्तीरस प्रत्येक कागदावर ओसंडून वाहत होता. सर्वाना हा प्रकार फारच आवडला. पुन्हा एक नवे गाणे सुरु झाले... २०१६ मधले सैराट गाणे अबालवुद्धांपासून सर्वानाच नाचवणारे... 'झिंग झिंग झिंगाट... '. यावेळी नाचतानाची झिंग प्रत्येकाच्या वयोमानानुसार वेगवेगळी होती जी कागदांवर रंग उधळत बेभान झाली होती. त्यानंतर चहासोबत झालेल्या गप्पांमधून कार्यशाळेत दडलेले कित्येक कलाकार समोर आले. आमच्याकडे कवीही होता आणि गायकही ... जादूगारही होता आणि नायकही. याच नायकाच्या अधिपत्याखाली आम्ही सर्व आज बहरत होतो.



आजच्या दिवसातील आणखी एक आकर्षण म्हणजे कुलदीप सरांचे प्रात्यक्षिक. कुलदीप सरांचा निळ्या ,पांढऱ्या रंगांत भिजलेला कुंचला जसजसा कोऱ्या कॅनव्हासला स्पर्श करू लागला त्या चित्रातला शांतपणा आमच्या चेहऱ्यांवर सौम्यलहरी बनून पसरत होता.सकाळच्या संथ सागरावर शितल चंद्रकोर... एक अनोखे आणि अतिशय सुंदर,शांत मिलन.... मनावरचा ताण क्षणार्धात दूर सारणारे. दिवसाप्रमाणेच आजची रात्रही विशेष स्मरणीय ठरली, ती या थंडीमध्ये पेटवलेल्या उबदार शेकोटीमुळे... तिच्याभोवती सादर झालेल्या नृत्यामुळे... बेभान होऊन सैराट गाण्यांवर नाचणाऱ्या आम्हा सर्वांमुळे... अवधूतच्या प्रेमाचा गंध असलेल्या कवितांमुळे... सरांच्या सुरेल आवाजात रंगलेल्या अंताक्षरीच्या मैफिलीमुळे.

या संपूर्ण महायज्ञात विशेष कौतुक करावेसे वाटते ते सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या क्रिएटिव्ह हेडचे.थर्माकॉलमधून निर्माण झालेल्या अक्षरांची जी सुंदर आणि भव्य कलाकृती अक्षरयज्ञात दिमाखात उभी होती त्याचे संपूर्ण श्रेय या सावंतवाडीच्या मुलांना. सरांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्याचे मार्गदर्शनाचे ऋण त्यांनी ज्या पद्धतीने फेडले ते पाहून नक्कीच सरांच्याही डोळ्यांत दोन आनंदाची आसवे नक्कीच उभी राहिली असतील.ऋण म्हणण्यापेक्षा सरांबद्दल वाटणारे प्रेम होते ते.सरांच्या जीवनावर, कार्यावर  आधारित 'अद्वैत ' हा सुंदर माहितीपट आमच्यासमोर प्रस्तुत झाला तेव्हा साक्षात सरांबद्दल वाटणारा आदर मनात एका पायरीने आणखी उंचावला.जगातला कोणताही गुरु अशी गुरुदक्षिणा मिळाल्यास खरेच धन्य होईल.चांगल्या गुरुइतकेच चांगले शिष्य मिळणेही भाग्याचे असते. आणि या बाबतीत सर खरेच समृद्ध आहेत हे आज जाणवत होते.अच्युत पालव हे सुलेखनाच्या क्षेत्रात जितके नावाजलेले त्याहीपेक्षा अधिक माणूस म्हणून आदर्श व्यक्तिमत्त्व आहे असे मी म्हणेन. त्यांच्याकडून शिकण्यासारखे कॅलिग्राफीसोबतच आणखी बरेच काही आहे हे प्रत्यक्ष त्यांच्या संपर्कात आल्यानंतर अनुभवले.उत्तम संवादातून अधिकाधिक माणसं जोडत राहणं हा त्यांचा सर्वात मोठा छंद. आणि त्यामुळेच ते सर्वांचे लाडके बनले आहेत. स्वबळावर अवकाशापर्यंत हात पोहोचलेले असून सुद्धा पाय मात्र अजून जमिनीवरच टेकलेले आहेत... हे काहीजणांनाच जमते. सामान्यांसोबत सामान्य राहूनच असामान्य स्थान निर्माण करणे यांच्याकडून शिकले पाहिजे.मी या कलेच्या महासागरात सामावू पाहणारी एक सामान्य नदी...माझ्यातील उपजत कलागुणांना या विशाल विश्वात स्वैर साकारू इच्छिणारी. आज या महासागराचा एक भाग असल्याचा मनापासून खूप अभिमान वाटतो. अद्वैत म्हणजे साक्षात ब्रम्ह...ज्याचे दर्शन या महान कलाकाराच्या अभूतपूर्व कलाकृतीत प्रत्येक क्षणी घडते.त्याचेच एक सुंदर उदाहरण म्हणजे त्या क्षणी प्रस्तुत झालेले जन-गण-मन....अच्युत सरांच्या विश्वातून झालेले... सामान्यांच्या पलीकडले.

आज तिसरा म्हणजे या अक्षरयज्ञाचा शेवटचा दिवस. तिसरा दिवस सुरु झाला तो अरुंधती जोशी यांच्या व्हायोलिनवरच्या स्वरांसोबत. नवरसांचे अभूतपूर्व दर्शन आम्हाला त्या वाद्यस्वरांतून आज घडले... खरेच एक अद्भूत अनुभव. शांत रसापासून सुरु झालेले स्वर पुढे शृंगार , वीर ,हास्य रसांपर्यंत आमच्या मनांवर अधिराज्य गाजवत होते. आणि त्यांच्या सहवासात सर्वांनीच खूप छान काम केले, अगदी जे कालपर्यंत गोंधळलेले होते त्यांनी सुद्धा.... अशी रोख पावती अच्युत सरांकडून मिळाल्यावर सर्वानाच या कार्यशाळेत आल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. नवनीतचे मालक श्री. अनिल गाला यांची तिथे उपस्थिती ही आमच्यासाठी विशेष आनंदाची बाब होती. त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच आज आम्ही सर्व हा अविस्मरणीय अनुभव घेऊ शकलो होतो. त्यांना आमचे काम पाहून कौतुकही वाटत होते आणि आनंदही. खरेच या सर्वासाठी त्यांचे आम्हा सर्वांच्या वतीने मनापासून विशेष आभार. खूप सुंदर आणि प्रेरणादायी कार्यशाळा अशी झरझर संपत चालली होती... पण तरी आज शेवटचा दिवस असूनही तसे मुळीच जाणवत नव्हते. उलट अंगी संचारलेला नव्या उत्साहामुळे कामाला आज खरी सुरुवात झाली असे माझ्याप्रमाणेच अनेक जणांचे मत होते. या दोन दिवसांत ज्या नवरसांना शोधण्याचा प्रयत्न करत होतो ते सारे आज कुठे जरा तरी समजूउमजू लागले होते, कागदावर उमटले जात होते.



शेवट समीप आला तसे आम्हाला सर्व रंग, साहित्य आवरून ठेवायला सांगण्यात आले. पण तरी त्या गोष्टीसाठी कोणीही तयार होईना. काम करण्यासाठी अजूनही उत्साही असलेल्या आपल्या सर्व मुलांना पाहून सरांनीही एका वेगळ्या पद्धतीत आम्हा सर्वांकडून आजचा शेवटचा स्ट्रोक मारून घेण्याचे ठरवले. प्रत्येकाने आपापले कागद एकमेकांशी जोडून एक सलग कागद थोड्या अवधीतच डोळ्यांसमोर निर्माण केला. सरांनी एक-दोन-तीन म्हणताच अरुंधती जोशींच्या वाद्यस्वरांच्या सोबतीत एकीने तिच्या कागदावर रंगाने भिजलेला फटकारा मारला...तिच्या शैलीत. जिथे तिचा वार संपला होता तिथे पुढच्या विद्यार्थ्याचा स्ट्रोक सुरु होऊन तो पुढच्या कागदापाशी येऊन थांबला. आणि अशाप्रकारे प्रत्येक विद्यार्थ्याने मारलेल्या विविध शैलीतील , विविध रंगांतील स्ट्रोक्सचे एक सुरेख वलय निर्माण झाले.... तेही अवघ्या १५-२० सेकंदांत. या प्रयोगात सर्वानीच खूप आनंद लुटला. मुलांच्या म्हणण्यामुळे या प्रयोगाला वन्स मोर मिळाला. आणि दुसऱ्यांदा त्याहीपेक्षा सुंदर कलाकृती सर्वांनी घडवून आणली.

दुपारचे दीड वाजले. पॅलेट, ब्रशेस पाण्यात धुतले गेले . रंग सर्व बॅगेत बंद होऊ लागले.रंग उधळणारे हात आता आपापली चित्रे गोळा करून बांधून घेण्यात मग्न झाले होते. कुठेतरी फोन नंबरची देवाणघेवाण सुरु होती तर कुठे पुढच्या वाटचालीविषयी चर्चा. जेवणे झाली. ठरल्याप्रमाणे सर्वजण हॉलमध्ये पुन्हा एकत्र आली. आता तो हॉल कालपासून मांडलेल्या कागदांशिवाय,इथे अवतरलेल्या चित्रांशिवाय, रंगांशिवाय अपूर्ण वाटत होता. पण या अपूर्णतेला सुद्धा पूर्णत्त्वाकडे घेऊन जाणारा ऊर्जेचा , कलेचा स्रोत तिथे मध्यभागी उभा होता. सर्व विद्यार्थी अच्युत सरांभोवती गराडा घालून बसले... आता पुढे ते काय सांगतील या उत्सुकतेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकाच वेळी अनेक भाव गर्दी करत होते. सरांनी विचारले सुद्धा ," अरे काय झाले ? तुम्ही सर्वजण असे दिग्मूढ का दिसताहेत ? या प्रश्नाला एकमताने मिळालेले उत्तर ... 'मनात विरह रस वाहत आहे ' . खरेच ३ दिवसांत खूप जवळीक निर्माण झाली होती. कित्येक जणांनी ही कार्यशाळा ३ ऐवजी ५ दिवसांची का नाही अशी खंतही व्यक्त केली. खूप प्रश्न , खूप उत्तरे ,सल्ला मसलत झाली. आणि त्या संवादातून पुन्हा नवचैतन्याची कारंजे निर्माण झाले. सरांच्या हस्ते कार्यशाळेचे प्रमाणपत्र हाती घेताना समाधान व आनंद हे दोन्ही भाव एकत्र येत होते. संध्याकाळच्या समोसा पार्टीसोबतच या ३ दिवस सुरु असलेल्या कार्यशाळेची सफल सांगता झाली.


- रुपाली ठोंबरे

Wednesday, December 7, 2016

चौकोनातून बाहेर

एक भरपूर प्रशस्त आणि सोयी-सुविधांनी समृद्ध नाही पण छान, स्वच्छ हॉटेल(गोल्डन  वॅली रिसॉर्ट ,ठाणे ) ...पार्किंगसाठी बऱ्यापैकी जागा उपलब्ध, छोटेसे मैदान,एक स्विमिंग पूल... मुंबईतच म्हणून जवळच असल्याने सर्वांनाच बऱ्यापैकी ही जागा आवडली. आम्ही एकूण १४ जण.... रोजच्या धकाधकीच्या जीवनातून आज नवे काही अनुभवण्यासाठी आणि फक्त मज्जा करण्यासाठी आलेलो. ऑफिसमधल्या रोजच्या त्याच त्या मिटींग्स, सॉफ्टवेअर्स,कोड, बग्स, क्लाएंट या सर्व गुंत्यात गुरफटून गेलेलो आम्ही आज बाहेर आलो होतो....एकाच टीमचे पण नेहमी आपल्या आपल्या कामात गुंग असणारे... एका टीम आउटिंग साठी....टीम-बिल्डिंग साठी.

गेले कित्येक महिन्यांपासून फक्त बोलण्यांत कधीतरी डोकावणारा प्लॅन एक आठवड्यापूर्वी रोजच्या संभाषणात येऊ लागला. आणि सर्वानीच उमेदीने आपापल्या परिने पुढाकार घेऊन त्या दृष्टीने आपापले मत मांडण्यास सुरुवात केली. कितीदा तरी मतभेद देखील झाले. पण सरते शेवटी एकदाचे एकमत झाले. एक जागा ठरली ... एक तारीख ठरली आणि आणि आज आम्ही त्या जागेवर सकाळीच एकत्र जमलो. न्याहारीची व्यवस्था हॉटेलमध्येच होती. पोहे, डोसा , ऑम्लेट अशा चविष्ट न्याहारीवर सर्वानीच एकत्र ताव मारला आणि मग मैदानात जमलो.

घरसंसाराच्या रहाटगाडयात सतत असणारे आम्ही आज काही वेळातच अगदी सहज बालपणात शिरलो. लगोरी, क्रिकेट अशा खेळांमध्ये अगदी चुरशीचा सामना रंगला.कधी एकमेकांशी भांडलो तर कधी समजूतदारीने एकमेकांना सांभाळूनही घेतले.टीम-बिल्डिंग म्हणजे नक्की काय असते? हेच तर असते... कितीही मतभेद झाले, भांडणे झाली तरी एकमेकांना सांभाळून घेणे. १ मिनिटाचे असे देखील अनेक खेळ झाले. अगदी एकमेकांना डोळे मिटून साडया नेसणे , टिकल्या चेहऱ्यावर लावणे, टाय बांधणे, एखाद्या उत्पादनाची जाहिरात करून दाखवणे, वेण्या घालणे असे कितीतरी प्रकार करायचे आणि तेही एक मिनिटात. खूप मज्जा आली. सर्वांचाच सहभाग कुठेतरी होत असल्याने कोणीही दुर्लक्षित राहिले नाही. इतके खेळून झाल्यावर आता पोटात कावळे ओरडायला लागले आणि आम्ही दुपारच्या जेवणासाठी पुन्हा डायनिंग एरियात आलो. शाकाहारी, मांसाहारी दोन्ही प्रकारचे स्वादिष्ट गरमागरम जेवण समोर हजर होते...सर्वानीच यथेच्छ ताव मारला. पिकनिकची सफलता त्या दिवसाच्या जेवणावर अवलंबून असते हे मात्र तितकेच खरे.

जेवणानंतर सुस्तावलेल्यांना ताजे करण्यासाठी डम्ब चॆरेड्स ची एक फेरी झाली. दोन्ही संघ आपल्या स्मरणशक्तीवर ताण देऊन कठीणात कठीण चित्रपटाचे नाव शोधून समोरच्याला हरवण्याचा प्रयत्न करत होते. यात ' दुल्हन वही जो पिया मन भाये' या कोणीही कधीही न ऐकलेल्या चित्रपटाने तर धमालच केली...आणि तो आता सर्वांना चांगलाच लक्षात राहील. लहानपणीच्या चमचा-निम्बू , तीन पायांची शर्यत अशा स्पर्धा आज खेळताना शाळेत स्पोर्ट्स डे मध्ये उभे आहोत कि काय असाच भास झाला. त्यानंतर स्वीमिंग पूलमध्ये पोहणार्यांनी पोहून तर इतरांनी नुसतेच पाण्यात खेळून मज्जा केली. नाचगाणे आणि पिकनिक यांचे जणू साटेलोटेच असते हे नाचणार्यांनी सिद्ध करून दाखवले ... पुढे इतके घरून उचलून आणलेले बॅडमिंटन उपयोगात यावे आणि वेळही उरला होता म्हणून त्यातही कित्येकांनी स्वतःला गुंतवून घेतले. शेवटी चहासोबत गरमागरम भजी आली आणि त्यासोबतच त्या मजेदार दिवसाचा आनंदात शेवट झाला.

संध्याकाळी ७ पर्यंत घरी परतलो पण आज येताना खूप काही घेऊन आलो असे वाटत होते. इतक्या वर्षांत हरवलेलं बालपण आज पुन्हा एकदा रांगत आयुष्यात आलं होतं. रोज भेटणाऱ्या सहकाऱ्यांसोबत एक नवे नाते निर्माण झाले होते. आयुष्याच्या एका वाटेवर मनाला ताजे करणारी अशी एखादी तरी पिकनिक असावी. आणि ती सतत आपले बालरूप घेऊन अधूनमधून समोर येत राहावी. जागा, इतर सोयीसुविधा महत्त्वाच्या नसून आपली आनंद लुटण्याची इच्छा किती प्रबळ हे अधिक महत्त्वाचे हे मात्र आज पटले. ऑफिसमधल्या त्याच चौकोनी वातावरणात रोज घुटमळणारा जीव कधीतरी अशा मोकळ्या हवेत मुक्त केला पाहिजे... मग बघा रोजच्या घुसमटीतही एक प्रकारचा नवा आनंद, समाधान अवचितच मिळू लागेल आणि त्यासोबतच आयुष्याचे कधीकधी कंटाळवाणे वाटणारे क्षणही हवेहवेसे होऊन जातील.


- रुपाली ठोंबरे.

Blogs I follow :