" जोपासा कल्पक विचार " हे शिर्षक वाचून 'कल्पक विचार' म्हणजे नक्की काय ? असा प्रश्न नक्कीच मनात निर्माण झाला असेल. तर ' कल्पक विचार' म्हणजे एखाद्या गोष्टीकडे नव्याने, सुधारणेच्या भावनेतून पाहण्याचा दृष्टीकोन.…. नवे काही निर्माण करण्याची आपल्या प्रत्येकात असलेली एक खास क्षमता.… जणू अशक्य ते शक्य करण्यासाठी मनात उडणारे योग्य नव कल्पनांचे कारंजेच….
तर आता तुम्ही म्हणाल ," म्हणजे ही कल्पकता फक्त चित्रकार,मूर्तीकार,लेखक अशा कलाप्रेमी लोकांकडे किंवा शास्त्रज्ञ,अभियंत्यातच असेल. पण नाही. एखाद्या साध्या अगदी रोजच्या जीवनातील कोणत्याही समस्येचे निवारण करण्यासाठी वापरलेली एखादी नवी कल्पना …. जसे तुटपुंज्या पैशांत महिनाभर घर चालवण्याचे एका गृहिणीचे गृह्कौशल्य, योग्य आराखडा आखून एखाद्या शहराचे नूतनीकरण करण्याची एखाद्या मंत्र्याची कार्यक्षमता,लहान मुलाला चांगल्या उपक्रमात व्यस्त करण्याची कलाशैली, स्वतःच्या आणि इतरांच्या सोयीसाठी केलेली दर्जेदार नोंदणी किंवा एखाद्या ग्राहकाला केलेली अशक्य वाटणारी विक्री हे सर्व एक प्रकारचे कल्पक विचारच आहेत .
पण प्रत्येकात जरी ही कला अवगत असली तरी तिला योग्य वाट करून देण्यासाठी एखादी अशक्य गोष्टही आपण करू शकतो असा दृढ विश्वास आपल्या ठायी असला पाहिजे. एकदा का ' हे मी करू शकतेच ' असे मनाला ठामपणे सांगितले की त्याची पूर्तता करणारे अनेक कल्पक विचार मनात डोकावू लागतात. आणि त्यातूनच सर्वोत्तम मार्ग शोधून काहीतरी नवनिर्मिती नक्कीच होते.
याचे एक उदाहरण द्यायचे झाले तर कित्येकांना घर, नोकरी सांभाळताना काही नवे शिक्षण घ्यायची इच्छा आणि संधी असूनही ते वेळ मिळत नाही असे कारण सांगताना आढळतात. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे , जेव्हा आपण एखादी गोष्ट अशक्य आहे असे म्हणतो तेव्हा आपले मन आपले हे वाक्य कसे अचूक आहे हे सिद्ध करण्याच्या मागे पडते आणि शेवटी हाती अपयशच येते याउलट जर हे शक्य आहे असे म्हणाल तर नक्कीच नवे मार्ग सापडतील…वेळ मिळत नाही म्हणणाऱ्याना वेळेचे नियोजन करून वेळ उपलब्ध करून घेण्याचे नवे उपाय सुचतील.
यासोबतच जुन्या विचारांत रुतलेले मन हा कल्पक विचाराच्या जडणघडणीत असलेला सर्वात मोठा शत्रू आहे. कारण जोपर्यंत आपण जुन्यातून बाहेर पडणार नाही तोपर्यंत नव्या कल्पनांना वाट मिळणार नाही. एखाद्या नव्या कंपनीत नव्याने रुजू झालेला जर त्याची जुनी कार्यशैली वापरण्याचा प्रयत्न करत असेल तर काही अंशी चुकीचे परिणाम पहावयास मिळतील. याउलट जर नव्या ठिकाणची कार्यपद्धती, उपलब्ध नोकरवर्ग, यंत्रणा या सर्वांचा मेळ घालणारी नवी कल्पना आणि त्यातून सुरु झालेली कार्यपद्धत अंमलात आणली तर नक्कीच यशापर्यंत पोहोचण्यास यशस्वी ठरेल.
लोकमान्य विचारांपेक्षा आपले विचार नेहमी प्रगत ,विकसनशील असावे यासाठी नेहमीच आपण प्रयत्नशील असावे. मग चला तर…अगदी आजपासूनच जुन्या विचारांच्या काळोखामुळे खोल मनात कुठेतरी दडलेल्या,कधीतरी सुचलेल्या किंवा आताही सुचणाऱ्या नव्या अशक्य कल्पना कागदावर उमटवून, योग्य पडताळणी करून जगाच्या प्रकाशात साध्य करू…आणि यशस्वी होऊ.
- रुपाली ठोंबरे