Monday, March 28, 2016

मनशक्ती...जीवनसाराचा अखंड झरा

" आपली मुले ही उत्क्रांती नियमानुसार हुशार आहेतच पण आपल्याला फक्त हुशार मुलेच हवी का ?" हा प्रश्न मागच्या आठवड्यात खारघर येथे मनशक्ती या केंद्रातर्फे आयोजित केल्या गेलेल्या मेंदुक्रांती या कार्यशाळेमध्ये विचारलेला. आणि उपस्थितीत असलेल्या १ ते ७ वयोगटातील मुलांच्या सर्व पालकांनी एका सूरात 'नाही' असे उत्तर दिले. आश्चर्य वाटले असेल ना ऐकून कि असे कोणते पालक आहेत ज्यांना आपली मुले हुशार नकोत. पण प्रश्न पुन्हा वाचल्यास समजेल कि 'फक्त' या एका शब्दाने उत्तर पूर्णपणे बदलले आहे . तर मग मुले कशी असावीत तर प्रज्ञावान,मेधावी, संस्कारीत, सर्वगुणसंपन्न ,अष्टपैलू असे कितीतरी शब्द त्या सभागृहामध्ये घुमू लागले. प्रत्येक आईवडिलांना हवी असलेली अशी ही मुले कशी निर्माण करता येतील, मुलांच्या विकासाचा आराखडा, भावनांकाचे महत्त्व, उपाय अशा मुलांशी निगडीत विविध विषय या कार्यशाळेत उलगडले, त्यावर चर्चा झाली, विविध दाखले देऊन काही अंशी पालक कसे चूक असतात तेही समजावून देण्यात आले. पालकत्त्वाच्या नेमक्या भूमिकेचं उत्तम विश्लेषण ऐकून दिवस सत्मार्गी गेला असेच वाटले शेवटी.

काही दिवसांपूर्वीच एका शालेय मित्राकडून समजलेली ही कार्यशाळा. तसे पहिले तर यापूर्वीही लोणावळा येथे मनशक्तीने आयोजित केलेले १-२ वर्ग केले होते म्हणून आणि कार्यशाळेचा विषय यांमुळे यात नेमके काय असेल याची कल्पना होतीच.पण येताना १०% जरी उपयोग झाला तरी वेळ मार्गी लागेल असा विचार करणारे आम्ही जाता जाता इतके काही घेऊन जाऊ असे वाटले नव्हते. प्रत्येक पालकाने ग्रहण करावी अशी चांगल्या विचारांची शिदोरी घेऊन आम्ही घरी आलो होतो.

आजच्या जगात जिथे फक्त मुलांच्या बौद्धिक विकासाला महत्व दिले जाते तिथे भावनिक, शारीरिक आणि मानसिक विकास किती महत्त्वाचा आहे हे मनापासून पटले. या स्पर्धामयी जगात वावरताना वाढत असलेल्या स्पर्धेचे बहाणे देत अपेक्षांचे भले मोठे ओझे त्या इवल्या पंखांवर लादताना प्रत्येकाने एकदा स्वतःलाच विचारावे " नक्की स्पर्धा कोणामध्ये ?…. मुलामुलांमध्ये कि पालकापालकांमध्ये." अनेक पालकांच्या समस्यांमध्ये मुलांमध्ये असलेल्या भीती आणि राग या दोन दुर्गुणांचा कायम उल्लेख. हे दोन्ही गुण कायम संपुष्टात येत नाहीत तर त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत… भीतीला धैर्याची जोड देऊन तर रागाला शांतीची जोड देऊन . असे कितीतरी चांगले विचार आणि त्याचे पटण्याजोगे विश्लेषण या मनशक्तीच्या कार्यशाळेत अनुभवले.

"मनशक्ती" , संस्थापक 'विज्ञानानंदानी मांडलेल्या 'न्यू वे ' तत्त्वज्ञानातून जन्मास आलेली प्रयोगशाळा जिथे न्यूटोनियन मेकॅनिक्सपासून क्वॉन्टम् आणि इपीआर पॅराडॉक्सपर्यंत, जीवशास्त्र, मानसशास्त्र, सूक्ष्म मानसशास्त्र, पदार्थ विज्ञानशास्त्र, शिक्षणशास्त्र, तर्क, गणित इत्यादी एकूण २८ विज्ञान शाखांच्या आधारावर प्रयोग केले गेले. गर्भसंस्कार, बालसमस्या , मत्सरघातमुक्ती, कुटुंबसंवर्धन अशा अनेक विषयांवर आधारित अभ्यासवर्ग, कार्यशाळा, पुस्तके यांचा अर्थपूर्ण आणि या वैज्ञानिक जगातही मनाला पटणार असा अलौकिक नजराणा … या राष्ट्राच्या कल्याणासाठी.कारण आजची पिढी ही जरी तुमची मुले असतील तरी ही संपत्ती आहे राष्ट्राची… उद्याच्या भारताच्या भावी विकासाची, असे मानणारी एक निस्वार्थ संस्था.

पुणे-मुंबई महामार्गावर प्रवास करणाऱ्या बहुतेक जणांना या केंद्राबद्दल माहित असेलच कारण ' मनशक्ती' केंद्र हे मुंबई -पुणे एक्स्प्रेस हायवेवरच आहे. पण तिथल्या ज्ञानाच्या प्रकाशापेक्षा तिथे मिळणाऱ्या जेवणाची चव येणाऱ्या जाणाऱ्या पांथस्थांमध्ये अधिक प्रिय आहे. पण जरा २ पावले पुढे आलो तर तिथे वाहणारा जीवनास उपयुक्त असा ज्ञानाचा झरा दृष्टीस पडेल ज्यात प्राशन करता येण्यासारखे बरेच काही आहे…'जीवनाचे सार' म्हटले तरी अयोग्य नाही.


- रुपाली ठोंबरे .

Tuesday, March 22, 2016

साजरी करू…ही पुष्पपंचमी


काल मुलाची डायरी उघडली आणि आजच्या नव्या पानावर त्याच्या शिक्षिकेच्या टपोऱ्या अक्षरांत लिहिलेली  एक सूचना डोळ्यांसमोर आली ," Kindly send colourful flower petals for holi celebration". बघता क्षणी 'होळी आणि फूले' हे समीकरण थोडे विचित्रच वाटले. पण आणखी काही क्षण विचार केला तेव्हा हे माझ्याही बुद्धीस पटले आणि ही कल्पनाही आवडली.



होळी हा सण सर्वांचाच अगदी आवडीचा. वाईट प्रवृत्तींवर चांगल्या गोष्टींचा विजय होतो या दिवशी . गेल्या वर्षीचे सर्व वाईट गोष्टींचे होलिकादहन होते.आणि दुसरा दिवस नव्याने आनंद घेऊन येतो . म्हणून तोही तितक्याच आनंदाने साजरा करायला हवा… पण कुणालाही अपायकारक ठरणार नाही अशा तऱ्हेने.

गेल्या कित्येक वर्षांपासून हा दिवस रंग,फुगे ,पाणी आदी वापरून साजरा केला जातो .खरेच आपल्यासोबतच मांजर-कुत्र्यासारख्या मूक प्राण्यांवर उधळलेल्या रासायनिक रंगामुळे त्यांना नंतर होणारा त्रास क्वचितच एखाद्याच्या ध्यानात येतो. हल्ली रासायनिक रंगांच्या आड गुलालाचा तो गुलाबी रंग कुठेतरी हरवलेला दिसतो. एखाद्याच्या जीवावर बेतेल अशा फुग्यांचा ,रासायनिक रंगांचा वापर टाळून नवे काहीतरी कोणालाही न बाधणारे तरी सर्वाना आनंद देणारे असे काही शोधायला हवे.यावरूनच गेल्या वर्षी घडलेला एक प्रशंसनीय प्रसंग आठवला.

आमचे कुटुंब तसे धुलीवंदनाच्या दिवशी दरवाजे बंद करून घरात बसणारे .… रंग -पाण्यापासून अलिप्त राहणारे. आणि अचानक दरवाजावर थाप ऐकू आली . शेवटी नाही-हो करता करता दरवाजा उघडला तर समोर वरच्या मजल्यावर राहणारे गृहस्थ आपल्या समस्त परिवारासोबत हजर.… हातात रंगीबेरंगी रंगानी भरलेली थाळी … मिठाईचा मोठा पुडा आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचा भाव घेऊन. सुरुवातीला काही कळलेच नाही . त्यांच्या हातातले रंग पाहून आमचे अर्धे कुटुंबीय तर आत लपून होते .पण पुढच्याच क्षणी "होळीच्या खूप खूप शुभेच्छा " अशा शुभेच्छा देत प्रत्येक रंगाचे बोट चेहऱ्यावर लावत एकदम गळ्यातच पडले. आम्हाला नंतर समजले कि त्या थाळीत कोणतेही बाजारी मिळणारे रंग नसून गुलाल,चंदन ,हळद इत्यादी निसर्गाची खरी देण होती. अशा नैसर्गिक रंगानी खेळलेली होळी खरेच खूप आनंददायी आणि अविस्मरणीय ठरली. 

जे फुगे,रंगांबाबत तेच पाण्याच्या अपव्ययाबद्दल. सध्याची परिस्थिती जिथे प्यायलाही कित्येकदा पाणी उपलब्ध नाही तिथे हा फुलांच्या पाकळ्यांचा पर्याय खूपच सुंदर आहे .शिवाय अशा उपक्रमाने फुलांच्या शेतीस आणि अंतिमतः शेतकऱ्यालाच फायदा होतील, जी आजची एक गरज आहे . इतक्या वर्षांपासूनची जुनी प्रथा सोडून कधी हेही नवे काही करून पहावयास हरकत नाही. हे थोडे खर्चिक नक्कीच असेल पण आज पाणी हे जीवन आहे आणि हे जीवन खरेच अनमोल आहे.त्यालाही वाचवण्याचा आटापिटा दाखवला पाहिजे आणि ते वाचवलेच पाहिजे . तेव्हा या वर्षी साजरी करून पाहूया ही रंगपंचमी…पुष्पपंचमी…फुलांच्या मोहक रंगानी रंगलेली.… फुलांच्या मंद गंधाने दरवळलेली .

- रुपाली ठोंबरे

Monday, March 21, 2016

छावा…मराठी इतिहासातील एक अजरामर जीवनपट

राजा छत्रपती शिवाजी महाराज … महाराष्ट्राच्या विशाल इतिहासातील एक अजरामर नाव… मराठी स्वराज्य निर्माण करण्याचे ध्येय मनाशी बांधुन या भारतभूमीच्या रणांगणात उतरलेला एक सिंहपुरुष…तर एक दोनच नव्हे तर एकाच वेळी पाच आघाड्यांवर निकराची पंजेफाड करणारा सेना-धुरंदर, छत्रपती संभाजी हा एक शिवपुत्र छावाच. महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पानांवर आणि मराठ्यांच्या मनात सुवर्ण अक्षरांत आदराने कोरलेले हे दुसरे नाव.

कितीतरी लेखकांनी या महान व्यक्तिमत्वावर बरेच चांगले-वाईट लिखाण केले. पण मराठी साहित्यात संभाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित सर्वाधिक प्रसिद्ध पुस्तकाचा मान मिळतो तो ज्येष्ठ मराठी कादंबरीकार' शिवाजी सावंत ' लिखित 'छावा ' या कादंबरीस. मराठी जगतात असा एकही रसिक सापडणार नाही ज्याने इतर २०-२५ कादंबऱ्या वाचल्या असतील पण छावा नाही. मी ही बऱ्याच वर्षांपूर्वी याचे वाचन केले होते. पण त्यादिवशी पुन्हा 'छावा ' समोर दिसले आणि पुन्हा नकळतच पुस्तकाची पाने चाळली गेली. तोच इतिहास नव्याने वाचताना पुन्हा नव्याने शंभूराजांविषयी आदर वाटू लागला.

खरेतर  १४ मे, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे जन्मलेले संभाजी राजे हे शिवाजी महाराज आणि त्यांच्या प्रथम पत्‍नी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. पण तरीही त्यांचा जीवनकाल अतिशय कठीण होता. जन्मापासूनच बिकट परिस्थितींत अडकत गेले मात्र सिंहाचा पुत्रच तो…येणाऱ्या सर्व परिस्थितींचा निकराने सामना करत हा शूर पुरुष अवघ्या महाराष्ट्राचे प्रेरणास्थान बनले. जन्मतःच सईबाईंच्या निधनामुळे आईच्या दुधास मुकलेले शंभूराजे त्यांची दूध आई बनलेल्या पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ, थोरल्या मांसाहेब जिजाबाई ,सावत्र आई सोयराबाई यांच्यात आई शोधू लागले. संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले.अगदी लहान वयातच अशा काही घटना घडल्या ज्यामुळे त्यांना मोघलांकडे राहावे लागले,वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी शिवाजी महाराजांबरोबर आग्र्यातुन सुटकेचा प्रसंग त्यांनी अनुभवला, संभाजींच्याच सुरक्षिततेसाठी पसरवण्यात आलेल्या 'संभाजीराजांचे निधन ' या खोटया अफवेमुळे फार काळ परक्या ठिकाणी लपून राहावे लागले.इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले.

राज्याभिषेकानंतर अवघ्या १२ दिवसांत झालेल्या जिजाबाईच्या निधनानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज सतत स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते.सळसळत्या रक्ताच्या तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकर्‍यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले.सोयराबाई आणि दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले हे केवळ अण्णाजी दत्तोंच्या याच्या सांगण्यावरूनच झाले.अण्णाजी दत्तों- महाराजांचे अमात्य,अनुभवी आणि कुशल प्रशासक पण तेवढेच लबाड , भ्रष्टाचारी. त्यांच्या विरोधामुळे शंभूराजांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले. आपल्याला दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले गेल्याचा सल मात्र संभाजीराजांच्या मनात कायम राहिला.

पुढे वेगवेगळी कारणे देत सोयराबाई आणि दरबारातील मानकर्‍यांनी संभाजीराजे हे बेजबाबदार प्रशासक आहेत आणि राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत असा प्रचार सुरू केला.या सर्व घडामोडींमुळे अस्वस्थ झालेले संभाजीराजे स्वराज्य सोडून औरंगजेबाचा सरदार दिलेरखान यास जाऊन मिळाले. ही चूक पुढे त्यांच्या ध्यानात आली आणि ते पुन्हा स्वराज्यात आले. शिवाजी महाराजांनी त्यांना या कृत्याबद्दल जरी माफ केले तरी स्वराज्य सोडून जाण्यामुळे त्यांच्यात आणि सोयराबाई, अण्णाजी दत्तो आणि इतर मानकर्‍यांमधील दरी अजूनच रुंदावली. अफझलखान, शाहिस्तेखान यांच्यासारख्या बलाढ्य शत्रूंना खडे चारणारे युगपुरुष शिवाजी महाराज घरातील बेबनावापुढे दुर्दैवाने हतबल ठरले.शेवटी ३ एप्रिल १६८० मध्ये आबासाहेब म्हणजेच शिवाजी महाराजही त्यांना कायमचे सोडून गेले आणि डोक्यावर असलेला मायेचा शेवटचा हातही नियतीने शंभूराजांच्या डोक्यावरून काढून घेतला. या युगपुरुषाच्या अंतिम क्षणी सोयराबाईकडून केले गेलेले कटकारस्थान वाचून तर वाचक स्तब्ध होऊन जातो. त्यानंतर संभाजीराजांना पन्हाळगडावर कैद करण्यात आले. पण सरनोबत हंबीरराव मोहित्यांनी सत्य स्थिती आणि स्वराज्याला त्या क्षणी आलेली संभाजीराजांची निकड ओळखली आणि संभाजीराजांची बाजू घेतली. आणि १६ जानेवारी इ.स. १६८१ रोजी संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला.या सर्व सुखदुखांच्या प्रसंगी संभाजींच्या पत्नी येसूबाईनी दिलेल्या साथीचे सुंदर चित्रण या पुस्तकात केले आहे.

औरंगजेबाने इ.स. १६८२ मध्ये मराठ्यांवर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते.जगातील सर्वांत शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला. मराठ्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाची कितीतरी उदाहरणे संभाजीराजांच्या कालकीर्दीत झाली .संभाजीराजांनी केलेल्या वेगवेगळ्या स्वाऱ्या , लढायांचे पुस्तकात केलेले जोशपूर्ण वर्णन वाचकास नव्या उमेदीने प्रेरित करतात.

पण संभाजीराजांच्या दुर्दैवाने त्यांचे सख्खे मेहुणे-गणोजी शिर्के काही गावांच्या वतनांसाठी शत्रूला सामील झाले.आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांने केलेल्या संगमेश्वरावराच्या हल्ल्यात संभाजी राजे आपले प्रिय मित्र कवी कुलेश सहित पकडले गेले. आणि त्या क्षणापासून त्या दोघांचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरु झाला. बहादूरगडापासून ते पुढे दोघांच्या मृत्युपर्यंतच्या ४० दिवसांचे अतिशय हृदयद्रावक वर्णन कथन करणारी या पुस्तकातील शेवटची २० पाने वाचताना वाचकाच्या मनात संताप आणि डोळ्यांत अश्रू नकळत तरळून जातात. ही निघ्रुण हत्या मार्च ११, इ.स. १६८९ रोजी भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील आळंदीजवळच्या तुळापूर येथे करण्यात आली.पण इतक्या अत्याचारानंतरही संभाजीराजे औरंगजेबासमोर काडीमात्रही नमले नाहीत आणि यातच औरंजेबाचा पराभव सिद्ध झाला.

अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचा उत्तम जाणकारही होता. संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला.संभाजीराजांचे सल्लागार असलेले कवी कुलेश जरी अनेकांना पटले नसतील तरी या मित्राने मरेपर्यंत संभाजीराजांची साथ सोडली नाही… अगदी भयावह प्रसंगांच्या मालिकेतून असेलेल्या कठीण प्रवासातही. पुस्तक मिटताना "मित्र असावा तर असा " असे नकळत मनात येऊन जाते .

एक दोनच नव्हे तर एकाच वेळी पाच आघाड्यांवर निकराची पंजेफाड करणारा हा सेना-धुरंदर! मराठ्यांच्या इतिहासात नवा सेनापती एकमेव संभाजीच होऊन गेला. जंजिरेकर सिद्धी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीन लाखाची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब. या त्या चार आघाड्या. पाचवी आघाडी होती स्वार्थांध स्वजनांची, अगदी घरचीच! विखारी विश्वासघातक्यांची! छावा हे पुस्तक वाचताना शौर्य व साहस यासोबतच उत्तम प्रतिभाशक्तीच्या देणगीने नटलेला असा छत्रपती या महाराष्ट्रास लाभला याबद्दल कृतज्ञता आणि संभाजीराजांबद्दल अतीव आदर या भावनेतच पुस्तकाचे शेवटचे पान उलटले जाईल, यात शंकाच नाही.

- रुपाली ठोंबरे .

Friday, March 18, 2016

कॉफीची एक वेगळीच अदा


समोर होता चॉकलेटी रंगात थोडे वेगळेपण घेऊन आलेला कॉफी रंग.  आणि त्यासोबत घरभर पसरत होता याच कॉफीचा मनाला एक प्रकारचा तजेला देणारा सुगंध . कमी अधिक प्रमाणात पाण्याची सोबत घेऊन कॉफीपासून तयार झालेल्या गडद-फिकट रंगछटा मनसोक्तपणे त्या पांढऱ्या कँनव्हासवर उधळल्या जात होत्या. एका मैत्रिणीला तिच्या निरोपसमारंभात दिल्या जाणाऱ्या एका सुंदर भेटीसाठी.

जेव्हापासून ती जात असल्याची चाहूल लागली, मनास काही तरी हरवून जाईल असे वाटू लागले होते . निदान तिच्या आठवणींत आपण कुठेतरी असावे म्हणून काहीतरी कलात्मक देण्याचे ठरवले . खास मैत्रीण म्हणून आता चित्रातही काहीतरी खास करावेसे वाटत होते. आणि त्याच क्षणी कधीतरी ऐकिवात आलेली "कॉफी पेंटिंग " ची कल्पना सुचली. आणि झाले… इंटरनेट ,पुस्तके असे इथे तिथे शोधाशोध सुरु केली आणि नेस्कॅफे कॉफी , एक-दोन ब्रश आणि कँनव्हास घेऊन मी लगेच सुरुवात केली … काही वेगळे निर्माण करण्यास .

पहिला प्रयत्नच तो. छोट्या-मोठया चुकांमधून वाट काढत शेवटी हव्या त्या ठिकाणी येऊन पोहोचले . जशी उगवत्या सूर्याच्या प्रत्येक किरणासोबत या सृष्टीत रंगबिरंगी फूले उमलत जातात, अगदी  तसेच विविध कॉफी-छटांमध्ये माखलेला तो कुंचला जसजसा कँनव्हासला स्पर्शत गेला, तशी एकाच रंगाची पण विविध मोहक रंगछटांमध्ये भावनांची फूले त्या कँनव्हासवर उमटत गेली. एकेक करत ही फुले इतकी जमा झाली कि त्यांना एका परडीची गरज निर्माण झाली आणि या निकडीतूनच एक परडी इथे समाविष्ट झाली . चित्रकारासमोर जितका वेळ चित्र आणि ब्रश, रंग आदी उपलब्ध असतात , ते चित्र पूर्ण झालेले नसते . तो सतत नवनवीन बदल घडवून आणत त्याच्या कलात्मकतेच्या नजराण्याला अधिकाधिक नवेपण देण्याच्या प्रयत्नात असतो . तसेच काहीसे माझे होत होते. सभोवतालची नक्षी , कोपऱ्यातला पडदा ,धवल रंगाच्या काही दिलफेक छटा हे सर्व त्याचाच सुंदर परिणाम … सुंदरच, कारण या सर्वांतून सुमारे दीड तासाच्या अवधीत " ALL THE BEST " शुभेच्छेसहित निर्माण झालेले हे चित्र पाहून मैत्रिणीने " अप्रतिम" हाच शब्द उद्गारला . . . सोबतीला होता तोच कॉफीचा हवाहवासा वाटणारा मंद गंध, भावनांच्या आणि रंगांच्या निरनिराळ्या छटा घेऊन . 

-  रुपाली ठोंबरे

Wednesday, March 9, 2016

Netbhet ebooks Library: उमटले मनी

Netbhet ebooks Library: उमटले मनी: eBook Title - उमटले मनी (कविता संग्रह)  Publisher - Netbhet Ebooks Library Author - Rupali Thombare Translated by - Catagory - ...


Tuesday, March 8, 2016

गाणं मनातलं

आजच्या महाराष्ट्र टाईम्स च्या गाणं मनातलं या सदरात आलेला लेख


वाचण्यासाठी लिंक : 
ओळख आपल्यातल्या दोन 'मी' ची
 

Monday, March 7, 2016

एक अर्थपूर्ण दर्शन

आज महाशिवरात्री. सर्व भक्तजनांच्या भोळ्या शंकराचा खास दिवस .पहाटेच उठून जवळच्याच शंकराच्या मंदिरात गेले . हातात फूल-बेलपत्रांचे ताट आणि दूध घेऊन शेकडो लोक रांगेत उभे होते .मंदिर फुलांच्या माळांनी छान सजले होते. वातावरण फुलांच्या सुगंधाने आणि शिवस्तुतिच्या मधूर संगीताने प्रसन्न झाले होते. दीर्घ प्रतिक्षेनंतर फूल,बेलपाने आणि दूधाचा सततचा अभिषेक स्विकारत प्रसन्न शिवपिंड पाहिली आणि मनास हायसे वाटले.

 पण माझे लक्ष माझ्या पुढे उभ्या असलेल्या एका तरुणाकडे नकळत वेधले गेले … ते त्याने केलेल्या एका कृतीमुळे . दर्शन तर सारेजण घेत होते पण हा तरुण शिवपिंडीसमोर असलेल्या नंदीच्या उजव्या अंगाला बसून नंदीची दोन्ही शिंगे आणि त्यांवर ठेवलेली तर्जनी आणि अंगठा अशी दोन बोटे, यांच्यामधील पोकळीतून शिवलिंग न्याहाळत दर्शन घेत होता. मला हे दृश्य पूर्वी एका हिंदी मालिकेच्या शिर्षक गीतात पाहिल्यासारखे जाणवले. मी त्याला न राहवून त्याबद्दल लगेच विचारले आणि त्याने उत्तर दिले- शृंगदर्शन.

माझा प्रश्नार्थक चेहरा पाहताच तो हसतच मला म्हणाला ,
" ताई, शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारे तेज हे सर्वसामान्य पूजकाला पेलवणारे नसते, त्यामुळे शिवपिंडीचे दर्शन घेतांना ते नंदीच्या दोन्ही शिंगातून घ्यावे असे शास्त्र सांगते. नंदीच्या उजव्या अंगाला बसून किंवा उभे राहून डावा हात नंदीच्या वृषणावर ठेवावा. उजव्या हाताची तर्जनी (अंगठ्याच्या जवळचे बोट) आणि अंगठा नंदीच्या दोन शिंगांवर ठेवावे. दोन्ही शिंगे आणि त्यांवर ठेवलेली दोन बोटे यांच्यामधील पोकळीतून शिवलिंग न्याहाळावे.नंदीच्या वृषणाला हात लावणे म्हणजे, कामवासनेवर नियंत्रण ठेवण्यास शिकणे. शिंग हे अहंकार, पौरुष आणि क्रोध यांचे प्रतीक आहे. शिंगांना हात लावणे म्हणजे अहंकार, पौरुष आणि क्रोध यांवर नियंत्रण ठेवायला शिकणे. 

आता तुम्ही म्हणाल, याचा काय फायदा? 
तर शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारे तेज सहसा सर्वसामान्य व्यक्‍त‍ीला न पेलवणारे असते. नंदीच्या शिंगांतून प्रक्षेपित होणार्‍या शिवतत्त्वाच्या सगुण मारक लहरींमुळे व्यक्‍त‍ीच्या शरिरातील रज-तम कणांचे विघटन होऊन व्यक्‍त‍ीची सात्त्विकता वाढण्यास साहाय्य होते. त्यामुळे शिवाच्या पिंडीतून बाहेर पडणार्‍या शक्‍त‍ीशाली लहरी पेलवणे व्यक्‍त‍ीला शक्य होते.शिवाय उजव्या हाताची तर्जनी आणि अंगठा नंदीदेवाच्या शिंगांवर टेकवल्याने निर्माण होणार्‍या मुद्रेमुळे भाविकांना आध्यात्मिक स्तरावर अधिक लाभ होतो.
अशा प्रकारे केलेल्या मुद्रेमुळे शक्‍त‍ीची स्पंदने संपूर्ण शरिरात पसरतात.सामान्य व्यक्तीने शृंगदर्शनाविना दर्शन घेतल्यास तिच्यावर शारीरिक,मानसिक आणि अध्यात्मिक दुष्परिणाम होण्याचा संभव असतो."

ही नवी माहिती ऐकत ऐकत जेव्हा नंदीपाशी मी पोहोचले तेव्हा मीही आज शृंगदर्शनाचा अनुभव घेतला. दोन्ही शिंगे आणि बोटांच्या पोकळीतून शिवपिंडीचे दर्शन घेताना एक वेगळेच समाधान मिळत होते. 

इतक्यात तो तरुण नंदीसमोर बसलेल्या एका लहान मुलीला उठवू लागला. 
"बाळा , असे पिंडीचे दर्शन घेत असताना नंदी आणि पिंडीच्या मध्ये बसू अथवा उभे राहू नये.पिंडी अन् नंदी यांना जोडणार्‍या रेषेच्या शेजारी इथे उभी राहा " म्हणत त्याने त्या मुलीला बाजूला उभे केले. 

"शिवाकडून येणार्‍या शक्‍त‍ीशाली सात्त्विक लहरी प्रथम नंदीकडे आकृष्ट होऊन नंतर नंदीकडून वातावरणात प्रक्षेपित होत असतात. नंदीचे वैशिष्ट्य म्हणजे नंदीकडून या लहरी आवश्यकतेप्रमाणेच प्रक्षेपित होत असतात. त्यामुळे पिंडीचे दर्शन घेणार्‍याला प्रत्यक्षात शिवाकडून लहरी मिळत नाहीत; त्यामुळे त्याला शिवाकडून येणार्‍या शक्‍त‍ीशाली लहरींचा त्रास होत नाही. येथे लक्षात घ्यायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शिवाकडून येणार्‍या लहरी सात्त्विकच असल्या, तरी सर्वसाधारण व्यक्‍त‍ीची आध्यात्मिक पातळी अधिक नसल्याने त्या सात्त्विक लहरी सहन करण्याची क्षमता तिच्यात नसते़ त्यामुळे त्या लहरींचा तिला त्रास होऊ शकतो." माझ्याकडे पाहत माझ्या न विचारलेल्या प्रश्नालाही त्याने हवे तसे उत्तर दिले. 

पुढे आम्ही दोघे एकदमच गर्दीच्या इतर लोकांसोबत गाभाऱ्यात पोहोचलो. तिथे प्रत्येकच जण पूजा करून आणि पिंडीला अर्धप्रदक्षिणा घालून बाहेर पडत होते. मीही पिंडीशेजारी पोहोचले. अक्षतांकडे निर्गुण ईश्वरी तत्त्वाशी संबंधित उच्च देवतांच्या लहरी आकर्षिल्या जातात; म्हणून अधिकाधिक निर्गुणाशी संबंधित असलेल्या शिवाला त्याच्या पांढर्‍या रंगाशी साधर्म्य असलेल्या पांढर्‍या रंगाच्या अक्षता,त्याचप्रमाणे शाळुंकेला निशिगंध, जाई, जुई, मोगरा यांसारखी १० पांढरी फुले, त्यांचे देठ पिंडीकडे करून वाहिली. उदबत्ती आणि अत्तर यांतून प्रक्षेपित होणार्‍या गंधलहरींकडे देवतांच्या लहरी लवकर आकृष्ट होतात; म्हणून शिवपूजेत केवडा, चमेली किंवा हीना या शिवाला प्रिय असणार्‍या गंधांच्या उदबत्त्यांनी तीन वेळा ओवाळले. "हळद-कुंकू उत्पत्तीचे प्रतीक आहे; म्हणून लयाची देवता असलेल्या शिवाला इतर देवतांप्रमाणे हळद-कुंकू वाहत नाहीत. तसेच  शाळुंकेच्या स्रोतातून शक्ती बाहेर पडत असल्याने सर्वसाधारण भाविकाने तो स्रोत वारंवार ओलांडल्यास त्याला शक्तीचा त्रास होऊ शकतो; म्हणून शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणाच घालावी", असे एकदा माझ्या आजीने मला सांगितले होते. त्याप्रमाणे मीही अर्धप्रदक्षिणा घातली आणि बाहेर आले. आधीच ठरवल्याप्रमाणे मी सोबत आणलेले दूध एका याचकाच्या मुलाला प्यायला दिले. 

त्या तरुणाचे आभार मानणार इतक्यात त्यानेच मला एक प्रश्न विचारला ," आता काही वेळापूर्वी तुम्ही शिवाला एका विशिष्ट पद्धतीने उपडे बेलपान वाहिले? यामागचे कारण माहित आहे का ?

नक्कीच याबद्दल फारशी कल्पना नसलेल्या मला पुन्हा तो बेलपत्राचे महत्व सांगू लागला. 

" त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रयायुधम् ।
  त्रिजन्मपापसंहारं एकबिल्वं शिवार्पणम् ।।
सत्त्व, रज आणि तम यांमुळे उत्पत्ती, स्थिती अन् लय उत्पन्न होतात. कौमार्य, यौवन आणि जरा या अवस्थांचे प्रतीक म्हणून शंकराला बिल्वपत्र वहावे, म्हणजे या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे जाण्याची इच्छा प्रगट करावी; कारण त्रिगुणातीत झाल्याने ईश्वर भेटतो.शिवाला त्रिदल बेल आवडतो, म्हणजे जो आपले सत्त्व, रज आणि तम हे तीनही गुण शिवाला अर्पण करून समर्पण बुद्धीने भगवत्कार्य करतो, त्याच्यावर शिव संतुष्ट होतो.सर्वसाधारण व्यक्तीला ईश्वराच्या निर्गुण, निराकार रूपाची उपासना करणे कठीण असते. बेल आणि दूर्वा यांसारख्या गुणातीत अवस्थेत राहून कार्य करणार्‍या पत्रींच्या साहाय्याने सगुण भक्ती करत, भक्ताला सगुणातून निर्गुणाकडे जाणे सुलभ होते.बेलाच्या पानाचे देठ पिंडीकडे आणि अग्र (टोक) आपल्याकडे करून जेव्हा आपण बेलपत्र वहातो, तेव्हा बेलपत्राच्या अग्रावाटे शिवाचे तत्त्व वातावरणात पसरण्याचे प्रमाण अधिक असते. या पद्धतीमुळे समष्टी स्तरावर शिवतत्त्वाचा लाभ होतो. याउलट बेलाच्या पानाचे देठ आपल्याकडे आणि अग्र (टोक) पिंडीकडे करून जेव्हा आपण बेलपत्र वाहतो, तेव्हा देठाच्या माध्यमातून शिवतत्त्व केवळ बेलपत्र वाहणार्‍यालाच मिळते. या पद्धतीमुळे व्यष्टी स्तरावर शिवतत्त्वाचा लाभ होतो.बेलाचे पान शिवपिंडीवर उपडे वाहिल्यावर त्यातून निर्गुण स्तरावरील स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित होतात. त्यामुळे बेलाच्या पानाचा भाविकाला अधिक लाभ होतो. शिवाला बेल ताजा न मिळाल्यास शिळा चालतो; परंतु सोमवारचा बेल दुसर्‍या दिवशी चालत नाही."

आज गेली कित्येक वर्षे जग करते म्हणून किंवा आईने सांगितले म्हणून करत असलेल्या शिवपुजेतील कितीतरी गोष्टींचा उलगडा मला झाला. आणि त्या तरुणाचे अगदी मनापासून आभार मानत मी मंदिराबाहेर पडले… एक समाधानाचा प्रसन्न भाव मनात घेऊन.

- रुपाली ठोंबरे 

(या लेखातील बराच माहितीपर भाग http://www.sanatan.org वरून आहे. अशा प्रकारच्या अधिक माहितीसाठी या साईटला त्वरित भेट द्या आणि माहिती मिळावा जे आजपर्यंत माहित नसलेल्या गोष्टींची.)





Tuesday, March 1, 2016

आज १ मार्च....स्व-इजा जागृती दिवस





आज पर्यंत आपण व्हॅलेन्टाईन्स डे,मदर्स डे ,फ्रेन्डशिप डे असे कितीतरी दिवस ऐकले असतील, साजरे केले असतील. पण आज १ मार्च … आज कोणता दिवस असेल ठाऊक आहे का ? विचार करून बघा. नाही माहित ना ? आज आहे सेल्फ इंज्युरी अवेअरनेस डे (Self-Injury Awareness Day ).स्व-इजा जागृती दिवस……  नक्कीच असा कोणता दिवस अस्तित्त्वात आहे याची  खूप जणांना कल्पनाही नसेल. 


 तर काय आहे या दिवसाचे महत्त्व? त्या आधी "स्वतःला इजा" हा काय प्रकार आहे हे समजून घेतले पाहिजे. तर आपल्या प्रत्येकालाच माहित आहे कि आयुष्य हे कधीच सरळ नसते. त्यात कमी-अधिक , यश-अपयश ,सुख-दुःख, आनंद-उदासीनता असे भावनांचे नेहमीच चढ-उतार असतात. काहींच्या आयुष्यात नकारात्मक गोष्टींचे प्रमाण अधिक असते तर काहींना अशा गोष्टींचा सामना करण्याची सहनशक्ती कमी असते. मग अशा व्यक्तींमध्ये भावनिक असमतोल आणि त्यासोबतच अशा अदृश्य वेदना वाढू लागतात. मग अशा वेळी या भावनिक वेदनांचा सामना करण्यासाठी तो स्वतःला शारीरिक हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. ही अशा प्रकारची नकळत पण दीर्घ काळात उत्पन्न होणारी मानसिकता म्हणजेच "स्व-इजा (Self Injury)". 

हे समजून घेतले पाहिजे कि स्वतःला इजा पोहोचवून आपण एक तात्पुरता आराम मिळवू शकतो. पण होणारा त्रास मुळापासून नष्ट होत नाही. उलट तो नव्या पद्धतीने वाढतच जातो. आणि त्यातून नवे दुःख निर्माण होते. आणि हा प्रकार कोणाच्याही बाबतीत कधीही घडू शकतो. वय,लिंग ,धर्म यातील कशाचेही बंधन नाही.इतरांकडून होत असलेल्या सततच्या निंदेमुळे खालावलेला आत्मविश्वास, इतरांकडून होत असलेला मानसिक किंवा शारीरिक अत्याचार, स्पर्धेमध्ये मागे पडत असताना नकळत मनात उत्पन्न होणारा स्वतःबद्दलचा कमीपणा अशा कितीतरी कारणांमुळे माणूस दुखावला जातो. पण अशा वेळी अशा भावनिक चढ-उताराशी सामना करण्याची योग्य शक्ती निर्माण करणे ,घटनांना समजून घेऊन सकारात्मक विचारक्षमता वाढवणे,लढण्याची योग्य अशी मानसिक तयारी दाखवणे हाच यावर एकमेव उपाय आहे हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. आणि या बद्दल जागृत करणे हेच या दिवसाचे महत्त्व आहे. 

गेल्या सतराहून अधिक वर्षांपासून दर वर्षी १ मार्च या दिवशी जगभरात SIAD (Self-Injury Awareness Day) हा उपक्रम राबविला जातो. पण अशा दिवसाला पाठींबा देणाऱ्या LifeSIGNS सारख्या काही मोजक्याच संस्था असल्यामुळे आपल्याला या दिवसाची कल्पनाही नाही. अशा संस्था या प्रकाराबद्दल जनजागृती तसेच योग्य मार्गदर्शन करण्यासाठी सदा तत्पर असतात. काही लोक केशरी फीत हातात धारण करून तर काही दंडावर 'प्रेम(Love )' असे लिहुन,काही जण मनगटावर फुलपाखरू काढून या दिवसाबद्दल जनजागृतीसाठी प्रोत्साहित करतात.

खरेतर "स्वतःला इजा" या प्रकाराबद्दल जागरुकता वाढविणे ,विश्वास बसणार नाही इतके महत्त्वाचे आहे. अशा जागृतीमुळे,आपल्या थोडयाशा योग्य सहानुभूतीने ,दिलेल्या समजुतदारीने आपल्या आसपास असलेल्या अशा कितीतरी ग्रस्त, एकाकी पडलेल्यांची संख्या कमी होण्यास मदत होईल. आणि हीच आजच्या काळाची एक महत्त्वाची गरज आहे.  

- रुपाली ठोंबरे .  

Blogs I follow :