त्या दिवशी सहज मैत्रिणीकडे गेले होते. तिच्या गॅलेरीतल्या छोटयाशा फुललेल्या बगिच्यातून आत डोकावणारी मोगऱ्याची एक टुम्म फुगलेली पांढरीशुभ्र कळी पाहिली आणि आतापर्यंतच्या वर्षांची कितीतरी पाने झरझर उलटत मी थेट माझ्या बालपणात शिरले.
अशीच टपोरी कळी होती ती....थोडीशी पिवळसर छटा असलेली पण शुभ्र... हिरव्यागार पानांतून उत्सुक असलेल्या आम्हां भावंडाना हळूच पाहणारी.... जरा जरी धक्का लागला कि लगेच त्या हिरव्या रानात जाऊन लपून बसणारी . अजूनही आठवते - बाबांनी वसंत ऋतूच्या प्रारंभीच नव्या घरी आणलेले ते इवलेसे पहिले रोप... छोट्या छोट्या पानांनी नटलेलं आणि त्यांत ही पांढरीशुभ्र टपोरी चंद्रकोर. मी पाचवीला असेल तेव्हा आणि भाऊ जेमतेम ५ वर्षांचा. आता ही कळी कधी फुलेल ? कधी तिचा मंद सुगंध घरभर पसरेल ? नवीन कळी कधी येणार ? एका वेळी अशा किती कळ्या येतील ? उमलणार फूल कसे दिसेल ? मग मी ते तोडू शकणार का ? पहिल्या फुलाचे काय करायचे ?.... असे एक ना हजार प्रश्न विचारून आम्ही आईबाबांना भंडावून सोडले होते. पण दोघांनाही आमच्या त्या चिमुकल्या प्रश्नांचे कौतुक वाटायचे. आई लडिवाळपणे जवळ घेत म्हणायची ,
" बाळांनो, हे रोप आता तर आपल्या घरी आले आहे. त्याला जरा विश्रांती घेऊ दया. रोज थोडे खतपाणी आणि सूर्यप्रकाशाची किरणे हवी तशी मिळाली कि मग बघा कसे ताजे होईल. आता या एवढयाशा प्लास्टिकच्या पिशवीत त्यांची मूळे आकसून अडकून गेली असतील, घरातल्या या कोंदट हवेत जीव गुदमरत असेल त्याचा... म्हणून जरा कोमेजल्यासारखे वाटतेय.उद्या सकाळीच बाहेरच्या कुंडीत आपण लावू... मग तुम्ही दोघांनी छान काळजी घ्यायची बरं का त्याची...मग पहा, एक दिवस या कळीचे कसे छानसे फूल होईल.... अगदी सुंदर आणि सुगंधी.आणि या पहिल्या पुष्पाचे काय कराल? तर आपण ते देवापुढे अर्पण करू ... पुढे कितीतरी फुले येतीलच की माझ्या छकुलीच्या केसांत माळून घेण्याकरता. "
ती रात्र तर आम्हांला झोपच लागली नाही. सारखे त्या नवीन पाहुण्यांकडे आमचे लक्ष. पानांच्या पसाऱ्यात एका देठाच्या कडेवर बसलेल्या त्या चिमुकलीचे एक आगळेच आकर्षण. पहाट झाली आणि आम्ही अगदी सकाळीच आईला त्या उद्योगाला लावले. आता आमचे ते इवलेसे रोपटे मातीत अगदी धीटपणे उभे होते... वाऱ्याच्या झुळूकीबरोबर स्वच्छंदपणे डोलणाऱ्या फांदीवरची ती कळी आनंदाचे झोके घेत होती. पहाटेच्या थंडाव्यात आणि सकाळच्या कोवळ्या उन्हात तिचे रूप आणखी मोहक वाटू लागले. कधीतरी बरसणाऱ्या रिमझिम पावसाला झेलून घेत एखादा सप्तरंगी हिरा तिच्या माथी विराजमान व्हायचा... तेव्हा ती जणू या निसर्गाची राणीच भासायची. राणी...इवली राजकुमारीच ती... आम्हा चिमुकल्यांच्या दो बालमनांवर अधिराज्य गाजवणारी. सकाळ-संध्याकाळ... अगदी भर दुपारी आणि रात्रीच्या अंधारातही आम्ही सतत तिच्या सोबत असायचो...तिला न्याहाळायचो ,तिच्यासोबत बोलायचो , तिची सर्व परीने काळजी घ्यायचो.... तीही अगदी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यायची...मनापासून हसून आणि अशाप्रकारे हसताना पडणाऱ्या प्रत्येक खळीसोबत तिच्या चेहऱ्यावरची एकेक पाकळी या सृष्टीला,आम्हाला पाहण्यासाठी बाहेर डोकावू लागली...आणि पाहता पाहता एक दिवस तीचे रूपांतर एका टपोऱ्या फुलात झाले... अगदी आईने सांगितले होते तसे... एक छानसे फूल... अगदी सुंदर आणि सुगंधी.आमचा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता.
आम्ही घाईघाईतच हव्याश्याप्रमाणे त्या फुलावर झडप घातली... नाजुकसे फुलच ते....तेही क्षणभर बावरले असेल,गोंधळले असेल आणि फांदीपासून विलग होताना, आमच्या हातांवर झेप घेताना त्याचाही तोल गेला असेल... ते निसटले, हातातून खाली पडले...ते थेट खाली वाहणाऱ्या पाण्यामध्ये. आणि आमच्या डोळ्यांसमोर ते त्या प्रवाहात वाहून चालले होते... थांबण्याचा आटोकाट प्रयत्न करत असताना त्या प्रवाहनलिकेच्या कडांना कितीदातरी आपटले जात होते... आम्हाला एकटक पाहत होते, जणू आकांत करून सांगत होते कि, तुमच्यामुळे...आज तुमच्यामुळे इतका सुंदर जन्म मिळूनही मी हा असा सांडपाण्यात तुच्छ होऊन वाहून चाललो आहे. काही क्षणांतच इतक्या दिवसांपासून ज्याची वाट इतक्या आतुरतेने पाहिली होती ते अशाप्रकारे हाती आल्यानंतर नजरेआड झाले आणि आम्ही खूप हिरमुसून गेलो.मग नेहमीप्रमाणे आईने समजूत काढली आणि आम्ही दोघे नव्या कळीची वाट पाहण्यात आमच्या दिवसाचा अख्खा वेळ घालवू लागलो.
खूप दिवस असेच गेले.पाऊसरेघा आता अधिकाधिक दाट होऊ लागल्या. दिवसेंदिवस पाऊस वाढू लागला आणि एकेक कोवळी पोपटी पालवी एखाद्या नवजात पक्ष्याला नवे पंख फुटावे तशी मऊ पिसापरी त्या फांद्यांवर जन्मू लागली. पण त्या नव्या कळीचा शोध काही केल्या लागेना आणि आमच्या जीवांची घालमेल काही संपेना. पण मग एके दिवशी अचानकच अगदी हवेहवेसे घडले. एकाच फांदीवर एक नाही तर चक्क दोन कळ्या दिमाखात आपले डोके वर काढत होत्या. ते पाहिले आणि आमच्या आनंदाला भरतीचे उधाण आले. पुन्हा एकदा आमचा तोच दिनक्रम सुरु झाला... कळीपासून ते फुलापर्यंतचा प्रवास. त्या प्रवासात एकदा पावसाच्या एका जोरदार तडाख्याने आम्ही एक कळी न उमलताच गमावली पण आम्ही हार मानली नाही... उलट दुपटीने त्या नव्या कळीची काळजी घेऊ लागलो. शेजारच्या मावशी त्यांची उमलती गुलाबाची कळी फुले तोडणाऱ्या वात्रट लोकांपासून वाचवण्यासाठी एक नाजूक पिशवी त्या भोवती बांधत. आम्ही तीच युक्ती पाऊस वाऱ्यापासून आमच्या छकुलीला वाचवण्यासाठी करत होतो. शेवटी पुन्हा एकदा तो सुंदर दिवस उजाडला जेव्हा ते सुंदर सुगंधी फूल आपले सर्व शुभ्र पंख भोवताली पसरवून आनंदात हवेसोबत डुलत होते. यावेळी मात्र आम्ही दोघे खूप शहाणे झाले होतो. तो हसणारा मोगरा त्या फांदीवरच पाहण्यात आज जन्माचे समाधान मिळत होते. नंतर आईने सांगितल्याप्रमाणे ते फूल हळूच त्या झाडापासून खुडले आणि देव्हाऱ्यातल्या उच्च स्थानी सजवले. निरंजनांच्या केशरी-पिवळसर ज्योतींमध्ये देवीच्या मुकुटात विराजमान झालेला मोगरा सोन्याच्या रंगात प्रकाशत होता. गालाशीच खुद्कन हासत मला कोटी कोटी धन्यवाद देत होता. यातून मिळणारे अनंत सुख खरेच अवर्णनीय होते.
पुढे एक-दोन ... दहा-पंधरा अशी कितीतरी फुले त्या झुडूपवजा वेलीवर एकाच क्षणी फुलून यायची. नव्या फुलाबद्दलची उत्सुकता काही अंशी कमी झाली असली तरी त्यांच्याबद्दलची आपुलकी अजून तशीच होती. वसंत ओसरला... दिवाळी आली तेव्हा रांगोळीच्या दहा रंगांमध्ये आणि दिव्यांच्या शंभर ज्योतींमध्ये शेजारीच उमललेला पांढरा मोगरा त्याच्या सुगंधाने भाव खाऊन जायचा. आणि मीही इतर सर्व रंग डावलून त्या पांढऱ्या रंगाला, त्या हव्याहव्याशा वाटणाऱ्या सुगंधाला विशेष मान द्यायचे...तो गंध... मन पवित्र करणारा... आनंद देणारा...आठवणींना सोबत आणणारा....
हवेची एक गार झुळूक गॅलरीतून सोफ्याजवळ आली... ती तोच हवाहवासा गंध घेऊन. आज किती वर्षे उलटून गेली.... यांत किती उन्हाळे-पावसाळे गेले... कितीतरी मोगरे पाहिले, हुंगले, माळले..... पण आजही मोगरा म्हटला कि आठवते ते वर्षांपूर्वी घरी अवचित आलेले इवलेसे हिरवे रोपटे आणि त्यावर नांदणारी ती शुभ्र लाजरी कळी...हवेवर डुलणारी, जलप्रवाहात समाधी होऊन दूर जाणारा जीवनातला पहिला मोगरा, देवांच्या सहवासात राहून निर्माल्य झालेला तो नशीबवान मोगरा,मोगऱ्याच्या शुभ्र फुलांच्या ताटव्यांनी डवरलेलं झाड, पुढे पानगळ होऊन निपचित पडलेलं तेच क्षुद्र झालेलं वृद्ध झाड...त्या काड्याही कितीतरी महिने त्या कुंडीत मोठ्या धिटाईने उभ्या होत्या... एका नव्या आशेवर... नव्या पोपटी पिसाच्या... कोवळ्या कळीच्या... आणि त्यातून उमलणाऱ्या शुभ्र सुगंधाच्या. पण छे ! जीवनाच्या एका वाटेवर आयुष्य संपते आणि उरतात ती फक्त हाडे... स्तब्ध उभी राहून आठवणींचे पुतळे बनलेली.
अशी कितीतरी रोपटी आणि त्यावर उमललेली मोगरे, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक वाटेवर असतात. त्यांना नात्यांच्या पवित्र बंधनात गुंफताना निर्माण होणारा आनंद मी कितीदातरी अनुभवलेला आहे. तुम्ही कधी अनुभवला आहे का ?... जर नाही तर अजूनही वेळ गेली नाही... एकदा जवळ जाऊन पहा... कदाचित रोपटे अजून हिरवेगार असेल... त्यावर अजूनही नवी पालवी फुटू शकते... प्रेमाचा गंध दरवळू शकतो... गरज आहे ती फक्त काळजीची, एका मृदू स्पर्शाची, आधाराच्या खतपाण्याची आणि आदरातुन निर्माण होणाऱ्या प्रकाशाची.

- रुपाली ठोंबरे .