Tuesday, September 20, 2016

रे परतीच्या पावसा...


भर दुपारी अचानक
आभाळ सारं भरून आलं
नुकतंच उजळलेलं जग 
पुन्हा एकदा अंधारून आलं
पण मला नवल वाटलं नाही

कारण हे आता तुझं रोजचंच झालंय... 
दिवसाच्या अवचित वेळी 
तुझं हे असं वर्दी न देता बिनधास्त येणं  
आणि तसंच न सांगता गुपचूप निघून जाणं
कधी धुवांधार चारपाच सरींतच गडप होणं  
तर कधी रिमझिम तासंतास बरसत राहणं
कधी एकसूरी सौम्य रागात निमूट आळवणं 
तर कधी ढोल ताशांत दिमाखात गर्जत येणं 

पहिल्यांदा आला होतास 
तेव्हा हेच सर्व कसं हवंहवंसं वाटत होतं 
तळहातावरचा तुझा तो पहिला स्पर्श 
अंगावर उठलेला तो पहिलाच शहारा 
याच स्पर्शातून जन्मलेला तो मंद गंध
जुन्या आठवणींना आठवून त्यांत भिजताना
ओलं झालेलं , आनंदलेलं  ते चिंब मन 
नव्या पावसासोबत पाणावलेल्या डोळ्यांत
निर्माण होणाऱ्या त्या नव्या मुग्ध आठवणी
सारंच कसं साठवून घ्यावसं वाटत होतं  

हळूहळू सर्व जणू  बदलून गेलं 
सगळीकडे होतास फक्त तूच तू 
कोवळ्या पालव्यांतून डोकावणारा तूच तू 
धबधब्यांतून उडया मारणारा सुद्धा तूच तू
हिरव्या बनात मोराला नाचवणाराही तूच 
आणि चातकाची तहान भागवणाराही तूच 
नद्यांमध्ये खळखळ वाहणारा तू 
रानांमध्ये सळसळ नांदणाराही तूच तू 
जिकडे तिकडे चोहीकडे कोसळणारा तू 
मग रोजचाच सखा झालास रे एकदम

थेंब थेंब रुपेरी रांगांनी 
आता मी चिंब भिजले आहे 
ओल्या तळहातांवर पुन्हा पुन्हा 
झेलताना तेच पाणी 
स्पर्श जणू आता स्तब्ध निजले आहेत 
हळूहळू मग बघ सवयच झाली तुझी 
तुझं असं हे येणं-जाणं ओळखीचं झालं 
छत्रीशिवाय घराबाहेरचं जग 
अचानक अनोळखी वाटू लागलं 
कधीतरी हवाहवासा वाटणारा तू 
मग कधीतरी नकोसाही झालास 
नद्या धरणे दुथंडून वाहू लागल्यावर 
अक्राळविक्राळ पुरातही दिसलास तू 

काही काळातच संबंध हिरवा रंग उधळून 
रंगहीन थेंबांतून नभी इंद्रधनू रेखाटलंस तू
मध्येच कधीतरी लपाछुपीचा खेळ तुला सुचला
तुझ्या या ऊनसावलीच्या खेळात जीव मात्र दंगला 
आज पुन्हा ना जाणे का पण तुझ्यात जीव रंगला 
रे परतीच्या पावसा, कोसळत राहतो जरी दिवसभर 
निरोप घेताना तुझा जीव कासावीस होतो रे क्षणभर 
माहित आहे मलाही, येशील तू पुन्हा एकदा न चुकता
फक्त वेळेवर ये, ती पहिल्या पावसाची जादू पुन्हा घेऊन

- रुपाली ठोंबरे






Thursday, September 15, 2016

.... शेवटी येते 'अनंत चतुर्दशी'


हे दरवर्षीचेच आहे... वाजत गाजत सर्वांचा लाडका गणपती बाप्पा थेट आपल्या घरी येऊन चांगला १० दिवस राहतो....अतिशय आनंदाने,स्मितमुखाने आपल्या आशीर्वादांची उधळण सर्व भक्तांवर करतो. आणि आपणही नव्या पाहुण्याप्रमाणे मनसोक्तपणे आपल्या भक्तीची लयलूट त्याच्यावर करत असतो. रोज नवा नैवद्य, फुलाफुलांची सुरेख आरास , दिव्यांची उजळण, भक्तिगीतांची उधळण आणि पाहुण्यांची रेलचेल या सर्वांसवे हे दहा दिवस प्रसन्नतेला असे काही पांघरून घेतात कि जेव्हा शेवटी आजचा दिवस उजाडतो, प्रत्येकाला आज काहीतरी हरवणार असल्याचे भास नकळत होऊ लागतात... राहून राहून मन उदास होऊ लागतं.बघता बघता दरवर्षी हे दहा दिवस कसे सरून जातात हे कळतच नाही... आणि शेवटी येते 'अनंत चतुर्दशी'.... बाप्पाला निरोप देण्याचा दिवस.



संध्याकाळी, दहा दिवसांपासून गजबजलेले प्रसन्न मखर मंडपे त्या गूढ अस्तित्वाशिवाय रिकामे वाटू लागतात... रोषणाई मंद मंद होत जाते....सजावटीत एक पोकळता सारखी जाणवते.... गणेशस्तुतीच्या सुरांशिवाय या मंडपांतील शांतता अधिक भकास वाटू लागते....

याउलट त्याच प्रहरी शहरातील रस्ते, जलाशये,तलाव भक्तीच्या पुराने ओसंडून वाहत असतात...साऱ्या दिशा ढोल पथकांनी दुमदुमत असतात....ताशांसवे लेझीमही फेर धरून नाचत असते....अबीर गुलालाने लाल झालेले गर्दीचे लोट आपल्या बाप्पाचे शेवटचे मुखदर्शन घेण्यासाठी दूरदूरून आज रस्त्यांवर येतात...दोन्ही कर जोडून ते विश्वरूप डोळ्यांत साठवून घेत असतात.... कोणी उरलेल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी नवस म्हणत असतो तर कोणी झालेल्या चुकांबद्दल क्षमा.... पण प्रत्येकजण दीनवाणा होऊन काहीतरी मागत असतो....पण सरते शेवटी प्रत्येकाची आग्रहाची एकच मागणी असते.... गणपती बाप्पा मोरया ।। पुढच्या वर्षी लवकर या ।। पुढच्या वर्षाचे आमंत्रण देता देता डोळ्यांत तरळलेले पाणी आज प्रत्येक चेहऱ्यावर दिसते. लालबागचा राजा असो वा पुण्याचा मानाचा गणपती किंवा मग घरात बसवलेला लाडका बाप्पा... आज सारेच रस्त्यावरच्या मिरवणुकीत सामील असतात.भला मोठा लवाजमा पाठी सोडत आज प्रत्येक राजा पाण्याच्या दिशेने पुढे जात असतो....आपल्या गौरी माईला भेटायला. पण भक्त काही अगदी दूरपर्यंत त्याची सोबत सोडत नाही. पार पाण्यात उतरून आपल्या बाप्पाला निरोप दिल्यावरच समाधानाचे भाव त्या चेहऱ्यांवर पसरतात.

परत येताना आणलेली मूठभर माती त्या रिकाम्या मखरात , त्या रिकाम्या पाटाची पुन्हा शोभा वाढवते...शेवटच्या आरतीच्या स्वरांनी मंडप पुन्हा गजबजतो.... दिव्यांची उजळण पुन्हा एकदा प्रखर होत जाते... गणरायाचा जयजयकार करत एक समाधानाची पण किंचित उदासवाणी प्रसन्नता पुन्हा प्रत्येक चेहऱ्यावर निर्विकारपणे झळाळते....उत्साहाचे नवे कारंजे पुन्हा अंगांगांवर थुईथुई नाचते.... एका नव्या स्वागतासाठी !

- रुपाली ठोंबरे



Blogs I follow :