कित्येकदा आपल्यातील एका न्युनतेमुळे आपण स्वतःला ,देवाला दोष देतो. दुसऱ्यावर अवलंबून राहण्याचा तिटकारा करत आपल्यापेक्षा अधिक सुंदर जगापासून लपून राहतो.पण कधीकधी दुसऱ्यावर अवलंबून राहणे ही आपली गरज असते, (उदा . लहानपणी आईवडील) हे समजून घेतले पाहिजे . आणि ही सवय होऊ नये हेही तितकेच खरे. पण या सर्वांचा तिटकारा करणे योग्य नाही. पण तरीही या सुंदर जगात आपले स्थान काहीच नाही,आपल्यात कोणतेच गुण नाहीत अशी भावना जेव्हा जन्म घेते अशा वेळी हरून जगण्याची इच्छा संपते. पण अशा काळातही जीवनाची ही एक परीक्षा समजून प्रयत्न आणि धीराच्या सहाय्याने पुढे चालत राहून , इतरांकडून येणाऱ्या निंदांकडून स्फूर्ती घेऊन जगत राहण्याची कला अवगत केली कि आपल्यासही कधीतरी यशाचे पंख फुटून एक नवे सौंदर्य प्राप्त होईल. आणि मग या सुंदर जगात झेप घेत असता लोक बोट दाखवून म्हणतील … 'अप्रतिम ' !!!
तरु हिरवी बरवी
रंग-गंध मधूर
उमलती कुसुमे …रोज नवी
दडलेला सुरवंट एक
बिलगला एका पानाशी
आक्रसून शरीर उगाच
रुसून आहे …तो स्वतःशी
पाहून स्वतःस रोज
म्हणे ," का कुरूप माझी काया,
खात माझीच पाखर
जगणाऱ्या कोशावरी… कोण करी माया"
खचलेला तो खिन्न मनाने
रोज जगतो मरून
त्या पामरास न कळे
काय अर्थ … आता जगून
दल हळूच वदे देत समज
" नको होऊ तू असा उदास
यत्नांस असू दे धीराची साथ
नको सोडू तू … जगण्याची आस "
उत्स्फूर्त सुरवंट आता
विसरून त्याचे न्यून
जगू पाहे नव्याने पुन्हा
वाटेतल्या…निंदकांस डावलून
एके दिवशी अचानक
अपरिचित काही घडले
त्याचे त्यास न उमगले
का लोक त्यास… 'सुंदर' म्हणाले
पहाता स्वतःस जलदर्पणी
ऐकून मृदू गायन परांचे
त्याचे त्यासच न उमगले
बिंब त्याचेच की … फुलपाखराचे ?
इंद्रधनूचा कुंचला रंगीत
काल राती गेला स्पर्शून
झेप घे फुलावरी गात गीत
फुलपाखरू जन्मले…घे अनुभवून
- रुपाली ठोंबरे .