Tuesday, December 29, 2015

लग्नशुभेच्छा … दादा आणि वाहिनीसाठी ।

" आज तुमच्या जीवनातील 
एक अनमोल दिवस 
स्वप्नांतून सत्यात उतरणारा 
एक शानदार दिवस "
 
शहनाईच्या सूरांत ,
अन पुष्पांच्या सहवासात ,
पार पडणारा हा शुभदिन 
यावा तुम्हां उभयतांच्या जीवनी सतत ।

दोन पुष्पांचे हे मिलन,
एक नाजूक विवाहबंधन ,
आज बांधले म्हणून ,
सुखी राहावी ही मनांची गुंफण ।

या पुष्पांच्या परिमळाने ,
सुख-दुःखांच्या संगतीने ,
एकमेकांवरच्या प्रीतीने ,
उजळावे सोनेरी भविष्याने ।

हीच सुंदर , गोड शुभेच्छा ,
आजच्या आनंदमयी सुदिनी ,
दादा-वहिनी, तुम्हां देण्याची इच्छा ,
आहे या छोट्या बहिणीच्या मनी ।

- रुपाली ठोंबरे .

Friday, December 25, 2015

गारवा... भासतो रोज नवा


थंडीतली पहाट, आणि तिच्यासोबत वाऱ्यासवे येणारी धुक्याची लाट मनात एक ताजा उत्साह निर्माण करत आयुष्यात जेव्हा येते तेव्हा नकळतच या गारव्यात शब्द फुटतात आणि स्वरलयींवर विहरत सभोवताली पसरतात .


पहाटेची थंड दुलई, 
झोंबणारा गारवा 
 रोज भासतो नवा, 
वाटतो तो हवा हवा 

दिशदिशांत विहरल्या,
 गार त्या हजार लाटा 
हरवल्या धुक्यात साऱ्या, 
दिशांतल्या पाऊलवाटा 

माळरानी पानोपानी बहरले, 
सोहळे हिरवे नवे 
फूलपान नटले सारे आज, 
सप्तरंगी अनंत दवांसवे 

पावलांस स्पर्श दवबिंदूंचा, 
मनात दाटे मृदू ओलावा 
शिळ घालीत येई वारा , 
दूर जणू वाजे हरीचा पावा 

अशा गारव्यातही 
ऊन कोवळे वाटे हवे 
रोजचेच असूनही सारे 
रोज वाटावे जग नवे 

- रुपाली ठोंबरे . 


Sunday, December 20, 2015

मैत्रिणी...एक अनोखा नजराणा !

कविता लिहिण्याचा छंद तसा मला शाळेत असतानाच जडलेला. पण त्याला पुन्हा खतपाणी मिळाले मी इंजिनिअरींगला असताना. अगदी अनोख्या पद्धतीने मी याला जोपासले.फ्रेन्डशिप-डे असो किंवा बर्थ-डे , छोट्या मोठ्या भेटवस्तू मैत्रिणींकडून मिळत राहायच्या. मलाही वाटायचे की त्यांनाही काही आपल्याकडून निराळे असे काही द्यावे. पण काय ? खूप विचार करायचे…आणि मग एकदा एक युक्ती सुचली. ज्याही मैत्रिणीला भेट द्यायची तिचे नाव(अर्थ),स्वभाव (तो इतके दिवस सहवासात राहून सहज  लागतो),तिचे व्यक्तिमत्त्व,तिच्या सोबतच्या आठवणी आणि मला तिच्याबद्दल वाटणाऱ्या भावना या सर्व अस्तित्त्वात असणाऱ्या गोष्टींना माझ्या कल्पनांचा आणि शब्दांचा नाजूक मुलामा देऊन त्यातून तितकीच सुंदर पण भावनिक ओढ निर्माण करणाऱ्या कवितेची निर्मिती करावी. हे काहीतरी मनात सुचलेले बुद्धीलाही पटले आणि जमेल तेव्हा आणि असा योग घडून आला त्या प्रत्येक वेळी मी अशी एकेक मैत्रिण कागदावर उमटवू लागली. असा बऱ्याच जणींच्या चेहऱ्यावर स्मित आणणारा असा हा बराच संग्रह इतक्या वर्षांत कॉलेज, परिक्षा, नोकरी, लग्न या सर्वांच्या जबाबदारीच्या ओझ्याखाली पार खाली राहून गेला होता. तोच जणू आज गवसला आणि इथे तसाच्या तसा अवतरला…मैत्रिणी… जसा एक अनोखा नजराणा…   !

कविता
या जीवनात असंख्य कविता आल्या 
ज्या मी रचल्या , वाचल्या आणि गायल्या 

पण त्यांतुनी एकच निराळी 
मला खूपच आवडली 

शब्दांतून न व्यक्त करता येणारी 
कल्पनांतून हकीकतेत उतरलेली 

तिच्या प्रत्येक कृतीत दडलेला असे अर्थ 
नाही कोणत्या गोष्टीत लपलेला स्वार्थ 

सदा धडपडे जीवनास करण्या सार्थ 
नसे काही तिच्यापाशी जे असे व्यर्थ 

न वाचता येणारी पण समजून घेता येणारी 
कित्येक सद्गुणांना स्वतःत सामावून घेणारी 

कोणालाही आवडणारी अशी ही 
दुसरी कोणी नसून आहे माझीच एक सखी 

आली ही माझ्या जन्मात चुकून 
राहते संगे एक प्रिय सखी बनून 

खरंच धन्य असे तो कवी 
ज्याने अशी ही कविता निर्मिली 


स्नेहा 

आजच्या या सुदिनी जगाच्या बगिच्यात 
एक स्नेहरूपी कळी जन्मास आली 

शांत अशा चेहऱ्यावर हास्याची नाजूक झलक 
जणू उमलते तिची एकेक पाकळी 

आज आमच्याच गुच्छ्यात ,स्नेहाच्या सहवासात 
जाणीव असे तिच्या अस्तित्त्वाची 

मी ही या फुलांत वावरणारी एक कळी 
सदा ही स्नेह्कळी फुलत राहावी ही इच्छा जिच्या मनी 

माझी ही छोटीशी आठवण म्हणून स्वीकार कर 
ही भेट न कोमेजणाऱ्या शब्द-फुलांची 

तुझ्यावरी असावा सर्वांसह देवाचाही स्नेह्वार्षाव 
अन सदा या वर्षांत फ़ुलत राहावी … ही एकच आज देवापुढे मागणी 



मधुरा 

तू आहेस मधासारखी गोड 
नाही तुला कोणाचीही तोड 

आलीस तू माझ्या जीवनात चुकून 
राहतेस संगे एक प्रिय सखी बनून 

तुझ्या ठायी असे माधुर्य आणि चातुर्याचा संगम 
अशी ही मैत्रिण मज लाभली जीवनात प्रथम 

तुझी मैत्री कधी तोडवीशी न वाटे 
म्हणूनच आज ही छोटीशी भेट मी देते 

पण स्वीकार करता दे मला वचन 
भविष्यात कधी विसरणार नाहीस मला चुकून 


प्राची 

सूर्य मावळता जणू दही दिशा हरवती ,
तो एकच दिन मोलाचा ,
जेव्हा जगात एक नवी दिशा जन्माला आली 

ही प्राची जन्मत घेऊन आली ,
सूर्य ज्ञानरुपी प्रकाशाचा ,
हा सूर्य कधी न मावळावा हीच देवापुढे मागणी 


रुपाली 

एकाच नावात दडली तुझी अन माझी प्रीती 
खरंच अशी अनमोल आहे तुझ्यासंगे माझी मैत्री 

आजही ते सारे दिवस आठवतात 
जे रुपाली या एकाच हाकेला साद देतात 

तुझ्या संगे घालवलेला एकेक क्षण 
स्मृतीत साठले गोड आठवांचे तारांगण 

सुखदुःखाच्या वेळी फक्त तुझाच असे एक हात 
आज सर्वांत मिसळली कारण होती तुझीच एक साथ 

दीर्घ सहवासाची आपण कितीतरी पाहिली होती स्वप्ने 
मन दुभंगले तुटता सारे , का हा खेळ खेळला नियतीने ?

पण आजही अन उद्याही तू संगे राहशी 
कारण तुझ्यासारखेच नाव माझेही रुपाली 

रूपाने आणि गुणांनी आहेस तू रूपवान 
खरेच आहे हे ,नाही फक्त खोटे गुणगान 

तुझी मैत्री कधी तोडवीशी न वाटे 
म्हणूनच आज ही छोटीशी भेट मी देते 

पण स्वीकार करता दे मला वचन 
भविष्यात कधी विसरणार नाहीस मला चुकून 


- रुपाली ठोंबरे. 

Sunday, December 13, 2015

लग्न म्हणजे काय आहे ?

काही दिवसांपूर्वी एक लघुकथा वाचनात आली.…एका अशा मुलीची, जिचे होणारे लग्न पत्रिकेच्या गुणदोषांमुळे रद्द झाले आणि याच पत्रिकामिलनाच्या , ग्रहताऱ्यांच्या ,ज्योतिष्यांच्या भरवश्यावर घरच्यांकडून तिचे दुसरीकडे सूर जुळवले गेले…. परंतू पुढे जेव्हा नव्याने गुंफलेले हे नात्याचे जीवनगाणे बेसूर होऊ लागले तेव्हा मात्र या ग्रहांनी किंवा जुन्या नात्यांनी कोणीही कोणतीही साथ दिली नाही… आणि संसार अर्ध्यावरच मोडून नशिबाची एक नवी व्याख्या तिच्या आयुष्यात जन्मास आली. या लघुकथेवरूनच सुचलेले काही…. कदाचित हेच त्या कथेतील नायिकेनेही अनुभवले असेल….तिलाही कधीतरी असेच वाटले असेल.


लग्न म्हणजे काय आहे ?
लग्न म्हणजे काय आहे ?
सुखी संसाराचा मांडलेला थाट आहे
की डाव आहे पत्रिकेचा … खेळ हा ग्रहताऱ्यांचा ?


प्रीतीपाखरास जरी फुटले नाहीत पंख अजुनी
घडून येते मिलन हे, जुळले सारे अंक म्हणुनी

लग्न म्हणजे काय आहे ?
लग्न म्हणजे काय आहे ?
नव्या आयुष्याचा सोनेरी आरंभ आहे
की काळ आहे स्वातंत्र्याचा…शेवट हा साऱ्या इच्छांचा ?


आवडतेही नकोसे व्हावे कुंडलीची साथ नसता
अशा दुर्भाग्यातून शुभ चिंतावे का अट्टहास असा

लग्न म्हणजे काय आहे ?
लग्न म्हणजे काय आहे ?
नवनात्यांच्या कसोटीतला सुंदर क्षण आहे
की भावी सुखाची ग्वाही देणाऱ्या ज्योतिषाचा …निकाल हा शनी-मंगळाचा ?



 -  रुपाली ठोंबरे.







Monday, December 7, 2015

तो मला आणि मी त्याला पाहत उभे


रात्रीचे ११ वाजले. काळोखाची चादर नक्षत्रांची रुपेरी नक्षी घेऊन जगावर पांघरली जात होती . अंगाशी बिलगून जाणाऱ्या गारव्यासंगे येणाऱ्या दारावरच्या मधुमालतीचा सुगंध मनाला नेहमीसारखाच धुंद करत होता….जणू तो झोपी जाण्याचा नियमित संदेश देत होता . रातकिड्यांच्या किरकिरीतही एक मुग्ध शांततेचा आभास होत होता. एव्हाना आमच्या घरातही आवारावर सुरु झाली होती . हळूहळू सारे घरच निद्रेच्या अधीन झाले . आणि मग मीही बाळ झोपी गेल्याची शाश्वती करून घेत हळूच त्या खोलीत शिरले. खोलीत पसरलेला अंधार खिडकीतून आत डोकावू पाहणाऱ्या चांदण्या कवडश्याला अगदी आनंदाने सामावून घेत होता. मी लाईट लावला आणि क्षणात त्या दोघांचे अस्तित्वच नष्ट झाले . आता लख्ख प्रकाशात सर्व भिंती चमकत होत्या. सगळीकडे सर्व काही अस्ताव्यस्त दिसत असले तरी एक विचित्र रचनेत असलेली ती खोली मला नित्य प्रिय होती.

मी मनाशी ठरवल्याप्रमाणे जास्त वेळ न दवडता थेट त्याच्या समोर जाऊन थांबले. तो त्याचा पांढराफटक चेहरा घेऊन तिथेच ऐटीत उभा होता. काल घरी आल्यापासून त्याच्याकडे लक्ष द्यायला मुळी वेळच न मिळाल्याची मनाला कालपासून डसलेली अस्वस्थ खंत आता धुसर होत होती.क्षण…मिनिट… जवळजवळ कितीतरी वेळ तो मला आणि मी त्याला नुसते पाहतच होतो. दोघांच्याही चेहऱ्यावर एक वेगळीच उत्सुकता जाणवत होती. माझ्या मनात येईल त्या दिशेला त्याला वळवून त्याच्या विविध मुद्रा पाहण्यात मी गुंग झाले. तो ही निमुटपणे माझ्या हालचालींना न्याहाळत मख्खासारखा उभा होता. एकदम पेटून उठलेल्या मोहोळाप्रमाणे मनात कितीतरी विचार त्याक्षणी घोंगावत असले तरी माझ्या अचूक भावनांना वाट मोकळी करण्यास का कुणास ठाऊक मन पुढे धजावत नव्हते. स्वतःला व्यक्त करण्यात मला खूप वेळ लागत होता. त्याच्यावरची नजर जराही न हलवता त्याला पाहता पाहताच एक दोन पुस्तके चाळली…मोबाईलवरच इंटरनेटच्या फाइली डोळ्यांसमोरून नेल्या आणि काहीसे गवसल्यागत मी पुन्हा त्याच्याकडे धावून आले.

त्याच्याकडे पाहताना कधी असे वाटे कि तोही माझ्याइतकाच फार उत्सुक आहे तर कधी वाटे थोडा घाबरलेला असेल… पण आता त्याचे भविष्य खरेच माझ्याच हाती आहे ही जाणीव मनाला पुन्हा एकदा झाली आणि मीही नव्या उमेदीने पुढे सरसावले . त्याच्या त्या निर्विकार चेहऱ्यावरून हळूच हात फिरवत असताना त्याने इथपर्यंत येण्यासाठी किती यातना भोगल्या असतील याची जाणीव सहज मनाला स्पर्शून गेली. खरेतर मी कोणी मोठी चित्रकार नाही पण तरी आज मी याला नवे अस्तित्व देणार होते , नवे रंग ,नवे रूप… सर्वच अगदी निराळे,जगावेगळे देणार होते.

मनाशी काहीसा विचार करत मी हलक्या हाताने त्याच्यावर काही रेखाटले. पण तत्क्षणी त्याचा तो पडलेला, उदास चेहरा लगेच माझ्या ध्यानी  आला…. काहीतरी चूक झाली हातून . म्हणून थांबले...सावरले थोडे ... त्यालाही आणि मला स्वतःलाही. पुन्हा नव्याने नवे आकार काढू लागले तसे त्याची गालावरची खुललेली खळी हलकेच मला जाणवली आणि ती पाहून माझ्याही चेहऱ्यावर एक स्मित हलकेच उमलले. लाल ,केशरी ,पिवळ्या ,निळ्या जांभळ्या अशा नाना रंगाचा कुंचला त्याला जसजसा स्पर्शून जात होता तसतसा तो आणखी टवटवीत दिसत होता.त्या मध्यरात्री जेव्हा अवघी अवनी निद्रेच्या खोल डोहात शिरून स्वप्नांच्या दुनियेत शिरत होती पण मी मात्र जागेच होते एखाद्या रातराणीपरी … माझ्या स्वप्नातल्या दुनियेला इथे जगासमोर दिलखुलासपणे मांडण्यासाठी, मनातल्या भावना मुग्धपणे त्याला सांगत मी या रंगसोहळ्यात अगदी तल्लीन झाले होते. सोहळाच तो … जणू होळीच… रंगांची , नव्या कल्पनांची ,गडद-पुसट छटांची,आनंदाची,स्वप्नांची,भावनांची….  मी मला आवडतील त्या रंगांची त्याच्यावर अगदी मुक्तपणे उधळण करत होते आणि तो ती अचूक झेलून घेत दुपटीने माझ्यावर आनंदाची उधळण करत होता.

शेजारच्या माशिदीतून येणाऱ्या अझानचे ते पहिले स्वर कानी पडले तसे रात्रीच्या या रंगलेल्या खेळातून बाहेर पडण्याची वेळ आली असे प्रकर्षाने जाणवले. सहज खिडकीतून बाहेर डोकावले आणि त्या पूर्वेकडून पार डोंगराडून येणाऱ्या सुर्यनारायणाचे दर्शन या नेत्रांस घडले तसे झोपेचे अस्तित्वच आता नष्ट झाले ही चाहूलही मनास लगेच लागली. प्राजक्त अंगणात आता सांडला होता … त्याचा तो मंद सुगंध आता रात्रीच्या रातराणीलाही लाजवेल अशा अविर्भावात चोहीकडे पसरत होता. पक्ष्यांची किलबिल एक नवा उत्साह निर्माण करत आकाशी झेपावत होती. आकाश… सप्तरंगांत न्हाणारे … जसे माझे चित्र… कॅनवासवरचे.… काल रात्री काढलेले… पांढऱ्या रंगावर मात करत उमेदीने  नव्या रंगांमध्ये नटलेले…उगवणाऱ्या नव्या पहाटेची किरणे अंगावर पांघरून अधिकाधिक नवे वाटणारे …

आजही तो असा ऐटीत पण आत्मविश्वासाने समोर उभा आहे… मुग्धपणे एक संवाद नव्याने साधत. त्या अडगळीच्या खोलीतून थेट दिवाणघरात प्रवेश मिळाल्याने स्वारी भारीच खुश आहे. असे आनंदाचे उधाण यायलाच हवे कारण आता तो मख्खपणे उभा राहणारा नुसता निस्तेज कॅनवास नाही तर येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेणारे ,एक गूढ सदा नव्याने सांगणारे अर्थपूर्ण चित्र आहे.

क्षण… मिनिट… जवळजवळ तासभर तो मला आणि मी त्याला पाहत आहे. पण या नजरेत आता एक कृतज्ञता, समाधान, प्रसन्नता दडली आहे आणि ती मला सहज जाणवते आणि कदाचित त्यालाही.

- रुपाली ठोंबरे

Thursday, December 3, 2015

विरामचिन्हे

प्रवीण दवणे यांचे 'विरामचिन्हे' म्हणजे सुगंध, मेनका ,पुढारी ,गोमंतक ,साहित्य मैफल ,लोकप्रभा अशा दिवाळी विशेषांकांत पूर्वप्रसिद्धी लाभलेल्या लघुकथांचा एक सुंदर संच…. वेगवेगळया व्यक्तिमत्वांचे ठसे वाचकांच्या मनात खोल उमटवणारा….आणि या पुस्तकाच्या १५५ पानांत आपल्याला भेटते आणि काही क्षणांसाठी स्तब्ध करते….


साहित्य अकादमीत विशेष पारितोषिक मिळूनही नवऱ्याकडून हव्या तशा अभिनंदनाप्राप्तीसाठी आसुसलेली वसुंधरा.

स्त्री-व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम म्हणून घरी साप पाळणारी सुकन्या.

आयुष्यातील दुःख,एकाकीपण कुरवाळत बसण्यापेक्षा पार समाजापलीकडे जाऊन वयाच्या पासष्टीतही नव्याने पती आणि बाबा होण्याचे सुख अनुभवणारे प्रधानसाहेब हे दृढ व्यक्तिमत्व .

एका नातेवाईकाकडे नोकरी मिळण्याच्या आशेने आलेला पण तिथेच जन्मभर घरगडी बनून राहिलेला सदाचे केविलवाणे जिणे.

 पोस्टमनच्या एका चूकीमुळे जन्मास आलेल्या नव्या नात्याला आकार देऊ पाहणारी मधुरा वर्दे.

अत्तराचा सुगंध देऊन एका लेखकाच्या कलेला वंदन करणारी एक अनामिक रसिका.

पत्रिकेमुळे नियतीने बांधलेली गाठ सांभाळता सांभाळता शेवटी थकून ती सोडवणारी उर्मिला.

विद्यार्थ्याशी असलेले नाते आणि त्यातून उद्भवणारी अपरिचित अफवा अशा क्षितिजावर उभी असलेली अरुंधती.

पावसात भिजलेल्या कुत्र्याच्या पिल्लाशी निर्माण झालेल्या अनुबंधातून सुखावलेली स्नेहा.

एका अनोख्या समजुतीवर टिकणारे,फुलणारे राणे आणि त्यांच्या पत्नीतील एक प्रेमळ नाते.

सेवानिवृत्ती आणि पत्नीनिधना नंतर येणाऱ्या एकाकीपणातूनही मार्ग काढत जीवनात सुंदर क्षणांचे कारंजे निर्माण करणारे शिरगोपीकर आणि त्यांच्या अनंत प्रवासाची कहाणी.

एखाद्या रातराणीसारखी पण प्रेमातही समाजाचे भान ठेवू पाहणारी मार्गारेट .

रंगरुपामुळे नेहमी नाकारली जाणारी पण एक वेगळीच ओढ निर्माण करणारी चिमुकली अरुंधती .

एका ठोकळ्यास्वरूप माणसासोबत संसाराचा हातगाडा चालवता चालवता येणारा हृदयद्रावक शेवट अनुभवणाऱ्या जोगळेकरवहिनी.

पत्नीचा मृत्यू आणि त्यासोबत नकळतपणे संसाररूपी गत आयुष्याचा हिशोब करणारे वामनराव आणि त्यातून आयुष्याच्या शेवटी गवसलेली जीवनाची एक नवी उर्मी .

सर्वगुणी असूनही आदर्श विद्यार्थिनीचा पुरस्कार परत करणारी आणि पुन्हा तोच अधिक मानाने परत मिळवणारी मुग्ध सानप.

हे पुस्तक म्हणजे किती तरी तास आपल्याला रमवून ठेवणारा ,नकळत चेहऱ्यावर हसू आणणारा , काही प्रसंगी मनात चीड आणणारा , गहिवरून टाकणारा आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनाच्या शिशिरात आलेला जणू वसंतच.

- रुपाली ठोंबरे.









Blogs I follow :