Wednesday, October 25, 2017

Golden drops of life

आजची पहाट एक नवीनच आणि एक सुंदर अनुभव घेऊन माझ्या जीवनात आली. कारण आज पहाटे ४ वाजताच मला उगवत्या सूर्याचे दर्शन घडले आणि तेही अगदी जवळून...आणि त्यासोबत माझी संबंध सकाळ उजळून निघाली. तुम्ही म्हणाल पहाटेचे साखरझोपेतले स्वप्न बिप्न पाहिले असेल या वेडीने. पण तुमचा हाही अंदाज चुकला बरे का!

जे जे मनात वसते ते सारे स्वप्नातच पाहायला हवे असे थोडीच आहे. आणि त्यासाठीच तर देवाने आपणा प्रत्येकाला एक कलेचे दुपटे आपल्यासोबत पाठविले आहे. कोणाला नृत्य तर कोणाला गायन , कोणी लिहिण्यात तर कोणी रेखाटण्यात स्वतःला व्यक्त करत असतो. मीही दैवकृपेने अशाच एका कलेने बऱ्यापैकी समृद्ध आहे आणि त्यातूनच आज हा माझ्या कल्पनेतला सूर्य मी समोर कॅन्व्हासवर निर्माण केला. आणि या सूर्याच्या निर्माणाने एका वेगळ्याच आनंदात मी स्वतःला न्हाऊन घेतले.

Aboriginal आर्ट माझ्यासाठी एक नवीन पण खूप सुंदर चित्रप्रकार. नेटवर काही शोधता शोधता ऑस्ट्रेलिया मधील या चित्रकलेशी परिचय झाला. फक्त ठिपके आणि काही विशिष्ट संज्ञाचित्र वापरून तयार केलेले चित्र. यात कसोटी असेल ती तुम्ही निवडलेल्या रंगसंगतीची. पाहता क्षणीच मी या चित्रांच्या प्रेमात पडले. वर वर पाहायला सोपे वाटत असले तरी प्रत्यक्षात ते काढायला बसणे म्हणजे तुमच्या धीर-चिकाटीची परीक्षाच. अचूक रंगसंगती आणि एकाच वलयातील विविध ठिपक्यांच्या आकारातील साम्य यावर त्या चित्राचे सौन्दर्य अवलंबून असते.

बहुदा या प्रकारात पाल , बेडूक साप ,कासव ,कांगारू असे विविध प्रकारचे प्राणी चितारले जातात आणि ते खरोखर सुंदरही दिसतात. पण घरातल्या हॉलसाठी काही बनवते आहे म्हटल्यावर काहीतरी वेगळे आणि ऊर्जा देणारे काही करूया असा विचार केला. आणि मग कल्पनेतला सूर्य हळूहळू ठिपक्या ठिपक्यांनी कागदावर उतरू लागला. रात्रीच्या काळोखात सुरु केलेला हा ठिपक्यांचा खेळ सकाळी अंदाजे ७-७.१५ वाजता संपला आणि त्यातून निर्माण झालेल्या सूर्यकिरणांमुळे खरोखर अंगभर आनंदाचे ओहोळ वाहू लागले.एकाच वेळी असंख्य समाधानाचे क्षण माझ्या दिशेने धावू लागले. खरेतर कमी झोप झाल्यामुळे आणि एकाच ठिकाणी बसून राहिल्याने एक प्रकारचा आळस किंवा निरुत्साह अपेक्षित असतो पण उलट नेहमीपेक्षा आज अधिक प्रसन्न वाटत होते. त्या प्रत्येक सोन्याच्या कणातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा असेल का कि ही आणखी कोणती नवी जादू?


Golden drops of life showered by Sun
ही अद्भूत जादू तर आहेच, केवळ माझ्याच नव्हे तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात लपलेली असते. जादू... आपल्या आवडत्या छंदाची.' जे न दिसे स्वप्नी ते ते सारे दिसे या कविमनी ' या उक्तीप्रमाणे एका कलाकारास देवाने कला ही इतकी मोठी देण दिली आहे कि ज्यामुळे अशक्यही शक्य करण्याची ताकद प्रत्येकात निर्माण होते. आणि जे जे आवडते ते ते करायला थकवा कधीच आड येत नाही. आणि आजच्या धकाधकीच्या थकलेल्या जीवनात अशा कलेच्या माध्यमातून नवा उत्साह आणि नवीन ऊर्जा मिळवण्याचा हा एक अतिशय सोपा उपाय.आज प्रत्येकाकडे वेळ मिळत नाही हे एक अपेक्षित तयार कारण जरी असले तरी स्वतःच्या आनंदासाठी आणि इतरांच्या सुखासाठी तो थोडासा काढण्यात काही गैर नाही. खरे तर मी तर म्हणेन वेळ हा कधीच मिळत नसतो तो नेहमी काढावा लागतो फक्त आपल्या हातात असलेला त्याचा अग्रक्रम आपण कोणत्या गोष्टीला देतो ते महत्त्वाचे.

मग चला तर आजपासूनच या सांसारिक आणि व्यावसायिक जीवनात गुरफटून गेलेल्या मनाला थोडे मोकळे करूया, त्याच्यासोबत दोन गप्पा मारूया , नक्की तुला सुखी होण्यासाठी काय आवडते ते पाहूया आणि मग बघा स्वतःलाच आपल्यातील कलेचा एक झरा सापडेल ज्यातून येणाऱ्या जीवनाची गोडी क्वचितच इतर कोणत्या सुखात मिळेल. तो छंद म्हणून जवळ घ्या , त्याला मनापासून जोपासा आणि मग त्यातून वाहणारी आनंदाची नदी एका विशाल सुखसागराकडे घेऊन जाईल जिथल्या शिंपल्यातही आयुष्य पुन्हा पुन्हा जगावेसे वाटेल. आणि कोणास ठाऊक एखादे दिवशी सुयोगाने स्वाती नक्षत्रात एखादा पावसाचा थेंब त्या शिंपल्यात प्रवेश करेल आणि आपल्या अर्थहीन जीवनाचा अनमोल मोती तयार होईल.


- रुपाली ठोंबरे.

5 comments:

Blogs I follow :