Friday, April 27, 2018

तो आणि....ती (भाग ३)


" वाह ! किती सुंदर आणि किती ऐसपैस विमानतळ आहे हे !"
ती आता त्या नव्या देशात पोहोचली होती. नवीन देशाच्या विमानतळावरची प्रत्येक गोष्ट तिला खूप सुंदर वाटत होती. ती खजुराची झाडे , तो दिव्यांचा लखलखाट ,विमानतळावरच्या भिंतींची ती सुबक रचना... सर्वच अगदी हवेहवेसे. चालत्या पट्ट्यावरून धावणारे आपले सामान तिने संकलित केले आणि ती विमानतळाबाहेर जाणाऱ्या मार्गावरून चालू लागली. इतका वेळ विमानात बसून आराम केल्याने आता कुठे पाय मोकळे करण्याची संधी मिळाली होती पण हा देश चालू देईल तर ते शक्य. सरकत्या जिन्यांसोबतच इथे असलेले सरकते रस्ते हे तिच्यासाठी एक आकर्षणच. पुढे बराच वेळ त्या वातानुकूलित वातावरणात घालवल्यानंतर विमानतळाबाहेर पाऊल ठेवले आणि उन्हाची खरी तीव्रता तिला जाणवू लागली. निरभ्र स्वच्छ आकाशात तळपणारा सूर्य आणि त्याची ती असह्य होत जाणारी किरणे अंगाखांद्यांवर खेळू लागली तसा तिने केसांवर चढवलेला गॉगल डोळ्यांवर सरकवला. कितीतरी हॉटेलचे ड्राइव्हर्स , आप्तजन हातांत नावाचे फलक घेऊन गर्दी करून वाट पाहत तिष्ठत उभे होते. तिनेही आपल्या नावाच्या शोधार्थ या टोकाकडून त्या टोकापर्यंत नजर फिरवली. आणि आपली ओळख नजरेत येताच तीने त्या उंच धिप्पाड माणसाला दुरूनच हात दाखवून त्याला अलीकडे येण्याचा इशारा केला.रंगरूपावरून तो वाहनचालक भारत किंवा त्याच्या आसपासच्या देशांमधला वाटत होता. गाडी वळून आणत असताना ती एकटक त्या चार चाकी सवारी कडे पाहतच राहिली कारण आपल्या देशात अशा गाडीत बसण्याचे जिथे आपण स्वप्न पाहतो तिथे या देशात त्या ब्रॅण्डच्या गाडयांना टॅक्सीचा दर्जा दिला जातो. ऐसपैस अशा गाडीत बसून सुमारे दीड तासाचा प्रवास सुरु झाला... त्या नव्या देशात. उंचच उंच इमारती , अगदी उच्च दर्जाची स्वच्छता, शहराची सुंदर रचना ... सारेच अतिशय सुंदर! यापूर्वीही तिने या शहराची सैर पुष्कळ वेळा केली होती पण प्रत्येकवेळी त्या शहराच्या आराखड्यात उभी राहिलेली एक नवीन सुसज्ज इमारत त्या प्रत्येक भेटींना वेगळेपण देत होती. एव्हाना हिंदीभाषिक असल्याने तिची वाहनचालकाशी चांगल्या प्रकारे ओळख झाली होती. त्याचे नाव रेहमान होते. मूळचा पाकिस्तानमधील पंजाब भागातला आणि व्यवसायासाठी ४ वर्षांपासून इथे वास्तव्यास असलेला.तो या नव्या देशाबद्दल , त्याच्या कुटुंबाबद्दल बरेच काही सांगत होता . ती फक्त ऐकत होती. कसे असते ना ? परक्या देशात आपल्या भाषेचा माणूस मिळाला कि एक वेगळाच जिव्हाळा नात्यात जन्म घेतो. इतक्यात एका उंच इमारतीकडे  गेले ," अबब ! किती ही मोठी इमारत!"
" ये देखिये निविजी, ये बुर्ज खलीफा हैं। दुनिया का आठवा  अजूबा.... "
"निर्वी ... मेरा निर्वी हैं ।"
 त्याला मध्येच तोडत तिने त्याच्या बोलण्यातली चूक त्याला दर्शवून दिली .
"अच्छा सॉरी सॉरी, तो निर्वीजी ये है दुनियाका आठवा आजूबा... बुर्ज खलिफा। २०० से भी ज्यादा मंजिले हैं। १२४ मंजिलपर टिकिट खरीदकर शहरका खूबसूरत नजारा देख सकते है। बहुत लाजवाब चीज बनायीं हैं। आप जरूर जाना। "
तो अगदी उत्साहाने सर्व सांगत होता. ही इमारत आत्ता २ वर्षांपूर्वी तर अर्धवटच होती आणि आता पूर्ण होऊन पर्यटनासाठी उपलब्ध देखील केली आहे. काय देश आहे ! निर्वी अगदी भारावून गेली होती. आणि कुठून कोण जाणे अगदी तिच्याही नकळत एक विचार मनात अचानक प्रकट झाला. "त्याचा देश , तो जिथे राहतो तो देश सुद्धा असाच असेल ? अनेकांचे स्वप्न असते त्या देशी जाण्याचे, तिथे एकदा गेले कि बहुतेक जण मायदेशाला कायमचा निरोप देतात. म्हणजे नक्कीच काहीतरी असेल ना त्या देशात ? मी जाऊ शकेल का कधी ? नोकरीच्या निमित्ताने कि मग...त्याला होकार कळवला तर खात्री आहे माझे तिकीट पक्केच होईल. पण होकार ? ..."
" अगं पण तू खरेच तयार आहेस होकार देण्यासाठी ? घरच्यांचा काही विचार केला आहेस? आणि तो इतक्या वर्षांपासून परदेशात राहतो, इतक्या सहज विश्वास ठेवून असे वाहून जाणे योग्य आहे ?"
तिचेच दुसरे मन तीला असे प्रश्न विचारून पेचात टाकत होते.
" अगं का नाही ? तू पाहिले नाहीस, तो खरेच किती  प्रेम करतो तुझ्यावर ? डोळे खोटे बोलत नसतात गं !"
पहिले मन पुन्हा तिचा बदलत जाणारा कल मूळ ठिकाणावर आणण्याचा प्रयत्न करत होता. एक प्रोत्साहन देत होता ... तर दुसरा विरोध दर्शवत होता, एक हिम्मत देत होता ... तर दुसरा खचवत होता, एक होकारासाठी स्वप्नांचे इमले दाखवत होता तर दुसऱ्याच्या नकारघंटेने निर्वी अस्वस्थ होत होती , एक स्वप्न दाखवत होते तर दुसरे मन तेच स्वप्न तोडण्याचा अगदी हिररीने प्रयत्न करत होते. प्रत्येकाच्या जीवनात मोक्याच्या वळणावर हा असा आणीबाणीचा प्रसंग उभा राहतो आणि हे मन असे ऊन-सावलीचा खेळ खेळण्यात रंगून जाते....माणसाच्या मनात द्वंदव निर्माण करत.
"पण  ते काहीही असो आई बाबा किती प्रेम करतात माझ्यावर ? माझी प्रत्येक इच्छा ते पूर्ण करतात ही सुद्धा करतील. थोडे रागावतील सुरवातीला पण तोही प्रेमाचाच भाग. आणि  माझा होकार त्याला कळवेल त्याला किती आनंद होईल ?तो पाहण्यासाठी आता मन आतुरले आहे."
मनातल्या मनात सुरु असलेला हा संवाद सहज चेहऱ्यावर स्मितहास्य घेऊन आला.
" मॅडमजी , हँस क्यूँ रहे हो ? मैं सच्ची बात बता रहा हूँ। "
निर्वी एकदम भानावर आली. रेहमान इतक्या वेळापासून काही सांगत होता त्याकडे तिचे लक्षच नव्हते आणि ते कदाचित त्यालाही जाणवले नसावे. तिने लगेच एक हुंकार देत त्याला प्रतिसाद दिला.
"जी हाँ।  आप अब जहाँ जा रहे हो वहाँ आसपास कोई शॉपिंग वगैरा नहीं हैं।  वोह तो आयलैंड हैं ना ! आलीशान ७ बड्डे बड्डे होटल्स हैं।  देखिये हम आ गए। बस्स अब ५ मिनट और। आपका हमारा साथ ख़त्म। "
एका मोठ्या हॉटेलसमोर गाडी उभी राहिली आणि तो उतरून तिचे सामान हॉटेलमध्ये नेऊ लागला. निर्वी बाहेर आली आणि जाणवले कि खरेच आसपास हॉटेल्सच्या मोठमोठ्या इमारती सोडून इतर काही नाही. अगदी निरव शांतता.... जी क्षणात भंग झाली रेहमानने पुन्हा सुरु केलेल्या गाडीच्या आवाजामुळे.
" चलो मॅडमजी , हम चलते हैं अब फिर नयी राहपर , नये मुसाफिरके खोजमें। चाहा तो फिर जरूर मिलेंगे।  
रेहमान निघून गेला आणि निर्वीनेही हॉटेलमध्ये प्रवेश केला.चेक इन, वेलकम ड्रिंक वैगरे अशी सारी औपचारिकता संपवून ती त्या प्रशस्त हॉटेलमधल्या एका छोट्याशा काचबंद रूममध्ये आली. आणि आत शिरल्याबरोबर तिने त्या मऊशार गादीवर लोळणच घेतले. सकाळपासूनच मानसिक आणि शारीरिकरीत्या थकलेला जीव तिने त्या गुलबक्षी बिछान्यात लपेटून घेतला होता.

बऱ्याच तासांच्या विश्रांतीनंतर जेव्हा निर्वीने डोळे उघडले तेव्हा तिला प्रचंड भूक लागली होती. जांभई देत आणि एका हाताने डोळे चोळत तिने हातावरच्या घड्याळावर एक नजर टाकली.संध्याकाळचे ६ वाजून गेले होते. खाली या वेळेस काहीतरी खाण्यास मिळेल कि नाही अशा दुविधेसह ती लॉबी मध्ये आली होती. रिसेप्शनवर बसलेल्या एका मुलीने सांगितल्याप्रमाणे ती डायनिंग एरियात गेली. काचेचा दरवाजा अजून बंदच होता. शेजारीच असलेल्या एका फलकावर असलेल्या शब्दांनी तिला हायसे सुद्धा वाटले आणि काहीसा हिरमोडसुद्धा झाला.
' Dinner Time : 7 PM to 11 PM 
Today's Menu : Mexican 
Enjoy Food and Drinks !!!'
 अरे वाह म्हणजे  काही मिनिटांतच काहीतरी पोटात जाईल पण मेक्सिकन ? कसे असेल ? कधीच ट्राय नाही केले. जाऊ दे . एखादी तरी व्हेज डिश असेल ना. तेवढे मिळाले तरी पुरेसे असे मनाला समजावत ती रिसेप्शनसमोरच्या सोफ्यावर त्या दरवाजाच्या उघडण्याची वाट पाहत बसली.बसल्या बसल्या ती प्रशस्त लॉबी आणि तेथील प्रत्येक वस्तुवरचे नक्षीकाम पाहण्यात ती दंग झाली. नव्या देशात आल्यावर 'निरीक्षण' हा माणसाचा एक आवडता छंद बनून जातो. निरीक्षण करता करता तिचे डोळे स्थिरावले ते काळ्याकुट्ट पेहरावातून डोकावणाऱ्या त्या अतुल्य सौन्दर्याकडे... किती सुंदर आणि बोलके होते ते डोळे ... चेहरा ,नाक ,रंग सर्वच अगदी या निर्मात्याची एक सुंदर देण. तिचे नाव 'आमिरा' होते. तिच्या मॅनेजर ने एक दोनदा तिला साद घातल्यामुळे रिसेप्शनवर बसलेल्या त्या मुलीचे नाव अगदी सहज कानी पडले होते. बराच वेळ समोरासमोर असल्याने कितीतरी नजरभेटी आणि स्मितहास्याची देवाणघेवाण त्या दोघींमध्ये झाली होती. 
"  मॅम ,इट्स सेव्हन ओ क्लॉक . यू कॅन गो टू डायनिंग एरिया अँड एन्जॉय दी डिनर ". 
अमिराने जेवणवाटप सुरु झाल्याची वर्दी दिली आणि निर्वी आता तिला धन्यवाद बोलून खाद्यपदार्थांवर तुटून पडणार होती . अतिशय आकर्षक रचनेच्या विविध भांड्यांमध्ये कितीतरी गरमागरम पक्वान्न बंदिस्त होते. पण दुर्दैवाने त्या प्रत्येक पाककृतीने तिला नाराज केले. साध्या अंड्यालाही स्पर्श न करणाऱ्या तिच्यासाठी मांसाहारातील विविध पदार्थांचा वाससुद्धा असह्य होत होता. आणि आश्चर्य म्हणजे एकही व्हेज डिश नाही. कसे शक्य आहे ? पण इथे तसेच होते. निर्वीने शेवटी नाईलाजाने हातातील प्लेटमध्ये ऑलिव्स ,ब्रोकोली ,लेट्युस, लालपिवळ्या मिरच्या ,मशरूम यांचे सॅलडरुपी मिश्रण घेतले. हे सर्व तिने यापूर्वी फक्त मॉलमध्ये दुरून पाहिले होते. भारतात असताना तिला कधीही त्या घ्यावाशा अथवा खाव्याशा वाटल्या नव्हत्या. आज मात्र ते तिचे संपूर्ण जेवण होते. ती टेबलावर येऊन बसली. टेबलावरचा रुमाल एक औपचारिकता म्हणून झटकून आपसूकच मांडीवर अंथरला गेला . मनात विचार आला या भाज्यांसाठी किती हे... पहिला घास तोंडात गेला आणि डोळ्यांत अक्षरशः पाणी आले तिच्या. कसला विचित्र मसाला नि सॉसमध्ये बुडवून ठेवले होते हे जिन्नस कोण जाणे. निर्वीला ते सारे अजिबात आवडले नाही पण पोटातली कावकाव मंद करण्यासाठी कसेबसे दोन चार घास तिने पुढे ढकलले आणि टेबलावरचा पाण्याने भरलेला अक्खा ग्लास एका झटक्यात रिकामा केला. तिचा हा सर्व भुकेशी सामना करणारा आटापिटा सुरु असतानाच एक वेटर तिच्याजवळ आला. 
" मॅम , वूड यू लाईक टू  हॅव सम ड्रिंक ?"
त्या क्षणातही तिला हायसे वाटले. 
"ओह येस ! प्लिज गिव्ह मी वन मोर बॉटल ऑफ वॉटर ."
त्यावर त्याच्या उत्तराने निर्वी चक्रावलीच. 
" मॅम , यु विल हॅव टू पे फॉर दॅट. ओन्ली कोक इज कॉम्प्लिमेंटरी. 
आता यावर काय बोलणार .खरे तर काही बोलायला जागाच शिल्लक नव्हती. तिने मनात काही विचार केला , एकवार त्याच्याकडे पाहिले. तो ऑर्डर घेण्यासाठी थांबला होता.
"ओके देन गिव्ह मी ऍप्पल ज्यूस ."
तो कुठल्याशा पेपरवर सही घेऊन निघून गेला. नंतर त्याने आणलेल्या त्या सफरचंदाच्या रसात जणू तिला अमृत मिळाले या अविर्भावात तिने ते प्राशन केले. त्या एवढ्या मोठ्या काचेच्या ग्लासामध्ये आता रसाचा एक थेंबही शिल्लक राहिला नव्हता पण तिची भूक अजून शमली नव्हती. त्या भुकेची तीव्रता आता डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंमध्ये जाणवत होती. पण ते कुणालाच दिसत नव्हते कारण आसपास कोणीच नव्हते. ती पूर्ण जागा रिकामी होती. 
" हॅलो मॅम , काय झाले ? काही प्रॉब्लेम ?"
या अनोळखी पण मायदेशीच्या आवाजाने निर्वी सुरुवातीला दचकलीच. पण लगेच भानावर आली. क्षणात डोळे पुसून उसने हसू दाखवण्याचा तिचा प्रयत्न सुरु होता. आणि नेमके तिच्या दुखत्या नसेवर बोट ठेवले गेले. 
" एन्जॉयिंग डिनर ?"
झाले !मॅनेजरची ही चौकशी ऐकली आणि आता मात्र तिने ऐन गरजेच्या वेळी जेवणामध्ये आलेल्या अडचणींचा पाढा वाचला त्याच्यासमोर. त्याने सर्व ऐकून घेतले आणि तो फक्त एवढेच म्हणाला 
"उद्यापासून पाहू काही बदल घडवता आला तर पण आतासाठी वरण-भात चालेल ?तुम्ही महाराष्ट्रीयन वाटत आहात , म्हणून विचारतो आहे.आणि इतक्या झटपट तेच होऊ शकते."
वरणभाताचे नाव ऐकले आणि निर्वीची कळी एकदम खुलली. काही मिनिटांतच गरमागरम वरण भात तिच्या समोर होता. खूप पूर्वी ठरवल्याप्रमाणे यथेच्छ ताव मारला तिने त्यावर . आणि अगदी आनंदाने तिथून बाहेर पडली. जाताजाता रिसेप्शनवर गेली. तिला समाधानी पाहताच तो मॅनेजर तिच्यापाशी आला ,
" मग काय मॅडम , आता आमच्या जेवणाविषयी आणखी काही तक्रार ?
"अजिबात नाही. परदेशात आपले मराठमोळे जेवण खायला मिळणे ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आणि त्यासाठी तुमचे खरेच खूप धन्यवाद."
आणि असे म्हणत निर्वी आमिरा आणि मॅनेजरचा निरोप घेऊन वरच्या मजल्यावर जाणाऱ्या लिफ्टकडे वळली. 

आपल्या रूममध्ये येऊन तिने उद्याच्या तयारीला सुरुवात केली. कॉम्प्युटरवर सारे प्रेजेंटेशन्स पुन्हा एकदा तपासून पाहिली. तिचा हा कार्यक्रम बराच काळ चालला. अचानक स्क्रीनवरच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात एक छोटी खिडकी दृष्टीस आली. 
             तो : Hi , कशी आहेस ?... 
                            पोहोचलीस का नवीन देशात ?
                            मग कसं वाटतंय ?
त्याचा मेसेज पहिला आणि आणि निर्वीने आनंदाने चक्क उडी मारली. तिने भराभर स्क्रीनवरच्या इतर सर्व खिडक्यांचा निरोप घेतला. तिला आता खूप बोलायचे होते त्याच्याशी , खूप काही सांगायचे होते. थोडे आवरले ,थोडे सावरले तिने स्वतःनेच स्वतःला आणि मग हाताच्या बोटांच्या हालचाली वेगात सुरु झाल्या.
            ती : हो पोहोचले ना कधीच. आत्ताच मस्त जेवण पण झाले. 
            तो : बरोबर .आता काय तुम्ही पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवणार. उत्तम मेनू ... आणि मज्जाच. मी काय बिचारा एरपोर्टवरच बर्गर खाऊन जीव रमवतो आहे. आता तू विचारशील एरपोर्टवर काय करतो आहेस ?अगं कनेक्टिंग फ्लाईट होत्या ना मग झालेत कि आता १० तास पूर्ण , आता आणखी १० तास आणि मग २ दिवस फक्त जेटलॅग .(आणि खळखळणाऱ्या स्माईली पावसाचे थेम्ब टपटपावे तसे तिच्या छोट्या स्क्रीनवर बरसू लागल्या. )
जवळजवळ एक-अर्धा तास दोघांच्या खूप गप्पा रंगल्या. तिने तिचा त्या क्षणापर्यंतचा संपूर्ण प्रवासवृत्तांत कथन केला.खूप मज्जामस्करी झाली. खळखळून हसण्याला तर दोघांच्यात स्पर्धा सुरु झाली होती आणि अशा खेळकर संवादात एकाएकी शांतता पसरली... अगदी अपेक्षित... तिच्याकडूनच. 
       ती :  अरे ऐक ना ! मला ना तुला काहीतरी महत्त्वाचे सांगायचे आहे.
       तो : अरे वाह ! काय योगायोग म्हणावा बघ आपला. मलासुद्धा तुला महत्त्वाचे काही सांगायचे आहे. आणि हो , तू अजिबात मला काही सांगायला बिंगायला जाऊ नकोस हां. तुझे सांगणे म्हणजे नकारासाठी तुला नव्याने सुचलेली कारणेच असतात. पण आता घाबरू नकोस. पुन्हा नाही विचारणार मी तुला ते प्रश्न. कारण .... बरे ते जाऊ दे . तू सांग. तू काय सांगणार होतीस?
    ती : नाही. तू सांग पुढे . कारण... काय बोलत होतास? विमानात कोणी भेटली बिटली कि काय तुला ?
   तो : (तो पुन्हा खळखळून हसत होता पण ती मात्र तितकीच गंभीर ) असूही शकते. कारण या जगात ,या जीवनात कोणत्या क्षणाला काय होईल ते साक्षात परमेश्वरालाही सांगता येणे अशक्य.एखादी मनाला भावेल आणि लगेच होकार देईल अशी मुलगी का नाही भेटू शकत मला ?सर्वच थोडीच ना तुझ्यासारख्या भाव खाणाऱ्या असतात. तू सांग बरे तू काय सांगणार होतीस ते...
   ती : अरे, खास काही नाही रे !जर हे प्रेजेंटेशन आणि पुढेही सर्व योजनेप्रमाणे झाले ना कि मला मोठे प्रमोशन मिळणार आहे, हेच सांगायचे होते तुला.
   तो : खरंच , हीच ती महत्त्वाची गोष्ट ? जी सकाळीसुद्धा एकदा सांगून झाली होती ?
   ती : (तिने जीभ चावली पण लगेच स्वतःची बाजू सावरली ) अच्छा , मी तुला हे आधीच सांगितले होते काय ?असेल मग. मला आता खूप झोप येते आहे. Bye.
  तो : अगं , काय झालं आता ? काही चुकीचं बोललो का ? अगं तेव्हा मी. मी तर ...
ती : उद्या सकाळी लवकर उठायचे आहे मला.आणि खूप थकले आहे. प्लीज झोपू दे आता. आणि तू पोहोचलास की कळव. तेव्हा बोलू आपण निवांत. Bye  . 
तो यावर काय बोलणार आता . त्यालाही पुढच्या फ्लाईटसाठी उशीर होत असेल. 'Bye','See You ','Take Care ','Love You ','Miss You ' असे कितीतरी निरोपांचे मोती तिच्या स्क्रीनवर तिच्यासाठी उधळून निघूनही गेला पण ती मात्र रित्या मनाने त्याची एकच ओळ कितीतरी वेळ पाहत राहिली,

'एखादी अचानक मनाला भावेल आणि लगेच होकार देईल अशी मुलगी का नाही भेटू शकत मला ?
सर्वच थोडीच ना तुझ्यासारख्या भाव खाणाऱ्या असतात.'



- रुपाली ठोंबरे
  

Monday, April 23, 2018

' जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा'

आज सकाळीच इतर बऱ्याच उपयोगी-निरुपयोगी मेसेजेस सोबत आणखी एक मेसेज माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर स्थिरावला आणि तो नजरेखालून जाताच मनात अगदी खोलवर जाऊन बसला , माझ्या विचारांच्या चाकांना नव्या दिशेने गती देण्याचे त्याचे कार्य सुरु झाले आणि मग इतर मेसेजेसप्रमाणे अजिबात माझ्या मोबाइलपासून दुरावला नाही तो. उलट ' जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा' या शीर्षकासह आणखी कितीतरी जणांपर्यंत तो थेट त्यांच्या त्यांच्या मनात जाऊन बसला. 


'जागतिक पुस्तक दिन '... आश्चर्य वाटले ना ऐकून ? मलाही वाटले होते. जगात दरदिवशी कोणता ना कोणता दिवस अमूकतमूक जागतिक दिन म्हणून साजरा केला जातो पण पुस्तकांचाही असा दिवस असेल हे मात्र कधी कल्पनेतही नव्हते. पण असो.... असा दिवस अस्तित्वात असणं ही  खरंच खूप चांगली गोष्ट आहे. ही कल्पना माझ्या मनाला खूप भावली आणि त्यातून निर्माण झाली उत्सुकता या दिनाविषयी.आणि मग काय ? जराही वेळ न दवडता कधी ,कोणी ,का,कसा अशा अनेक प्रश्नांची उत्तरे भरभर शोधली गेली. 

२३ एप्रिल १९९५ पासून युनेस्कोने दरवर्षी ' जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिवस अशी पुस्तक वाचन तसेच कॉपीराईट व पुस्तक प्रकाशन यासाठी लोकांना प्रवृत्त करणारी ऐतिहासिक घटना घडवून आणली. खरेतर २३ एप्रिल आणि पुस्तकांचा पहिला संबंध झाला तो १९२३ मध्ये. विख्यात स्पॅनिश लेखक Miguel de Cervantes यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ Valencian लेखक Vicente Clavel Andrés यांनी मांडलेली ही कल्पना. शिवाय  William Shakespeare आणि Inca Garcilaso de la Vega या दोघा  कलाकारांची पुण्यतिथी देखील तीच आणि म्हणून १९९५ साली युनेस्को तर्फे 'जागतिक पुस्तक दिवस' म्हणून २३ एप्रिल या दिवसावर शिक्कामोर्तब झाले. वेगवेगळ्या देशांत हा दिवस वेगवेगळ्या तऱ्हेने साजरा केला जातो.इतर दिवसांप्रमाणे या दिवसाचे महत्त्वाचे स्वरूप एकच - भेटवस्तू देवाणघेवाणीचे पण या प्रसंगी कित्येकदा ती भेटवस्तू म्हणजे पुस्तक. काही ठिकाणी सामूहिक वाचन सुद्धा केले जाते. 

आपल्या देशात वॅलेंटाईन्स डे , मदर्स डे, फ़ादर्स डे यांसारखे या दिवसाचे प्रस्थ नाही किंबहुना असा दिवस अस्तित्त्वात आहे हे देखील अनेकांना माहित नसेल. पण मग मला एका मेसेज मधून ही माहिती मिळाली तर विचार केला कि का नाही अशा सुंदर दिवसाबद्दल जगाला सांगायचे आणि मग मी आज हो लेख लिहिण्यास सुरुवात केली.

आपण जन्मास येतो. पहिले २-३ वर्षे पार पडली कि मैत्री होते ती पुस्तकांशी.ही पुस्तके आपल्याला काय नाही देत ?अक्षर-अंक ओळख , जगाची सैर ,कल्पना विकास सारेच काही तर या पुस्तकांच्या सहवासात सामावलेले असते. पण आज कॉम्प्युटरच्या युगात ही पुस्तके दुरावली जाऊ लागली आहेत. आज पुस्तकांपासून दूर  जाणाऱ्या पाखरांना पुन्हा त्या अक्षरांत ,कल्पनांत,पुस्तकांत रममाण होण्यासाठी आणणे ही किती सुंदर कल्पना? पण त्यांना वाचणारा वर्ग आज नाहीसा होऊ लागला आहे. म्हणून हीच योग्य वेळ आहे आपणही हा दिवस साजरा करण्याची. पण पुस्तक दिवस साजरा करणे म्हणजे नक्की काय ? फक्त एखादे पुस्तक एकमेकांना भेट देणे ?पुस्तक भेट म्हणून देणे जितके आवश्यक तितकेच त्याच्या वाचनात रुची निर्माण करणे महत्त्वाचे.नाहीतर कपाटात पडून वाळवीच्या स्वाधीन करण्यात अथवा रद्दीच्या भावात तराजूवर ठेवण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे अशा अनमोल भेटीला मातीमोल करून आपण स्वतःलाच न्याय देत नाहीत. म्हणून प्रत्येकाने आज वाचनाचे महत्त्व समजून घेऊन इतरांनाही समजवावे आणि आजपासूनच जितकी जमतील तितके वाचन करण्याचा पण करणे हा खरा पुस्तकोत्सव. 

बरेच दिवस मीसुद्धा कामाच्या व्यापात या पुस्तकमित्रांपासून दुरावले होते. पण आता ठरवले आहे कि वेळात वेळ काढून एक परिच्छेद का होईना पण माझी पुस्तके आता वाळवीच्या किंवा रद्दीच्या स्वाधीन होणार नाहीत. आणि हे बघा , अगदी आत्ताच मी एक सुंदर पुस्तक वाचण्यासाठी म्हणून हातात घेतले आहे... दोन-चार पाने वाचूनही झालीत... एक वेगळेच समाधान ,आनंद मिळतो... तर मग चला तर तुम्ही सुद्धा तुमचे कपाट उघडून एकवार पहा ... अडगळीत पडलेले ते पुस्तक हातात घ्या... आणि त्याच्या प्रत्येक पानात , प्रत्येक ओळीत ,प्रत्येक शब्दात ज्ञान मिळवा... आनंद अनुभवा... स्वतःला शोधा... कारण शोधले तर सापडतेच ... फक्त योग्य दिशा मिळायला हवी... आज कदाचित ती मिळते आहे, हो ना ?


- रुपाली ठोंबरे. 

वाचण्यासाठी अजून काही 

Tuesday, April 17, 2018

गरज मानसिकतेच्या बदलाची

चित्रसौजन्य आणि सुलेखन : सुलेखनकार घनश्याम एरंडे
गेल्या काही दिवसांपासून फेसबुक ,व्हाट्सअँप ,ट्वीटर यांसारख्या सोशल मिडीयांवर एका चिमुरडीची बातमी वेगवेगळ्या पद्धतीने  वाचण्यात येते आहे. बातमी वाचतानाच अंगावर काटा आणि मनात राग ,चीड उत्पन्न  झाल्याशिवाय राहत नाही. हे सर्व संपले पाहिजे , काहीतरी केले पाहिजे असे मनोमन वाटू लागते.पण काय ते मात्र कित्येकदा कळेनासे होते कारण या घटनाच अशा निशब्द आणि मनाला सुन्न करणाऱ्या असतात. अशा घटना वारंवार घडत असताना फक्त स्वतःत रममाण होणाऱ्या समाजाबद्दल, फक्त आपला स्वार्थ साधू पाहणाऱ्या काही भ्रष्ट मान्यवरांबद्दल अचानक एक विचित्र चीड , घृणा मनात निर्माण होते. 

याच विचारांच्या प्रवाहात असताना मला अचानक आठवण झाली त्या भावूक लोकांची... ज्यांना भाषणातील काही आक्षेपार्ह वाक्ये , एखाद्या पुतळ्याची झालेली विटंबना, आंतरजातीय समाजाला अमान्य असलेले विवाह देखील सहन होत नाही... आणि ते त्या सर्वाचा विरोध करण्यासाठी जीवही द्यायला तयार होतात आणि जीव घ्यायलाही. ते सर्व लोक कुठे असतील आता ?त्यांना हे सर्व सहन झाले असेल? इथे तर एका जिवंत हाडामांसाच्या कोवळ्या जीवासोबत दुष्क्रुत्य घडते आणि त्यानंतरही अनेक जण त्यावर आक्षेपार्ह बोलतात,आक्षेपार्ह घटना घडत राहतात. अशा वेळी अशा भावनाशील लोकांना तर कितीतरी वाईट वाटले असेल. या सर्वाचा विरोध करण्यासाठी ते रस्त्यांवर उतरतील.न्यायासाठी आक्रोश करतील. फक्त अंधच नव्हे तर आता मूक-बधिर झालेल्या सरकारला योग्य पाऊल उचलण्यासाठी भाग पाडतील. पण नाही! अशा वेळी यांपैकी कोणीही पुढे येणार नाही. कारण ही त्यांची वैयक्तिक समस्या आहे असे मानून अशा गोष्टींतून अंग काढून घेणारी मानसिकता इथे वर्षांपासून रुजून आहे. आम्ही लढू ते फक्त तेव्हाच जेव्हा आमच्या जातीवर किंवा धर्मावर आक्रमण होईल आणि तेही कोण्या एका नेतृत्वाखाली...मग ते नेतृत्व कित्येकदा स्वार्थीही असू शकते आणि त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही. आणि तोपर्यंत बलात्कार , वासनाकांड यांसारख्या शत्रूंचे दिवसेंदिवस वाढत जाणारे अतिक्रमण सर्वांना मान्य आहे... जोपर्यंत त्याची झळ आपल्यापर्यंत पोहोचत नाही.आणि असेही आपल्या इथे वर्तमानकाळातील घडणाऱ्या गोष्टींपेक्षा भूतकाळातील कटू घटनांची पाळेमुळे उपटून काढण्यात किंवा भविष्यकाळातील स्वप्नांसाठी आज मातीमोल करण्यात अधिक रस आहे. जरा विचार करून पहा, जो आक्रोश एखाद्या छोट्याशा धार्मिक किंवा राजकीय घटनेमुळे  देशभर वणव्यासारखा पेटतो तोच अशा काळशत्रूबद्दल का घडून येत नाही ? तेव्हा का धर्माचे , जातीचे , सत्तेचे अडथळे वाटेत निर्माण होतात ? या सर्व दुष्ट प्रवृत्तींवर का एखादा जबर वचक बसत नाही ? आज गरज आहे एका अशा शासकीय दहशतीची ज्यामुळे अशा प्रत्येक नराधमाच्या असे कृत्य करण्यापूर्वी 'करू कि नको ?' असे द्वंदव निर्माण झाले पाहिजे. 

पण सध्या तरी गेली कित्येक वर्षे वाट पाहत असलेला तो कृष्ण पुन्हा जन्म घेत नाही म्हणून मग आता आजच्या द्रौपदीनेच काळाची गरज समजून स्वतः अशा अवेळी होणाऱ्या हल्ल्यास सामना करण्यासाठी समर्थ झाले पाहिजे. सौन्दर्य , नृत्यकला , पाककला यांसोबतच स्वतःच्या बचावासाठी लागणाऱ्या शौर्यकलेचे बाळकडू देखील अगदी बालपणापासूनच प्रत्येक मुलीच्या पालकांनी तिला दिले पाहिजे कारण वासनेच्या आहारी गेलेले काही बेशरम लोक वय पाहत नाहीत ही दुर्दैवाने खरी ठरलेली आजची वस्तुस्थिती आहे.त्यामुळे 'बेटी पढाओ ,बेटी बचाओ' या नाऱ्यात 'बेटीको धाकड बनाओ ' अशी उक्ती समाविष्ट करून त्यावर अंमल करायला हवा. आणि त्याच बरोबर आजच्या प्रत्येक मुलाच्या मनात प्रत्येक स्त्रीविषयी आदर , सन्मान निर्माण करून त्याला योग्य संस्कार आणि शिक्षण देणे ही देखील या काळाची एक वाढती गरज आहे. आणि या सर्वांसोबत एक महत्त्वाचा बदल झाला पाहिजे तो म्हणजे प्रत्येकाच्या मानसिकतेत. आज सकाळीच एक बातमी वाचली कि पॉर्न व्हिडीओ साईट वर जे सर्वात जास्त वेळा शोधले गेले ते त्या चिमुरडीचा नाव. मन सुन्न झाले हे वाचून. काय ही मानसिकता ? तिला आवर घालणे  आवश्यक आहे. आजच्या या यंत्र-तंत्राच्या दुनियेत वाढत्या डिजिटल युगात मुलांनी काय जाणावे आणि काय जाणू नये यावर विशेष लक्ष द्यायला हवे. कारण कुठेतरी या क्रूर शक्तींचा उदय तिथूनही होत असतो. जर योग्य संस्कारांचे सिंचन झाले तर सारेच कृष्ण बनतील आणि भविष्यकाळात कोणत्याही द्रौपदीवर अत्याचार होणार नाही. पण जर त्यातूनही एखादा दुर्योधन निघालाच तर पूर्णपणे सबल झालेली रणरागिणी त्या नराधमावर विजय मिळवून त्याचा हेतू धुळीस मिळवेल, असे या देशाचे भविष्य जेव्हा उदयास येईल तेव्हा पुन्हा अशी निर्भया किंवा आसिफा आणि त्यांना वाचवण्यासाठी,त्यांच्या न्यायासाठी अशी केविलवाणी विनवणी असणार नाही. 

- रुपाली ठोंबरे.

Monday, April 16, 2018

बालमैफल -३

बालमैफल -३
 माझी लोकसत्ता मध्ये आलेली तिसरी कथा...ओम आणि मुंगीबाई . 



वाचण्यासाठी लिंक :
ओम आणि मुंगीबाई.


- रुपाली ठोंबरे .

Wednesday, April 4, 2018

एक अमूल्य भेट


 गरम गरम वाफाळलेल्या चहाचा एक घोट घेतला आणि सकाळी सकाळी डोळ्यांवर आलेली आळसावलेली झोप क्षणात नाहीशी झाली. मी आणि बायको कुठल्याशा इकडच्या तिकडच्या विषयांवर गप्पा मारत चहाचा आस्वाद घेत हॉलमध्ये बसलो होतो. छोटी समा शेजारीच तिचा खेळ मांडून त्यात मग्न झाली होती.त्या बैठकीतच उद्याच्या गुढीपाडव्याच्या तयारीला लागणाऱ्या सामानाची यादी चर्चेत आली आणि नवीन वर्षाची खऱ्या अर्थाने चाहूल लागली. गप्पा रंगल्या होत्या. आणि इतक्यात माझे लक्ष समोरच्या टेबलवर गेले. मी चहाचा कप हातात घेऊनच उठलो आणि टेबलजवळ गेलो,
" काहीतरी पार्सल आलेलं दिसतंय."
म्हणत मी ते हातात घेऊन पुन्हा आपल्या जागी येऊन बसलो.
" हो . कालच आले होते हे. तुमच्यासाठी होते म्हणून असेच ठेवले होते. आता सांगणारच होते मी. . तूम्ही बघा . मी तयारीला लागते आता . "
असे सांगून रिकामे कप घेऊन बायको किचनमध्ये निघून गेली. मी मात्र त्या पार्सलला अजूनही न्याहाळातच होतो. दिसायला नेहमीसारखे एक मोठे पाकीट होते पण इतर पाकिटांपेक्षा वजनाने जाड वाटत होते . त्यावर अगदी टपोऱ्या अक्षरांत माझे नाव 'चित्रकार निलेश जाधव ' आणि त्याखाली माझ्या घराचा पत्ता लिहिला होता. प्रेषक स्थानी माझी नजर गेली तर ते नाव आणि गाव देखील फारसे ओळखीचे वाटले नाही. खूप साऱ्या कागदांचा गठ्ठा असावा असा भास झाला ते पार्सल हातात घेतले तेव्हा आणि एक वेगळीच उत्सुकता मनाला बिलगून गेली.काय असेल बरे यात आणि नक्की कोणी पाठवले असेल बरे ? मनात अशा प्रश्नांची गर्दी होण्या आधीच मी ते पाकीट उघडण्यास सुरुवात केली. एक कडा उलगडली आणि आत डोकावून पाहिले तर काय ?... पोस्टकार्डस. कित्ती वर्षांनी पाहत होतो मी ही अशी पत्रे. ते पाहून उत्सुकता पार शिगेला पोहोचली आणि मी क्षणही न दवडता सारी पोस्टकार्डे पाकिटाबाहेर काढली. एव्हाना समा तिथे येऊन पोहोचली होती. तिच्यासाठी तर पोस्टकार्ड हा एक नवीनच प्रकार होता.
" बाबा , हे काय आहे ?आणि इतकी सारी? कोणी पाठवली ?"
समाच्या प्रश्नांचा पर्वचा सुरु झाला पण तिच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मला तरी कुठे सर्व माहित होते. आणि त्या क्षणी मी खरंच हरवून गेलो होतो. तेव्हा समाच्या आईनेच तिच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला.
" अगं समा , ही पोस्टकार्ड्स आहेत. पूर्वी जेव्हा आतासारखा फोन अस्तित्वात नव्हता तेव्हा निरोप सांगण्या-आणण्यासाठी यांचाच उपयोग होत असे. आपल्या दूरच्या लोकांना निरोप द्यायचा असेल तर असे पत्र लिहून टपालात टाकायचे आणि मग पोस्टमन काका ते पत्र अचूक पत्यावर पोहोचवायचे आणि मग त्या निरोपाचे उत्तर देखील याच मार्गाने परत यायचे. ते ही काही वेगळेच दिवस होते, नाही का रे ? पण मला एक कळत नाही आजच्या व्हाट्सअपच्या जगात तुम्हाला अशी एवढी पत्रे आली कुठून आणि पाठवली कुणी ?"
" अगं हो. तेच पाहतो आहे मी . बघ ना कित्ती सुंदर आणि वेगवेगळी शुभेच्छापत्रे आहेत ही !"
आणि एक पत्र हातात घेतले. अतिशय बोलक्या अक्षरांत आणि शब्दांत माझ्यासाठी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा त्यात कोरल्या होत्या. सोबत गुढीचे एक सुंदर चित्र देखील त्या भेटकार्डाची शोभा वाढवत होते... घराबाहेर उंच वेळूच्या काठीवर उभारलेली ती माथ्यावर तांब्याचा कलश , हिरवागार लिंबफाटा,फुलांच्या माळा , नक्षीदार साखरगाठी,जरीसाडीसोबत सजलेली ती चित्रगुढी तर मला आत्ताशीच येणाऱ्या नववर्षाची जाणीव करून देत होती. ते पत्र तसेच हातात ठेवून मी दुसऱ्या हातात दुसरे कार्ड घेतले. त्यातही एका सुंदर सजलेल्या गुढीसोबत माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबियांसाठी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा होत्या. अशी १-२ नव्हे तर एकूण २२ पत्रे होती.... निरनिराळ्या ढंगातली आणि वेगवेगळ्या रंगांतली .प्रत्येक पत्रातील अक्षरे आणि शब्द जरी वेगळे तरी त्यातून माझ्यासाठी होत्या फक्त आणि फक्त शुभेच्छा... सुंदर शुभेच्छा ... रंगीत शुभेच्छा...सुखदायी शुभेच्छा... आनंद देणाऱ्या शुभेच्छा... भारावून टाकणाऱ्या शुभेच्छा. हो खरंच , हे सर्व पाहून मी अगदी भारावून गेलो होतो. कोणत्याही कलाकारासाठी आपल्या कलारसिकांकडून मिळालेले असे प्रेम खरेच अनमोल असेल. आम्ही तिघे या पत्रांमध्ये अगदी गुंग झालो होतो. आणि इतक्यात समोर आला समाचा पुढचा प्रश्न -
" हे चित्र छोट्या मुलाने काढले आहे का ?"
हो खरेच की , चित्रे आणि अक्षरांवरुन तरी ती शाळेतल्या मुलांची पत्रे असावीत असा अंदाज आम्ही बांधला. पुन्हा एकवार पत्रांना उलटापालट करून नाव-पत्ते शोधले तेव्हा त्यांच्या कलाशिक्षकांचे पत्र हाती आले आणि मग ध्यानात आले कि ही सर्व सोलापूरमधील बादोले गावातील एका शाळेतील सहावी इयत्तेतील मुले.पुढे वाचत गेलो तसे त्यांच्या पत्रांतून कळले कि वर्तमानपत्रे , मासिकांतून प्रकाशित होणारी माझी चित्रे या मुलांनी अनेकदा पाहिली , त्यांना ती फार आवडली आणि आपल्या चित्रकलेच्या शिक्षकाच्या मदतीने मान्यवरांशी पत्रव्यवहार करण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून त्यांनी माझ्यासाठी आज ही अशी सुंदर शुभेच्छापत्रे तयार करून माझ्यापर्यंत पोहोचवली.वाह ! किती तो आदर आणि किती हे प्रेम ! एका कलाकाराला यापेक्षा अधिक काय हवे असेल ?

 खरेच आजच्या व्हाट्सएपच्या काळात , जिथे आपण एखादा शुभेच्छा मेसेज कॉपी आणि पेस्ट करून अगदी सर्रासपणे पुढे पाठवतो आणि अशाप्रकारे आपल्या भावना व्यक्त करून पूर्णविराम लावतो तिथे या अशा मुलांचे आणि  मार्गदर्शन करणाऱ्या त्यांच्या शिक्षकाचे विशेष कौतुक वाटते. आज दुर्मिळ होत जाणाऱ्या पोस्टकार्डांवर स्वतःच्या हातांनी कलाकारी करून ते असे दूरच्या प्रिय व्यक्तीपर्यंत पाठवण्याचा हा खटाटोप पण तोही त्यांना आनंद आणि समाधान मिळवून जातो. यातून आज आपल्याला खरेच खूप काही शिकता येईल आणि ते शिकायलाही  हवे. 

मी सर्व पत्रे पुन्हा तशीच जपून पाकिटात ठेवली. ती पत्रे आता कपाटात बंदिस्त झाली होती पण माझ्या विचारांना मात्र एक नवीनच चालना आज त्यांनी दिली जणू. नकळत माझे बालपण मनाच्या झरोक्यातून डोकावून गेले. मित्रांसोबत शेअर केलेल्या सुट्टीतल्या गंमती जंमती , दूरच्या बहिणींसोबत केलेली राख्या आणि भेटकार्डांची देवाणघेवाण , दूरच्या चुलतभावंडांसोबतच्या गप्पागोष्टी सारे सारे आज त्या पत्रांमुळे आठवत गेले ... कितीतरी प्रसंग जसेच्या तसे डोळ्यांसमोरून तरळत गेले. आज या तंत्र आणि यंत्रांच्या दुनियेत खरेच ते 'आईचे पत्र' हरवले आहे. आज मला ते पुन्हा सापडले आणि आता मी ठरवले कि ते आता पुन्हा मुळीच गमवायचे नाही.


 त्यानंतर मनात आले , कुठल्या तरी दूरच्या गावातील मुलांनी आणि शिक्षकाने माझ्यासाठी इतके श्रम घेऊन आनंदाने मला आज ही भेट दिली. मग मलाही त्यांच्या भावनांचा आदर करायला हवा. त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवे. पण काय करावे ? या विचारात ती पत्रे,त्यांतील शब्द ,अक्षरे ,चित्रे कितीदातरी या दृष्टिपटलावर नाचत राहिली. आणि मग अचानक काहीतरी गवसले. अनेक पत्रांचा शेवट होता ,' कळावे. तुमच्या उत्तराची अपेक्षा करतो . वाट पाहतो '. आणि एक कल्पना सुचली. मी माझ्या काही चित्रांच्या प्रिंट्स घेतल्या आणि . त्यामागे स्वतःच्या हातांनी त्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा लिहिल्या. आणि अशी ती स्वरचित पत्रे पोस्ट करताना मला स्वतःला जे समाधान आणि आनंद मिळत होता तो कोणत्याही पुरस्कारापेक्षा कमी नव्हता.

- रुपाली ठोंबरे .


Blogs I follow :