जेव्हा मी जन्मलो
तेव्हा पाहून स्वतःसच
नशिबावर खूप रुसलो
एक साधा सुधा मी धागा
त्यातही नाही उच्च कुळातला
त्याच क्षणी समजून चुकलो माझी जागा
एखाद्या साध्याच वस्त्रात
मी विणून पडणार आयुष्यभर
शोधत राहीन स्वतःसच मळक्या कापडांत
कधी मळणार कधी तुटणार कधी बेरंग होणार
प्रत्येक दिवशीच राहून पाण्यात मार खाणार
अल्पायुष्यातच नवे जीवन असे व्यर्थ जाणार
असे भविष्य उराशी बाळगून हिम्मतीने जगत होतो
एके दिवशी अचानक अपरीत काही स्वप्नवत घडले
आणि सुंदर रंगांत घेऊन डुबकी, रेशीमधाग्यांत मी उभा होतो
भोवताली चमकदार मण्यांची आरास सजली होती
खंबीरपणामुळे त्या रेशीमगाठीत मला वेगळाच मान होता
बघता बघता साध्या धाग्याची बनून राखी मी आज मलमलीवर सजलो होतो
एका चिमुरडीने लाडक्या दादासाठी माझी निवड केली
आणि त्याच क्षणी वाटले हा जन्म अजोड धन्यतेने सार्थकी लागला
तसूभर किंमत नसलेल्या मला आज मणभर प्रीती लाभली
आज मी त्या बहीण-भावाच्या अतूट नात्याचे प्रतीक होतो
रक्षणाचे आश्वासन देणारे विश्वासाचे पवित्र बंधन बनलो होतो
दोन निरागस मनांमधला आनंदाचा सेतू बनून जन्मलो होतो
जेव्हा मी त्या मनगटावर सजलो
तेव्हा पाहून स्वतःसच
नशिबावर खूप आनंदलो
एक साधासुधा असूनही मी धागा
रक्षाबंधनादिवशी लाभले राखीचे रूप
त्याच क्षणी जाणवली त्या दो मनी.... ध्रुवस्थळी माझी दुर्मिळ जागा
- रुपाली ठोंबरे .