Thursday, January 28, 2016

'विचार'…प्रत्येकाच्या जीवनातील रोजचा पाहुणा

कधी डोळे मिटून शांत बसले तरी तर कधी काम करत असताना, कधी कुणाशी बोलत असताना कधी स्वतःलाच शोधत असताना… तो नेहमीच हळूच माझ्या मनात येऊन जातो. माझाच नाही तर प्रत्येकाचाच हा अनुभव आहे.

कधी चांगल्या रुपात तर कधी वाईटपण घेऊन तो आपल्यात बदल घडवण्याचा प्रयत्न करत असतो. आपण जसा वाव देऊ तसा तो विस्तारत जातो.…अगदी किचकट जाळ्याच्या स्वरुपात ज्याचा गुंता आपण जेवढे गुंतत जाऊ तेवढा वाढतच जातो.कधी हळूच मनात नकळता शिरतो तर कधी आपणच जाणून त्याला आग्रहाचे आमंत्रण देतो. मग हा पाहुणा कधी कधी लगेच जातो तर कधी पार मनाच्या कोपऱ्यात जाऊन कायमचा  आपला तळ मांडून बसतो. कधीकधी आनंदाचे उधाण घेऊन येतो तर कधी आसवांचे पूर. कधी आठवणींसोबत येतो तर कधी तोच आठवणींना झुलवत घेऊन येतो. कधी भविष्यातील गोड स्वप्नांना गोंजारण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी तो येतो.

पण असा हा 'विचार'… कधी नवीन रुपात ,तर कधी जुनाच पुन्हा नव्याने भेटायला नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो. आणि असा एक नव्हे तर अनंत विचारांच्या जाळ्यात आपल्या प्रत्येकाचे मन, मेंदू ,हृद्य सतत गुंतत जाते. प्रकाशाच्या वेगापेक्षाही कोणाचा वेग अधिक असेल तर तो या विचारांचा. चटकन मनात कुठून तरी येतो आणि दुसऱ्या विचाराचे आगमन होताच हळूच खोल मनात कुठे तरी दडून बसतो किंवा एखाद्या पाखरापरी दूर आसमंती उडून जातो… पुन्हा येण्यासाठी.

ज्या मनुष्यरूपी स्थानकापाशी अशी विचारांची ये-जा अधिक ती व्यक्तीच चंचल स्वभावाची. मग अशा अस्थिर मनाप्रमाणेच तोही या जगी स्थिर नाही. पण ज्याच्या ठायी या विचारांना नियंत्रित करण्याचे सामर्थ्य अधिक, त्याच्यासाठी जीवन हे एक अर्थपूर्ण व्यासपीठ होऊन जाते जिथे अचूक ठिकाणी योग्य विचारांचा वापर करून तो या रंगभूमीला आनंदमयी सोहळ्याचे रूप देतो.

खरेतर आपल्या प्रत्येकात ही शक्ती आहे पण तिला जागृत करण्यासाठी कोरडया भक्तीची नाही तर रसाळ फळे देणाऱ्या ध्यानरूपी कृतीची गरज आहे.

- रुपाली ठोंबरे.

Friday, January 22, 2016

"नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा "

"नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा "…शीर्षक वाचताच तुम्ही मनात म्हणालच "काय झाले , हिला वेडबीड लागले की काय ?  काळाच्या प्रवासात ही मागेच थांबलेली दिसते आहे . आज नवे वर्ष सुरु होऊन २२ दिवस झाले आणि या टयूबलाईटला आज आम्हाला नववर्षाच्या शुभेच्छा द्याव्याशा वाटतात? आज १ जानेवारी नाही आणि गुढीपाडवाही नाही,  एवढेच नाही तर जगाच्या पाठीवर कोणत्याही धर्माचा आज वर्षाचा पहिला दिवससुद्धा नाही तरी शुभेच्छा ? कदाचित हिचे शतक पूर्ण झाले म्हणून १०१ वी पोस्ट म्हणजे नवीन सुरुवात असेल."

 खरेतर मला विचाराल तर यामागे काहीच खास कारण नाही. विचार करा नवीन वर्ष म्हणजे नक्की काय असते ? नुसते एक नवे कॅलेंडर? एक नवीन सुरुवात असा भास ? जुन्या काही गोष्टी बदलून नवे काही करण्याचा संकल्प? अगदी बरोबर. जुन्याला मागे सारून नव्या उत्साहाने नवे काही करण्याची उमीद. मग त्या साठी एका विशेष दिवसाची किंवा विशेष सणाची काय गरज ? हा नववर्षदिन खरेतर प्रत्येकासाठी वेगवेगळ्या तारखेला असू शकतो. वर्षातून कितीदाही असू शकतो. इतकेच काय तर प्रत्येक दिवसच नवीन दिवस समजून जोमाने कामाला लागलो तर तो प्रत्येक दिवस वर्षाच्या सुवर्णदिनाचा मान पटकावण्यासाठी आतुर असेल ,योग्य सिद्ध होईल.

आपल्यापैकी जवळजवळ सर्वच नववर्षासाठी नव्या संकल्पांचे मनोरे कधी मनात तर काही जगासमोर रचत  असतात. नवीन वर्षाच्या योजनांचा एक सुंदर स्वप्नमयी आराखडा आखून माणूस मोकळा झालेला असतो. पण तो मनोरा सर्वांचाच पूर्ण होऊन दिमाखात उभा राहतो? हा आराखडा हकिकतेत दृष्टीपटलावर पडतो? खरे तर आज २२ दिवसांतच बहुतेकांचे हे मनोरे ढासळून ते जुन्या घडलेल्या घटनांच्या मातीत विलीन होऊन अदृश्यही झाले असतील. वर्षाचे पहिले काही दिवस जोमाने संकल्पाच्या दिशेने चालत असलेली वाटचाल अचानक दिशाभूल होते आणि मग आज नाही उद्या , उद्या नाही परवा ,परवा नाही… असे करता करता महिने ,अख्खे वर्ष सरत जाते. आणि मग पुन्हा तेच जुने राहिलेले नवे संकल्प बनून पुनर्जन्म घेत उदयास येतात…काळाच्या ओघात पुर्ततेपुर्वीच अस्त होण्यासाठी .

तर माझ्या या नववर्षाच्या शुभेच्छा अशाच काही जणांसाठी. नव्या वर्षाची वाट पाहत २४४ दिवस असेच घालवण्यापेक्षा आजच नवे संकल्प करा, त्यांच्या पूर्ततेचा ध्यास अगदी मनापासून घ्या. आजच काय तर जेव्हा जेव्हा आपण आपल्या निश्चयापासून विचलित होत असल्याचे लक्षात येईल , नवा दिवस समजून तो आणखी दृढ करण्याचा प्रयत्न करा. आणि मग खरेच वर्षाच्या शेवटच्या दिवशी मिळणारे मानसिक समाधान , स्वतःबद्दल वाढलेला आत्मविश्वास नव्या वर्षासाठी नवे काही घेऊन येईल.

- रुपाली ठोंबरे.

Tuesday, January 19, 2016

गोष्ट- दोन रेघांची

'कट्यार काळजात घुसली'…नुकताच काही दिवसांपूर्वी या मराठी विश्वात रुपेरी पडद्यावर झळकलेला नाट्यसंगीतमय चित्रपट. एव्हाना बऱ्याच मराठीप्रेमी आणि संगीतप्रेमींचा पाहून झालेला असेलच. एक सुंदर कलाकृती… सचिन पिळगावकर , सुबोध भावे ,मृण्मयी देशपांडे,अमृता खानविलकर ,शंकर महादेवन यांच्या अभिनयाने आणि शंकर महादेवन, राहुल देशपांडे, जितेंद्र अभिषेकी ,महेश काळे या दिग्गज कलाकारांच्या संगीतमग्न सुरांनी नटलेली.

चित्रपटाचा शेवट झाल्यावरही दोन्ही कानांत पार हृदयापर्यंत घुमत राहतात तेच सप्तरंगी निनाद…आणि मनातील अनंत समाधानाचे काजवे एकापाठोपाठ एक चेहऱ्यावर चमकू लागतात. आणि हा प्रसन्न भाव हीच अखंड कलाप्रेमींकडून या चित्रपटाला मिळालेली रोख पावती.

मला मात्र या स्वरांसोबतच आणखी काहीतरी खास या चित्रपटातून गवसले, आठवणीत राहिले. एक समजूतदार पण रोजच्या व्यवहारातही उपयोगी पडणारी एक शिकवण. जरा हे कट्यारीचे मनोगत पुन्हा आठवून पहा… एका नगरातील दोन संगीत घराणी… त्यांच्यातील वर्षानुवर्षे चालत राहिलेली स्पर्धा… आपल्या आवाजाने डोळ्यांत पाणी आणणारे शास्त्रीजी प्रत्येक वर्षी या विजयाचे मानकरी … याउलट अखंड परिश्रमांनीही विजय पताका न लावू शकणारे ,सतत हरणारे खानसाहेब… स्पर्धेत हरत असले तरी त्यांची स्पर्धा जिंकण्याची जिद्द हरली नाही… पण एका टोकाला जाऊन तेही मनातून हरले… पुढे पुढे प्रयत्नांपेक्षा ईर्ष्या जास्त वेगाने वाढली… आणि शेवटी चुकीच्या मार्गाने का होईना पण खानसाहेबांनी प्रतिस्पर्धकालाच मिटवून या स्पर्धेवर,कट्यारीवर आपल्या नावाची मोहोर चढवली…पुढे कित्येक वर्षांनी शास्त्रींच्या एका विद्यार्थ्याचे येणे…आणि सत्य उमगताच सुडाच्या भरात खानसाहेबांनी केलेली चूकच पुन्हा करू इच्छिणे….

अशा क्षणी खांसाहेबांची मुलगी झरिना या विद्यार्थ्याला एक समजूतदार मूलमंत्र देते आणि नकळत आपल्यालाही काहीतरी अमुल्य देऊन जाते.एक छोटीशी गोष्ट- दोन रेघांची … " दोन असमान रेघांमधील मोठया रेघेलाही जेव्हा लघू करण्याची गरज भासते तेव्हा तिचे अस्तित्त्व नष्ट करण्यापेक्षा शेजारी तिच्यापेक्षाही मोठी रेघ रेखाटा… ती आपोआपच लहान होईल आणि या नाविन्याचे श्रेष्ठत्व मान्य करेल…करावेच लागेल". आणि या पदपथावर पुढे चालत जाऊन हा विद्यार्थी प्रयत्नांची खडतर तपश्चर्या सुरु करतो आणि शेवटी खांसाहेबांच्या मुखातुनच स्वतःचे श्रेष्ठत्व वदवून घेतो आणि प्रतिस्पर्धकाचा नाश न करता त्याचा समूळ पराभव करतो.… यालाच म्हणतात एका तीरात २ पक्षी.

असा हा चित्रपट आणि हा नायकाच्या जीवनाला कलाटणी देणारा तो प्रसंग आपल्या सारख्या सामान्यालाही खूप काही शिकवून जातो. आजचे जग स्पर्धेवरच टिकले आहे असे कायम वाटू लागले आहे. घरात,शाळेत, नोकरीत,समाजात सगळीकडेच वेगवेगळ्या स्पर्धा. आणि या सर्वच स्पर्धांमध्ये आपण कायम एक स्पर्धक म्हणून उभे असतो… अशा वेळी प्रतिस्पर्धी काही वेळा आपले असतात तर कधी अनोळखी…पण चढाओढ मात्र कायम… कधी तेच तर कधी वेगळे स्वरूप… पण नेहमी एक विजयी तर दुसरा पराजयी होऊन राहणार. ही स्पर्धा नवे बदल घडवून आणण्यासाठी,प्रोत्साहनासाठी,समाधानासाठी ,नव्या प्रयत्नांसाठी निश्चितच असावी पण त्यातून वाढणारी ईर्ष्या नसावी. कित्येकदा यश मिळवण्यासाठी लोक चुकीच्या पद्धतीचा वापर करतात. पण हे यश खरे समाधान देते? विजयी होणाऱ्याचाच कूटनितीने नाश केल्यावर आपल्यापेक्षा दुर्बलांशी स्पर्धा करून त्यात विजयी होण्यात काय अर्थ? त्यापेक्षा आपल्यापेक्षा सबळ आणि विजयी होणाऱ्यापेक्षा अधिक परिश्रम करून योग्य तऱ्हेने पुढे जात राहिले कि यशही शेवटी आपल्या पावलांपाशी येऊन एकदा थांबेलच . स्वतःच स्वतःच्या कर्तृत्त्वाने एका सर्वोच्च शिखरावर पोहोचलो कि आपल्याला हरवणारा आपोआपच अपयशी सिद्ध होईल. एवढेच नाही तर आपले श्रेष्ठत्व तो स्वतःच जगासमोर मान्य करेल आणि यातच संपूर्ण विजय आणि परमानंद आणि अखंड समाधानाचा मेळ असेल.

- रुपाली ठोंबरे

Wednesday, January 13, 2016

सप्ततरंग स्वररंग



दंग मृदूंग सतार तार छेडत 
सप्ततरंग स्वररंग येई निनादत निरंतर 

राग-गी-अभंग शब्दसंग
कर्णमधूर ते स्वरबोल अखंड सुंदर 

सुख अनंत येत खुल अंतरंग 
मन होऊन पतंग जा दूर भेदत अंबर 

धुंद-बेधुंद लय हा अथांग सागर 
थेंब सुरमयी समीप येत व्हावे हृद्यांतर 

- रुपाली ठोंबरे

Blogs I follow :