Thursday, July 26, 2018

चिमुकला गुरू...




आज सकाळी सकाळी एक डोळा चोळत आणि नंतर दोन्ही हातांनी आळस देत लहानगा ओम उठला.
तक्रारीच्या स्वरात मला उद्देशून म्हणतो कसा?
"आई गं, हा बघ तुझा अलार्म वाजतो आहे मोबाईलवर."
मीसुद्धा धावत पळत त्याच्यापर्यंत पोहोचले आणि पाहते तो काय?
मोबाईलवर शुभेच्छांच्या मेसेजेसची मालिका सुरु होती.
त्याचे एक तीव्र गायन सुरु होते आणि त्यामुळेच आमचा बाळ आज वेळेपूर्वीच उठला होता.
मोबाईल हाती घेऊन त्याला म्हटले,
" बाळा , अलार्म नाही... काल बंद झालेले नेट अचानक सुरु झाले आणि खूप सारे मेसेजेस एकाच वेळी जागे झाले आणि सुरु झाली त्यांची किलबिल...त्या चिवचिवाटाने तुझी मोडली ना ?"
" हम्म्म... ( एक मोठा हुंकार आणि त्यापाठोपाठ त्याचा त्यादिवशीचा पहिला प्रश्न समोर आला.)आज काय तुझा वाढदिवस आहे ? केक मिळणार आज ?"
ते ऐकून हसूच फुटले मला...ते आवरत म्हटले ,
" नाही रे . पण आज गुरुपौर्णिमा आहे ना...आज गुरूचा दिवस... त्याच शुभेच्छांचा हा पाऊस...."
अपेक्षेप्रमाणे भले मोठे प्रश्नचिन्ह त्या निरागस कोवळ्या चेहऱ्यावर उमटले होते...बोबड्या बोलांतून ते माझ्या कानांवर स्थिरावले.
" गुरू... ? म्हणजे ?"
सकाळी सकाळी घाईगडबडीत अवतरलेला हा प्रश्न...पण त्या शंकेचे निरसन करणे तर भागच होते. मनात म्हटले सोप्यात सोपे उत्तर देऊन या प्रश्नाला पूर्णविराम देऊन टाकूया आणि मी आपले काही शब्द घेऊन उत्तर मनाशी गुंफू लागले...आणि पुढे त्याच शब्दांचा आधार घेऊन चिमुरड्याला समजावू लागले,
" गुरु म्हणजे ते ते सर्वजण ज्यांच्याकडून माणूस काहीतरी शिकतो.... तुझ्या शाळेतल्या टीचर... तुझी आजी ... आबा ... तुझी आई , बाबा... असे सर्व ... "
मी आपली जे जे शिक्षक म्हणून माझ्या त्या क्षणी ध्यानात येत होते त्या सर्वांची नावे आठवून सांगत होती...तोही कुतूहलाने ऐकत होता. त्याच्या बालपणातील अशा सर्व गुरूंची लिस्ट केल्यावर आणि ती त्याला पटल्यावर मला वाटले आता प्रश्न मिटला... पण छे ! एक नवा प्रश्न आमच्या दिनचर्येत अडसर निर्माण करत उपस्थित झाला,
" तुझे पण गुरू आहेत? कोण कोण ?"
पुन्हा एकदा तीच नाती माझी या संबोधनाने त्याला सांगावी लागली...आठवून आणखी काही नावे अधिक होत गेली...नकळत का होईना आज ओममुळे आजच्या शुभ दिनी सकाळीसकाळीच माझ्या साऱ्या गुरूंचे नामस्मरण झाले. त्यानंतर बऱ्यापैकी समाधानाची एक लकेर त्याच्या चेहऱ्यावर उठून आली आणि बिछान्यात लोळत पडलेला तो खाली उतरला. चालताचालता तो स्वतःशीच सांगत होता,
" म्हणजे... गुरु म्हणजे ती सर्व माणसे जी आपल्याला काहीतरी शिकवतात.... पण मग ते जे शिकवतात पण माणूस नसतात ते ?... "
झाले... एक नवा प्रश्न आ वासून सामोरी उभा ठाकला.
" आईईई... काल मी त्या पुस्तकातून बघून बघून चित्र काढले ना...?"
"हो, पण मग आता त्याचे काय ?"- आईच्या स्वरांत सकाळची घाई आणि त्यामुळे थोडीशी नाराजी जाणवत होती.
" मी एकटाच होतो...म्हणजे काल मला ते चित्र फक्त त्या पुस्तकाने शिकवले. मग ते पुस्तक पण माझा गुरु आहे  का ? पण ते तर माणूस नाही ना ?"
चिमुरड्याच्या या प्रश्नाने मात्र मी चपापले... एवढ्याश्या मुलाच्या मनात हा किती मोठा विचार... मलाही थोडे कुतूहल वाटले... आणि थोडी मज्जा पण...त्याची अंघोळ घालता घालता त्याच्या अशा कितीतरी प्रश्नांना भरतीचे उधाण आले आणि त्या प्रश्नांची उत्तरे देता देता माझ्याही मनातील विचारांना चांगली चालना मिळाली. आणि मी उत्तर दिले ,
"अरे वाह! किती हुशार. हो हो , पुस्तके ही देखील आपले गुरूच आहेत.आणि हो , ती पुस्तके ज्या लेखकांची देण असते ते सर्व देखील अप्रत्यक्षरित्या आपले गुरूच कारण त्यांच्या विचारांतूनच आपण घडत असतो."
स्वतःचा बालविचार आईलाही पटला हे पाहून छोट्या युवराजाच्या गालावरची कळी खुलली. तो आणखी उत्साहात म्हणाला,
" मी गोष्टी, कविता ,मनाचे श्लोक यातूनही खूप काही शिकतो. ते सर्व पण मला शिकवतात म्हणजे ते पण माझे गुरु , हो ना ?"
मी  हासत होकारार्थी मान हलवली. ओम पुन्हा विचारात गुंतला आणि त्याने लगेच काहीतरी आठवून विचारले ,
" अगं आई , त्यादिवशी तू म्हणालीस बघ ... त्या मुंगीकडून शिकायची ती जिद्द , आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक प्रयत्न करण्याची चिकाटी... म्हणजे ती मुंगी पण ... ?"
यावर मला थोडे हसू येत असले तरी एक वेगळे कौतुक वाटत होते. 
" हो ... प्राणी , पक्षी .. ही झाडे ,आकाश , धरती, सूर्य ,तारे ... हे आपले सर्व निसर्गमित्र आपल्याला सतत काहीतरी शिकवत असतात...त्यामुळे ते सर्वही गुरुच आहेत.त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रत्येकाने नित कृतज्ञ असावे. तू  ग. दि. माडगूळकरांची ती कविता ऐकली आहेस का ? आणि मी ती कविता गुणगुणू लागले ,
बिन भिंतींची उघडी शाळा 
लाखो इथले गुरू ... 
झाडे,वेली,पशू ,पाखरे 
यांशी गोष्टी करू !" 

माझ्यासोबत ओमसुद्धा हे नवे गाणे आवडीने गाऊ लागला. गाणे म्हणता म्हणता मी स्वतःशीच म्हटले ,
"खरेच या जगात प्रत्येकजणच कोणाचा तरी गुरु असतो आणि कोणाचातरी शिष्य असतो. ही दोन्ही नाती एखाद्या स्फटिकाप्रमाणे निर्मळ असतात.... "
माझे असे स्वतःशीच पुटपुटणे जिज्ञासू ओमसाठी एका नव्या प्रश्नाचा स्रोत होते ,
"म्हणजे मी पण कुणाचा तरी गुरू ?.... वाहव्वा ! कुणाचा ?"
मी हसले आणि म्हटले ,
" हो आहे ना... माझा बाळ माझाच गुरू आहे."
"तुझा ?" - ओम . 
" हो.... मग काय तर!  किती काही शिकते मी तुझ्याकडून आणि तुझ्यामुळे.... अगदी प्रत्येक क्षणाला. प्रत्येक आई ही जशी प्रत्येक मुलाची प्रथम गुरू असते... अगदी तसेच येणारे मूल हे त्या आईसाठी एक नवा, खूप काही शिकवणारा चिमुकला गुरू असतो... फक्त या लहानग्यांकडून शिकण्याची कला आपणा मोठ्यांमध्ये असली पाहिजे... " 
हे बोलणे ऐकून ओम खुद्कन हसला...एक वेगळाच आनंद त्याच्या चेहऱ्यावर विराजमान दिसत होता.आनंदाने उड्या मारत त्याने मघाशी अर्ध्यावर विरलेली माडगूळकरांची कविता पुन्हा तेथूनच गुणगुणण्यास सुरुवात केली.... 

बघू बंगला या मुंग्यांचा, सूर ऐकुया या भुंग्यांचा
फुलाफुलांचे रंग दाखवील फिरते फुलपाखरू

सुगरण बांधी उलटा वाडा, पाण्यावरती चाले घोडा
मासोळीसम बिनपायांचे बेडकिचे लेकरू

कसा जोंधळा रानी रुजतो, उंदीरमामा कोठे निजतो
खबदाडातील खजिना त्याचा फस्त खाऊनी करू

भल्या सकाळी उन्हात न्हाऊ, कड्या दुपारी पर्‍ह्यात पोहू
मिळेल तेथून घेउन विद्या अखंड साठा करु 


- रुपाली ठोंबरे.
 

Sunday, July 22, 2018

विठ्ठल अनुभवला




कलेच्या गाभारी आज 
माझा विठ्ठल... अवतरला 
सूर, शिल्प ,रंगांमधुनी 
आज माझा... विठ्ठल अनुभवला 


किती सोवळे रूप विठू माऊलीचे 
प्रकट जाहले सारे...भाव अंतरीचे 
अंतरंगाचे रंग या सावूलीचे 
उधळले आज...मन दंग झाले 


गगनासी भिडला सूर अमृताचा 
सोनियाचा हात... घडे देह विठ्ठलाचा  
कल्पनांचा कुंचला रंग भावनांचा 
भक्तीचा पाऊस... झाला विठू गजराचा  


- रुपाली ठोंबरे. 




Thursday, July 19, 2018

तो...आणि ती (भाग ८)

" अगं गोदावरी, कोण आलं आहे गं ?"
हातातले वर्तमानपत्र पुन्हा व्यवस्थित टेबलावर ठेवून आणि डोळ्यांवरचा चष्मा डोक्यावर घेत तिच्या बाबांनी आतूनच आईला विचारले.
"अहो , एक तरुण मुलगा आला आहे. मी प्रथमच पाहते आहे याला. आपल्या निरूबद्दल विचारतो आहे..."
निर्वीच्या आईचे बोलणे पूर्ण होईपर्यंत तिचे बाबा तेथे येऊन पोहोचले होते. त्यांना पाहताच त्या तरुणाने नम्रतेने पुन्हा एकवार दोघांना नमस्कार केला. त्यांनी एकवार त्या तरुणाला नखशिखांत पाहिले. पण जराशीही ओळख पटली नाही तेव्हा त्यांनीच विचारले,
" कोण तुम्ही ? आधी कधी भेटल्याचे आठवणीत नाही माझ्यातरी. म्हणजे ओळखता का तुम्ही आमच्या ... ?"
" हो हो काका , मी दुबईहून आलो आहे. दोन महिन्यांपूर्वी निर्वीमॅडम आमच्याच हॉटेलमध्ये उतरल्या होत्या. मी त्या हॉटेलचाच मॅनेजर,निहाल देशमुख ..."
त्याने बाबा बोलत असताना मध्येच बोलायला सुरुवात केली तशीच त्यांनीदेखील त्याचे बोलणे मध्येच तोडत त्यालाच प्रतिप्रश्न केला.
"बरं मग ? आता इथे काय काम काढलेत ?"
हा अनपेक्षित प्रश्न कानांवर पडताच तो थोडा गोंधळलाच. पण तिच्या आईला काहीतरी आठवले आणि तिने एक गोड स्वागताचा सूर लावला.
"अय्या , खरेच की! अहो मॅनेजरसाहेब , खूप ऐकले हो तुमच्याबद्दल. तिथून आल्यापासून तिच्या ओठी कायम तुमचे नाव आणि तुमच्या गोष्टी....अहो , असे काय करता? हेच तर ते ज्यांनी आपल्या निरूला त्या परदेशात इतकी मदत केली. अगदी जेवणापासून काळजी घेतली ना तुम्ही... दुबई फिरवली ... "
"अगं हो हो. मग त्यांना घरात तरी घेशील का आता? सॉरी हां, मी नाही ओळखले तुम्हांला. या या आत या."
अशाप्रकारे बाबांनी सुद्धा त्याचे तिच्या घरात स्वागत केले आणि मॅनेजरसाहेबांचा गृहप्रवेश आज  झाला.

आई लगेच आत जाऊन थंड पाण्याने भरलेला ग्लास घेऊन आली.निहाल  चहूकडे पाहत काहीतरी शोधत असल्याचे लक्षात येताच ती पाहुण्यांना म्हणाली,
"अजून ऑफिसमधून यायची आहे. पण येईलच इतक्यात. तुम्ही बसा निवांत. मी चहा ठेवला आहे. तो घेऊनच जा आता आले आहात तर."
निहाल काही बोलला नाही यावर. त्याचे नेहमीचे स्मित तसेच चेहऱ्यावर नव्याने आणून त्याने मानेनेच होकार दिला. पाण्याचा घोट घोट घेत त्याची नजर त्या हॉलमधल्या प्रत्येक गोष्टीला न्याहाळत होती. कोपऱ्यातल्या फुलदाणीमधली निर्जीव फुले सुद्धा टवटवीत होऊन प्रसन्न मुद्रेने त्याच्याकडे पाहत होती. त्या चार भिंतीच्या आतील ते सारे जग तिथे निर्वीचे अस्तित्व प्रकट करत होते. तिने रेखाटलेली चित्रे त्याच्या मनाला विशेष स्पर्श करून गेली. तो मनातच स्वतःशी म्हणाला तिच्या चित्रांबद्दल आजवर केवळ ऐकले होते पण आज प्रत्यक्ष पाहिले आणि भारावून टाकले तिच्यात सामावलेल्या या सर्व कलागुणांच्या रंगानी... हे सर्व अप्रतिम आणि फार सुंदर आहे... अगदी तसेच जशी ती. इतक्यात नजर गेली ती कोपऱ्यात असलेल्या एका छोट्याश्या टेबलावरच्या फोटोफ्रेमवर. एक ७-८ वर्षांची चिमुरडी कोळीण त्याला खुणावत आहे ... हासत त्याचे गोड स्वागत होत आहे असा भास एकवेळ त्याला झाला आणि तो त्या फोटोकडे कुतूहलाने पाहतच राहिला.ते पाहून बाबा हसत काहीसे आठवून सांगू लागले ,
" ही आमची निरू... म्हणजे निर्वी. आता ओळखता येणारच नाही."
" हो ना. दुसरीला होती तेव्हा शाळेतल्या कार्यक्रमासाठी कोळीण झाली होती."
आई कपभर चहा आणि बशीभर चिवडा घेऊन बाहेर आल्या.त्या फोटोकडे पाहत त्यांनाही तिचे बालपण अगदी क्षणभरात आठवून गेले होते.
"अरे लाजू नकोस रे. घे , अधिक काही नाही.... फक्त लाडू आणि चिवडा आहे."
आई नाही नाही म्हणणाऱ्या त्याच्या हाताला न जुमानता त्याच्या हातांवर ती बशी ठेवून समोरच्या सोफ्यावर स्थानापन्न होत पुढे विचारते.
" मग तू दुबईलाच असतोस ? मी ऐकले तुझ्या सोबत तुझी आई पण असते ना ?मध्ये त्यांची तब्येत ठीक नव्हती असे ही म्हणाली होती.आता कशा आहेत त्या?"
 तो चमकलाच.तिने माझ्याबद्दल किती काही सांगितले आहे, किती काळजी करत असायची ती आणि मी होतो कि तिला एकवेळ फोनसुद्धा केला नाही मी आणि तिने केला तेव्हाही कधी धड बोललो नाही.तो त्याच्याच विचारांत हरवला पण त्या प्रेमळ वृद्ध जोडप्याच्या नव्या प्रश्नांनी पुन्हा त्याला वर्तमानात आणले होते.त्याने तर आपल्या स्वभावाने आणि बोलण्यातला गोडव्याने कधीच त्यांची मने जिंकली होती. खूप गप्पा झाल्या. इकडच्या तिकडच्या, परदेशातल्या आणि गावाकडच्याही...हो बोलता बोलता विषय निघाला आणि दोघांच्या गावाचा पत्ता एकच असल्याचे लक्षात आले...तसे त्या दोघांचे प्रेम, प्रश्न आणि गोष्टी आणखी उतू जाऊ लागल्या... शोधता शोधता तिच्या आईने त्याच्या आईसोबत असलेले स्वतःचे दूरचे नातेही अगदी अचूक हुडकून काढले. ते सापडले तसे तिच्या प्रश्नांना जणू नवी वाटच मिळाली पण तो मात्र इतक्या दूरच्या नात्यातल्या कोड्यांत अधिकाधिक गुरफटून गेला आणि शेवटी त्याची एक वेगळीच कोंडी झाली.
" मी आईला विचारून सांगतो तुम्हांला. नाहीतर मी तुम्हांला तिचाच नंबर देतो ना? म्हणजे काय आहे तुमचीही चांगली ओळख होऊन जाईल आणि बोलणेही होईल दोघींचेच."
असे म्हणत निहालने कसाबसा या प्रश्नउत्तरांच्या कार्यक्रमाला पूर्णविराम देण्याचा यशस्वी प्रयत्न केला.बराच वेळ असाच गेला पण तिचा काहीच पत्ता नव्हता त्यामुळे त्याची चुळबुळ सुरु झाली. ती बाबांच्या नजरेतून लपली नाही तेव्हा ते उठून दरवाजापर्यंत जाऊन हॉलमध्येच उगाच एक फेरी मारून त्याच्यापाशी येऊन उभे राहिले ,
" एव्हाना यायला हवी होती. पण आज कसा इतका उशीर होतो आहे काही कळत नाही. एखाद्या मीटिंगमध्ये किंवा ट्रॅफिकमध्ये अडकली असेल. पण तुम्ही बसा. ती येईलच इतक्यात."
हे ऐकून तो पुन्हा स्थिरावला.बाहेरून जाणवणारी चुळबूळ शांत झाली असली तरी मनात अजूनही एक खूप मोठा समुद्र उसळ्या मारत होता. पुन्हा बराच वेळ गेला आणि तो उठला. घड्याळाकडे नजर टाकून निहाल  दोघांना उद्देशून म्हणाला ,
" आता निघायला हवे मला. खूप उशीर झाला आहे.आई वाट पाहत असेल. मॅडमना सांगा मी येऊन गेलो ते. पण तुम्हांला भेटून आनंद झाला. "
तोच निरोप घेऊन घराबाहेर पडणारी पावले अचानक थबकली आणि तो लगेच माघारी वळला.
" हे पहा ना. ज्यासाठी आलो ती गोष्ट देणे राहूनच गेली. आईने पाठवले आहे हे निर्वीसाठी. आठवणीने जाऊन दे असे म्हणाली होती म्हणूनच आलो होतो. ही घ्या. आता तुम्हीच त्यांना द्या. आमची पुन्हा भेट होईल न होईल... "
असे म्हणत त्याने खांद्यावर घेतलेल्या बॅगमधून एक पिशवी बाहेर काढून तो ती तिच्या आईच्या हाती देऊ लागला.
" अहो , तुम्ही द्या की. त्या निमित्ताने तुमचे पाय पुन्हा या घराला लागतील. आणि आपलीही भेट होईल."
"अगदी बरोबर म्हणालीस तू, अनुराधा. हो हो... तुम्हीच द्या तिला. आणि पुन्हा या नक्की ... फक्त एकदा तिला फोन करा म्हणजे तिची भेट होईल ... नाहीतर पुन्हा आजसारखे व्हायचे."
तिच्या बाबांनी लगेच आईच्या शब्दांत शब्द मिळवून त्याला पुन्हा घरी येण्याचे आमंत्रण दिले. त्यालाही आग्रहात्सव मान्य करावेच लागले आणि त्याने ती भेटवस्तू पुन्हा तशीच बॅगेत घालून दोघांचा निरोप घेतला. जाताना कानांवर पडलेले तिच्या आईबाबांचे आपापसातील शब्द त्याला त्या कुटुंबासोबत जुळणारे एक नवे नाते निर्माण होत असल्याची चाहूल देऊन गेले.ते शब्द होते,
" अहो , किती छान मुलगा आहे ना? आपल्या निरूसाठी हा असा एखादा मुलगा चालून आला तर किती चांगले होईल ना?"

निर्वीची भेट चुकली याचे निहालला खूप वाईट वाटत होते पण त्या कुटुंबातल्या व्यक्तींच्या मनात जागा निर्माण झाल्याचा आनंद न जाणे का त्याला एक आगळेवेगळे समाधान देत होते. तो जुन्या नव्या विचारांत इतका गढून गेला होता कि अवचित आलेल्या पावसाच्या धारा त्याला चिंब करू लागल्या याचेही भान त्याला उरले नव्हते. आणि तसेही भान असूनही काही उपयोग नव्हता कारण या अचानक झेपावणाऱ्या वळिवाच्या पावसाची अजिबात आशा नव्हती. संबंध सभोवताल त्याच्याप्रमाणेच गोंधळून गेला होता. पण पाऊसच तो... अवकाळी आला तर भिजवणारच. याला इलाज नव्हता.आसपास सर्व लोक इकडेतिकडे धावत पळत आसरा शोधण्यात गुंतलेली असताना तो मात्र उभा राहून तो पाऊस पाहत होता....जणू सर्व पाऊस एका घोटात पिऊन घ्यावा अशा अविर्भावात. लगाम तोडून बेभान धावणाऱ्या घोड्यांप्रमाणे सैरावैरा धावणाऱ्या वाऱ्यासोबत तो मनातल्या तारा जोडू पाहत होता....एका लयीत , एका सूरात वाजणारे त्याच्या मनातल्या गाण्याचे स्वप्न उगाचच त्या पावसात कुठेतरी छेडले जात आहे असा भास त्याला होऊ लागला. ओठांवर नकळत एक स्मित रेखाटले जात होते.... क्षणाक्षणाला तो समाधानाचा आनंद दाट होत होता आणि चेहऱ्यावर त्याचे असंख्य तरंग उठून येत होते. मध्येच डोळ्यांसमोरच्या काळ्याकुट्ट मेघांनी भरून आलेल्या आभाळात विजेची एक लकेर लख्खकन चमकून गेली. त्यापाठोपाठ ढगांचा खूप मोठा गडगडाट कानांवरती घणाघाती घाव घालत आसमंती घुमला. आणि अगदी त्याच क्षणी खळ्ळकन असा आणखी एक मोठा आवाज मनातल्या गाभाऱ्यातुन आला... त्याच्या मनातल्या स्वप्नाच्या तुटण्याचा.चेहऱ्यावरचे आनंदाचे तरंग कुठल्या कुठे गायब झाले...काही क्षणांपूर्वी ओठांवर उमललेले स्मितदेखील आता क्षणात विरून गेले...त्या जागी त्या चेहऱ्यावर एक उदास सावली पसरली. तिला आठवता आठवता त्याला तिचा तो मित्र आठवून गेला होता... दूरदेशी कुठेतरी वसलेला... आणि तिच्याही मनात खोलवर ठसलेला. त्याच्या आठवणीने तुटलेले ते स्वप्न क्षणात डोळ्यांत अश्रू बनून उभे राहिले. पण कुणाला दिसेल ते ... आणि कुणाला जाणवेल... अशी आशाही करणे व्यर्थ !नाही हे शक्य नाही ... कधीच शक्य होणार नाही. मी असा कुणाच्या मध्ये येऊन एखाद्याच्या स्वप्नांना तडा जावा ... नाही नाही हे शक्य होणार नाही... कमीत कमी या जन्मात तरी. मला सावरायला हवे.तो स्वगतच बोलत राहिल. पुन्हा एक जोरदार वीज कडाडून ढगांचा गडगडाट झाला आणि तो भानावर आला... 


पूर्णपणे वर्तमानात होता तो आता . एकवार स्वतःवर नजर टाकली त्याने... तो ओलाचिंब झाला होता... आभाळात वर दुसरी नजर टाकली, अश्ववेगाने सरी त्याच्या दिशेने झेपावत होत्या... तीच नजर आसपास चौफेर भिरभिर फिरली... एक आडोसा सापडला आणि पुन्हा नखशिखान्त भिजलेल्या देहाला पावसापासून वाचवण्यासाठी तो वेगात धावला....गर्दी करून उभ्या असलेल्या लोकांमध्ये स्वतःसाठी जागा निर्माण करण्याचा त्याचा आटापिटा सुरु होता... खिशातून शुभ्र रुमाल बाहेर काढला... तोही त्या चिंब कपड्यांसोबत ओला झालेला होता...त्याची घडी मोडून , एक दोन झटके मारून भिजलेल्या डोक्यावरून , मानेवरून , हातांवरून फिरवला... हा सर्व आटापिटा उगाचच. मन आता एका दिशेने स्थिर झाले होते. मनोमन एक विचार स्पर्शून गेला सर्वांच्याच हिताचा. वाटले बरे झाले नाही भेटली ती ते. नाहीतर कधीतरी चुकून रेखाटले गेलेले स्वप्नचित्र नव्या क्षणांच्या रंगांनी आणखी रंगले असते...पण काय उपयोग ?... ते एक मृगजळच ना ... आज ना उद्या शेवटी विरून जाणारे. नकोच पुन्हा कधी तिला भेटायला... असे म्हणत त्याने खिशातला चिंब भिजलेला कागद चुरगळून खाली फेकून दिला.... त्यावरच्या तिच्या घराच्या पत्त्यामधली निळी अक्षरे आणि मोबाईलच्या नंबरचे निळे आकडे त्या अखंड कोसळणाऱ्या पाऊसधारांत विरघळून दूर गेले... शेवटी उरला तो पांढरा कागद... शाईच्या पुसट जुन्या व्रणांना अजूनही जोपासून असणारा... नंतर तोही हळूहळू तुकड्यातुकड्यामध्ये त्या धूसर शाईसोबतच वाहून गेला.... आणि त्यासोबत तिच्यापर्यंत पोहोचवणारा शेवटचा मार्गसुद्धा. 

कितीतरी वेळाने एक रिक्षा दुरून येताना दिसली आणि निहाल धावत तिच्या दिशेने झेपावला.त्याला आता  काळजी लागली होती. लवकरात लवकर घरी पोहोचावे हेच आता त्याच्यासमोर असलेले लक्ष्य होते.हा अचानक आलेला पाऊस एक वैताग वाटू लागला. पण त्याला न जुमानता भरून वाहणाऱ्या खाचखळग्यांतून वाट काढत तो धावला. पण म्हणतात ना नियतीच्या मनात नेहमी वेगळेच काहीतरी असते आणि अगदी तसेच झाले. तो तेथपर्यंत पोहोचला खरा पण तिथे पोहोचेपर्यंत त्या रिक्षापाशी अनेकांची गर्दी जमली होती.सगळ्यांनाच कुठेतरी जाण्याची प्रचंड घाई. पण तरी त्या चढाओढीत त्याने बाजी मारलीच कारण त्याने सांगितलेला पत्ता कदाचित त्या रिक्षावाल्याला आवडला असावा. तसे इतर सर्व आशावादी दूर झाले. रिक्षावाल्याचा होकार मिळताच तो घाईघाईत आत शिरू लागला ,
" अहो दादा , काय करता ? जरा हळू ... उतरतेच आहे ना मी."
असा आतून आवाज आला आणि निहाल क्षणभर स्तब्ध झाला. हा आवाज मी ओळखतो का असा प्रश्न त्याने स्वतःच स्वतःला मनातल्या मनात विचारला आणि मनातून उत्तर आले -' हो '. तो एकाएकी शांतच झाला. त्यानंतर गुलबट केशरी छत्री आकाशाच्या दिशेने उघडली गेली. तिला घेऊन एक मुलगी बाहेर आली. त्याने तिचा चेहरा पाहिला आणि तो पाहतच राहिला तिच्याकडे. तीच होती ती... निर्वी. तिच्या सहवासातले ते दोन महिने एखाद्या चित्रपटाप्रमाणे त्याच्या दृष्टिपटलावर झर्र्कन येऊन गेले.
" भाईसाब , आईये. आपको स्टेशन जाना हैं ना ?"
तो रिक्षावाला त्याला हाक मारत होता. पण हा मात्र एका वेगळ्याच दुनियेत.पैसे दिल्यानंतर तिथून निघणाऱ्या तिलादेखील काहीसे विचित्र वाटले त्यामुळे कोण हा नमुना हे पाहण्यासाठी तिने आपली छत्री वर करून एकवार त्याच्यावर नजर टाकली. आणि जणू तिचे शब्दच क्षणभर गोठले.परंतू तो गोठलेला क्षण जाताच प्रश्नांची एक दीर्घ मालिका तिच्या ओठांतुन बाहेर पडली. 
"निहाल, तुम्ही ? आणि इथे ?असे अचानक भेटाल वाटले नव्हते. इथे काय करत आहात ? आई कशी आहे आता ?आणि काय हो , आमचा फोन उचलण्याची किंवा आम्हाला फोन करण्याची एकदाही तसदी घेतली नाही. हो ना ? विचारू शकते का असे केले ते ?जाताना एकदा भेटले सुद्धा नाहीत. आता हॉटेलमधून गेले आणि आमच्याशी बोलायचीही नाही अशी प्रतिज्ञा घेतली आहे का?... "
"अरे अरे हो हो... सॉरी. अगदी कान पकडून सॉरी. "
तिच्या प्रश्नांमागून प्रश्नांच्या होणाऱ्या या पावसापासून बचावण्यासाठी ही सॉरीची छत्री त्यावेळी त्याला योग्य वाटली आणि अनावधानाने त्याचे कान त्याच्याच दोन्ही हातांनी पकडले गेले. हे सर्व तो रिक्षावाला पाहत आहे असे जाणवले आणि त्याने आपले हात खाली घेतले. त्याला उद्देशून तो म्हणाला ,
" माफ करना. मुझे अब नही जाना हैं । आप जाईये ।"
तो असे बोलला आणि त्यानंतर तो रिक्षावाला पुढे जाऊन थांबला आणि पुन्हा एकदा ती रिक्षा अनेक लोकांच्या गर्दीमध्ये लुप्त झाली.
"बघा , आम्ही तर तुमच्यासाठी इतक्या मेहनतीने मिळालेली सवारीही सोडली. आणि तुम्ही म्हणत आहात कि आम्हांला तुमच्याशी बोलायचे नाही. मला वाटले कि या मॅडम काय आता... हॉटेल सोडले आणि विसरून गेल्या. आता कुठे आमच्यासारखी गरीब माणसे आठवणार ?"
निहालने अशी चेष्ठा केली आणि निर्वी पुन्हा बरसली,
" अरे वाह रे ! हे बरे आहे की हो तुमचे. म्हणजे 'उलटा चोर कोतवाल को डांटे' यातली गत झाली. हो मी विसरले ना म्हणूनच इथे आल्यानंतरही दिवसातून एकदा दुबईचा फोन फिरवायचे मी. मी कित्ती निरोप सोडले होते आमिराकडे तुमच्यासाठी. पण... अशी नाही हो विसरू शकणार मी तुम्हाला. "
निर्वीच्या आवाजात आता आर्तता होती. असेच आणखी काही क्षण गेले तर या पावसात एक नवा आसवांचा पाऊस सुरु होईल हे त्याला जाणवले.तो मोत्यांचा पाऊस झेलण्याची क्षमता त्याच्यात नव्हती त्यामुळे त्याला रोखण्यासाठी तो लगेच हसत म्हणाला,
" अहो मॅडम , काय तुम्ही? चेष्टा केली मी. तुम्हांला तर माहित आहे ना मी कसा आहे ते. मग ? नाहीतर आम्हाला वाटेल तुम्ही खरेच आम्हाला विसरलात."
निहाल असे बोलतो आणि पुन्हा जोरजोरात हसू लागतो. त्यापाठोपाठ तिच्याही हास्याचे कारंजे त्या पावसात थयथय नाचू लागते. तो , ती आणि पाऊस असा तो त्रिवेणी संगम... झाला होता भर रस्त्यात आणि भर पावसात. गप्पा रंगू लागल्या. भिजलेला तो कधीच तिच्या छत्रीत एकवटलेला होता. दोघांच्या डोक्यावर एकच छत आणि त्याखाली रंगला होता मैत्रीचा मेळ. त्याच्या मनात वसलेली प्रीती आता पुन्हा एकदा नव्याने त्याच्याही नकळत त्या नव्या पाऊसधारांत पल्लवित होत होती.समोरच्या पाण्याच्या डबक्यातून भर्र्कन गेलेल्या एका कारमुळे तिच्या दिशेने पाण्याचे कितीतरी तुषार एकाच वेळी झेपावले जे त्या पावसातही तिला जाणवले. पावसाचा वेग आता पूर्वीपेक्षाही अधिक वाढला होता. मैत्रीच्या रंगात हरवलेली निर्वी आता भानावर आली.
"अरे ,किती वेडे ना आपण दोघेही. आपण कधीपासून इथे भर पावसात रस्त्यावरच उभे आहोत. चला तिथे आडोश्याला उभे राहून गरमागरम चहा घेऊ.काय म्हणता चालेल ना? "
 " हो हो. नक्की.तसा माझा चहा घरी झालाच आहे एकदा.पण तरी पुन्हा एकदा तुमच्यासोबत घेऊ.पावसात कितीही चहा घेतला तरी तो हवाहवासाच वाटतो,नाही का ? चला तिथे त्या टपरीपाशी जाऊ. मघाशी बराच वेळ पावसामुळे मी तिथेच उभा होतो. "
" हो का? मग इतके कसे भिजलात ?...  "
निर्वी गालातल्या गालात हसून निहालकडे पाहत पुढे म्हणाली,
"... असे वाटते आहे कि आत्ता एखाद्या धबधब्यावर अंघोळ करून थेट इथे येत आहात. "
त्यावर तोही जरा हसला आणि क्षणाचाही विलंब न लावता निहाल उद्गारला ,
" तुमच्यामुळे "
"काय ? आमच्यामुळे ? म्हणजे हा आरोपही आमच्यावरच लावला तुम्ही. बरे , याचे काय स्पष्टीकरण आहे बरे ?"
" मग काय तर ? तुमच्यासाठीच तर आलो होतो इथे ."
निर्वीच्या चेहऱ्यावरच्या प्रश्नचिन्हाचे उत्तर देण्यासाठी त्याने बॅगेतून ती पिशवी बाहेर काढून तिच्या हाती दिली.
" हे काय आहे ?"
"पहा उघडून. आईने दिले आहे. तुमच्यासाठी.तेच देण्यासाठी इथवर आलो आणि अडकून भिजलो ... तुमच्यामुळे "
निर्वी खूप आनंदी झाली.तिने त्याच्या शेवटच्या वाक्याकडे दुर्लक्ष केले आणि लगेच ती पिशवी उघडण्यास सुरुवात केली. त्याने शेजारच्या टपरीवर दोन चहांची ऑर्डर दिली आणि कौतुकाने पुढे कितीतरी वेळ तिला पाहत राहिला.त्याचे मन पुन्हा तिच्यामध्ये एकाएकी गुंफले जात होते.... नेहमीप्रमाणे तिच्या नकळतच घडत होते ते सर्व. आठवणींच्या रुपेरी चमकणाऱ्या तारांनी त्याच्या मनातली प्रीतीची वेणी प्रत्येक क्षणाला अधिक फुलत होती. ती मात्र या सर्वापासून अलिप्त... त्या क्षणाला मग्न होती हातातली प्रेमाने मिळालेली भेटवस्तू उलगडण्यात.
" व्वा ! कित्ती छान ! काकूंनी हे स्वतः विणले ? आणि तेही इतक्या आजारी असताना ?"
"हो ना. मी म्हटलेही होते आईला की कशाला बनवतेस? तिला कुठे आठवणीत राहू आपण ? मॅडम इथून गेल्या की त्या सर्व काही विसरून जातील...आणि बघा विसरलात ना आम्हांला ? "
"हो हो . तुमची पुन्हा चेष्टा सुरु झाली म्हणजे पुन्हा. काय मिळतं हो असा त्रास देऊन? खरं सांगा मी विसरले का ? असेच वाटते का तुम्हाला ?"
निहाल पुन्हा खळखळून हसला आणि नंतर गंभीर झाला,
" नाही. अजिबात नाही. I am Sorry ...अगदी मनापासून म्हणतोय मी. मला तुमचे सर्व निरोप मिळत होते...पण मीच बोलणे टाळायचो. खरेतर त्या दोन महिन्यांत तुमची खूप सवय होऊन गेली होती. आणि त्यानंतर तुमचे असे जाणे का कुणास ठाऊक खूप त्रासदायक वाटले. आणि तेव्हाच आईची तब्येत बिघडली. मग तिच्या आजारपणात सर्वच खूप विचित्र होऊन गेले . आणि मग मीच ठरवले होते कि ही सवय आणखी वाढवण्यात अर्थ नाही. पण तरी चुकलेच माझे.एकदा तरी  बोलायला हवे होते. आणि मला खरेच वाटले होते कि मॅडम तिथे गेल्यावर विसरून जातील सर्व... म्हणून मग.... सॉरी... ".
"आणि काय हो... कधीपासून ऐकते आहे ... काय मॅडम मॅडम सुरु आहे ? आता आपण हॉटेलमध्ये नाहीत. मी तुमची कस्टमर पण नाही पण तरी आपल्यात हे 'मॅडम' असे संबोधन अजूनही  राहणार का ?"
निर्वीने त्याच्या बाकी सर्व स्पष्टीकरणाला सोडून त्यांच्यातल्या नात्यातल्या संबोधनाविषयीचा प्रश्न किती सहज विचारला.
" नाही. पण आपल्यातला एकमेकांविषयीचा आदर मात्र नेहमी राहणार. अजूनही तुम्हाला 'तू' असे संबोधता येणार नाही मला....तसे नाते नाही बांधले गेले अजून."
" म्हणजे ?... मला समजले नाही."
तोंडातल्या तोंडात पुटपुटणाऱ्या त्याचे काही शब्द तिच्या मनात प्रश्न निर्माण करत होते जे त्याला या क्षणी नको होते. निहालने विषयच बदलून टाकला.
"चहा छान आहे ना एकदम ?"
"हो अगदी फक्कड "- निर्वी उत्तरली.
" पण तुमच्या आईच्या हातच्या चहाची चव मात्र न्यारीच... अजूनही ती चव माझ्या जिव्हेवर रेंगाळते आहे."
"काय ? तुम्ही माझ्या आईला भेटलात ? कधी ?कुठे ?"- ती चकित झाली होती.
"हा काय आजच. आत्ता तुमच्या घरूनच येतोय ना. म्हणून तर मघाशी म्हणालो कि भिजलो ते तुमच्यामुळे.तुमचे आई आणि बाबा होते घरी. दोघांनाही भेटलो. खूप चांगली माणसे वाटली. छान. आईने दिलेले तुमचे गिफ्ट द्यायचे होते ना तुम्हाला, त्यामुळे अगदी आठवणीने आलो होतो."
"दुबईवरून?... फक्त यासाठी ?"
खरेतर निर्वीच्या या प्रश्नाला काही अर्थच नव्हता तरी तिने तो जसा मनात आला तसा विचारून टाकला. आणि दोघांच्यात पुन्हा एकदा हास्याचे कारंजे निर्माण झाले. त्याला आवर घालत तो पुढे बोलू लागला,
"आईने हे फार पूर्वी बनवून ठेवले होते. मध्ये तब्येतीमुळे अपूर्ण राहिले आणि तुम्हाला तिथे असताना द्यायचे राहून गेले. नाहीतर तेव्हाच दिले असते. मध्ये आईला थोडे बरे वाटत होते तेव्हा तिने पुन्हा करायला घेतले आणि ते पूर्णपणे तयार होते. पण तुम्हाला कसे द्यायचे हा प्रश्न होताच. मध्ये ठरवले होते कि कुरिअर करू. पण मग आईचे आजारपण पुन्हा नव्याने समोर आले. वास्तविक पाहता दुबईमध्ये सर्व इलाज खूप खर्चिक वाटत होता. तेव्हा माझ्या मावशीने आम्हांला आईला इथे आणण्याची कल्पना दिली. त्यांचे ओळखीचे खूप चांगले डॉक्टर आहेत शिवाय बरेच नात्यातले लोक आहेत. तिथे एकटे राहण्यापेक्षा तिलाही इथे चांगले वाटेल असे मलासुद्धा वाटलं. म्हणून आम्ही इथे आलो. तेव्हा आईच म्हणाली कि आता अनायासे इथे आलोच आहोत तर भेटून ये त्यांना आणि हेही देऊन ये. आणि मी आज आलो. मी पुढे मध्ये दुबईला जाईल, तिथली काही कामे उरकावुन पुन्हा येईल इथे कायमचाच. मग पुन्हा नवीन नोकरी शोधावी लागेल. हम्म्म... असो. बघू पुढे काय होतंय ते. तुम्ही सांगा तुमचे काय सुरु आहे. "
" माझ्याकडे तर एक मस्त गुड न्यूज आहे... "
" तो मिस्टर कॅलिफोर्निया येणार आहे का ?"
" अरेच्चा! अगदी अचूक आणि लगेच ओळखले तुम्ही तर...छान ."
"त्यात काय छान ? बऱ्यापैकी ओळखतो आम्ही तुम्हाला. तुमच्या आयुष्यात त्या एका व्यक्तीशिवाय सध्या काही नवीन गुड न्यूज असू शकेल का? म्हणून अंदाज लावला आणि तो बरोबर निघाला... मग बाईसाहेब एकदम खुशीत आहेत तर. पण कधी येतोय तो ?"- निहाल.
" पुढच्या बुधवारी रात्री येईल तो ...मग आम्ही रविवारी भेटायचे ठरवले आहे."- निर्वी.
" हम्म्म... यु एस वरून येतोय ना... मग जेट लॅग असेल ना...मग मला शनिवारी भेटाल का? म्हणजे जमत असेल तर ... मला बोलायचे आहे तुमच्याशी... खूप काही . "- निहाल.
"अरे वाह! छानच ! भेटूया की.पण कुठे ?"- निर्वी. 
" ते तुम्हीच ठरवा... मला फक्त किती वाजता आणि कुठे यायचे आहे ते कळवा. मी तिथे त्या वेळेत हजर राहीन हा माझा शब्द.  नाहीतर त्या दिवशी मी हा इथेच येईन.तसाही हा चहा आवडला आपल्याला ." - निहाल.  
निर्वी हसून होकारार्थी मानेनेच हा प्रस्ताव मान्य करते.शेजारचा दुकानदार आपले दुकान बंद करण्याचा खटाटोप करत असतो. तेव्हा दोघांनाही घड्याळातल्या पुढे सरकत जाणाऱ्या वेळेची जाणीव झाली आणि दोघे एकमेकांचा निरोप घेतात.तो निघता निघता भिजलेल्या खिशातून भिजलेल्या अवस्थेतला फोन काढतो. मघाशी आईला उशीर होणार असल्याच्या मेसेजला आलेला आईचा रिप्लाय पाहून त्याला हायसे वाटते. तो खिशात ठेवणार इतक्यात त्याला काही आठवते आणि तो पुन्हा तिथेच थांबतो. निघण्याची तयारी करत असलेल्या तिला मागे वळून हाक मारतो,
"अरे हो एक विसरलोच की. तुमचा मोबाईल नंबर द्या ना प्लीज."
" अरेच्चा ! तुम्हाला माझा नंबर मिळाला नव्हता ? थांबा हां , देते मी." - ती. 
" नाही. होता माझ्याकडे पण तो वाहून गेला."
निहाल पूर्वीच्या ओहोळाकडे पाहत पुटपुटला. पण तिला ते उमजले नाही... ती व्यस्त होती आपली छत्री सांभाळत पर्समध्ये कुठल्याशा गूढ कप्प्यात ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या छोट्या पिशवीतून आपला फोन शोधण्यात.ते करता करता तिने तिचा दहा अंकी नंबर त्याला सांगितला जो त्याने अचूक टाईप करून घेतला होता. 
"बापरे ! १७ मिस्ड कॉल्स? घरूनच आले आहेत सगळे.मला निघायला हवे आता. आपण भेटू नक्की. मी फोन करते नंतर... " 
असे म्हणत निर्वीने तिच्या घराच्या दिशेला झपाझप पाय टाकण्यास सुरुवात केली.  
 
एव्हाना पावसाचा जोर कमी झालेला होता. त्याला स्टेशनला घेऊन जाण्यासाठी उभ्या रिक्षांची तर आता रांग लागलेली होती. दोघांनीही आपापल्या दिशा निवडलेल्या असतात आणि त्या दिशेला मार्गस्थ झाले होते पण तरी दोघांचीही नजर कितीतरी वेळा आपल्या मित्राच्या पाठमोऱ्या आकृतीला भिडून जाते....अगदी त्यांच्या सावल्याही अदृश्य होईपर्यंत. 

- रुपाली ठोंबरे .

Monday, July 16, 2018

बालमैफल -४


बालमैफल -४
 माझी लोकसत्ता मध्ये आलेली चौथी कथा...बिनपावलांची जादुई चाल. 

  
वाचण्यासाठी लोकसत्ता लिंक :
बिनपावलांची जादुई चाल.


- रुपाली ठोंबरे.

Monday, July 9, 2018

साक्ष रुपेरी...

 
भाळी चंद्र पूर्ण आज सजला
कृष्णकमळ लाजून हासला

एकांती समया येथ मधुमीलना या 
उजळल्या प्रीतीच्या लक्ष समया

चांदण्यांची पालखी आता दूर गेली
चांदण्यात रात शुभ्र न्हाऊन गेली

मालवून अमावस खुलली हर दिशा
बिलगून शशिकिरणां मोहरली निशा

चंद्र पौर्णिमेचा...पौर्णिमा ती चंद्राची 
साक्ष रुपेरी ही तुझ्यामाझ्या प्रेमाची


- रुपाली ठोंबरे. 

Blogs I follow :