ओम नमोजी आद्या ।
लय आणि ताल यांचा अप्रतिम मेळ होऊन स्वरबद्ध झालेला, कानी पडणारा सुमधूर सूर म्हणजे... गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर.लता ताई म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान... त्यांना पाहून नेहमी खात्री व्हायची कि खऱ्या अर्थाने मराठी पाऊल पडते पुढे...
या स्वरामृतांनी भरलेल्या मधुघटाने भारतातील प्रत्येक मनात गेली कित्येक दशके वसंत फुलवून अनेकांचे जीवन सुगंधित केले आहे. निश्चयाचा महामेरू असलेल्या प्रभो शिवाजीराजांच्या या आनंदवनभुवनी, लताताईंनी माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे असे म्हणत आपल्या स्वरातील हजारो गाण्यांनी सुरांचा अनोखा खेळ मांडीयेला आणि चहूकडे पसरला तो फक्त आनंदी आनंद.
इतरांप्रमाणेच आले वयात मीसुद्धा हाच आवाज ऐकता ऐकता.चाफा बोलेना चाफा चालेना... बालपणी रेडिओवर ऐकलेले पहिले वहिले गाणे असेल... आणि बालगीतांसोबतच या बालमनात भावगीतांबद्दलही रुची निर्माण झाली. त्याकाळी ऐकलेले तिन्ही सांजा सखे मिळाल्या हे गाण्यास कठीण वाटणारे पण माझे हे सर्वात आवडते गाणे.घनतमी शुक्र बघ राज्य करी, गगन सदन तेजोमय, सुन्या सुन्या या गीतांचीही तीच कहाणी.
शाळेत ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला ही कविता अभ्यासाला होती तेव्हा त्या आवाजातील आर्तपणाने मन भरून आले...तोच आवाज झेंडावंदनाच्या दिवशी जयोस्तुते जयोस्तुते गाताना राष्ट्राभिमान जागृत करत असे. वेडात मराठे वीर ऐकले कि कुठून तरी नवे बळ अंगात संचारले जाई... एक नवा आत्मविश्वास जागृत होई.
घनश्याम सुंदरा श्रीधरा हे बालपणी रोज सकाळी वाजणारे गीत...या गीतासोबत एक वेगळेच नाते होते. म्हणजे सकाळची सुरुवातच लताताईंच्या आवाजाने होई. गजानना श्री गणराया , तुज मागतो मी आता या गीतांशिवाय तर गणेशोत्सव कधी झालाच नाही. गणराज रंगी नाचतो हे गाणे आजही कधीही ऐकले तरी गणपतीचे आत्ताच घरात आगमन झाले आहे असा भास होतो. उठा उठा हो सकळीक या गीतात खरंच फक्त वाचेतून गजमुखाचे साक्षात दर्शन घडते. गणेशाप्रमाणेच विठ्ठल कळला तो याच आवाजातून. विठ्ठल तो आला आला म्हणत आजि सोनियाच्या दिनू सुंदर ते ध्यान, पंढरपूरीचा निळा साक्षात डोळ्यांसमोर उभा राहतो. संत ज्ञानेश्वरांच्या रचना आणि लताताईंचा आवाज...म्हणजे दुधात साखर. अरे अरे ज्ञानासी , रंगा येई वो येई चा तो आलाप असो वा पैल तो गे काऊ मधली ती अधीर आळवणी...कधी घनु वाजे घुणघुणा तर कधी वारा वाहे रुणुझुणु रुणुझुणु...या मधुर आवाजातील पसायदान ऐकताना मनाला एक वेगळीच शांतता जाणवते.संत तुकाराम रचित वृक्षवल्ली आम्हा सोयरी हे गाणे ऐकताना खरेच आनंदाचे डोही आनंदतरंग निर्माण होतात... इतकी या सुरांत जादू. लाजली सीता स्वयंवराला गाणे ऐकताना साक्षात ते स्वयंवर डोळ्यांसमोर उभे राहते जसे इंद्र जिमी जंभ पर ऐकताना शिवराज्याभिषेक सोहळा... आज गोकुळात रंग खेळतो हरी ऐकले कि आपोआपच पाय जागेवरच थिरकू लागतात आणि मनमोराचा पिसारा फुलू लागतो. विसरू नको श्रीरामा मला ऐकले कि अंतरीची हाक खरेच देवापर्यंत पोहोचते आहे असा विश्वास निर्माण होतो ... असा हा अमृततुल्य आवाज म्हणजे भावभोळ्या भक्तीची मधुर मुरली.
भक्तिगीतांप्रमाणेच चित्रपट गीतांतही या आवाजाची मोहिनी काही औरच . कधी निळ्या आभाळी कातरवेळी असा बेभान हा वारा वाहू लागतो, श्रावणात घन निळा बरसू लागतो आणि चिंब पावसानं रान जागं होतं तेव्हा घन ओथंबून येति या गाण्यातला तो अवखळ आवाज रसिकाला स्वरलतेच्या मंत्रमुग्ध सूररसात नखशिखांत चिंब चिंब भिजवतो. वारा गाई गाणे, प्रीतीचे तराणे ऐकताना खरंच सभोवतालच्या वेली ,फुल-पाने सारे सारे धुंद झाल्यासारखे वाटते . आज उदास उदास दूर असलेल्यालाही प्रश्न पडावा ... बदलती नभाचे रंग कसे? आणि वाटू लागते चित्र तुझे हे सजीव होऊन येईल भेटीला ... लागले पंख प्रीतीला. शाळेत एकदा स्पर्धेत मी प्रेमस्वरूप आई हे गाणे गायचे ठरवले... वर वर सोपे वाटणारे हे गीत फार कठीण... पण त्या गीतातून खूप काही शिकले. एखाद्या मुलीच्या जीवनातील तर प्रत्येक प्रसंगावर ताईंनी गाणी गायली आहेत. मेंदीच्या पानावर हे आणखी एक माझे प्रिय गीत. हे गाणे, हा आवाज कितीदाही ऐकलं तरी पुन्हा एकदा प्ले चे बटण दाबलेच जाते.जन पळभर म्हणतील हाय हाय पण तरी नाही कशी म्हणू तूला म्हणत एखाद्या प्रेयसीची व्यथा अचूक मांडली आहे. हसले गं बाई हसले या गाण्यातील नवतरुणीची प्रेमाची सुरुवात....लेक लाडकी या घरची, नववधू प्रिया मी बावरते, घेऊ कसा उखाणा मधली नववधूची उत्सुकता... गंगा जमुना मधील पाठवणीची वेळ ... जय देवी मंडळागौर म्हणत फेर घेणारी, सप्तपदी मी रोज चालते म्हणत संसार चालवताना जीवनात ही घडी अशीच राहू दे अशी इच्छा सदैव जोपासणारी ती आणि तिची कहाणी .... लटपट लटपट या गाण्यातील ठेके असो वा वादळवारं सुटलं गो, माज्या सारंगा , माळ्याच्या मळ्यामंदी या गाण्यांतील तिची लगबग... अशी सारीच नाती, भावना या आवाजाने खूप छान सांभाळून घेतल्या. लतादीदींनी गायलेली अंगाई गीते सुद्धा किती गोड. नीज माझ्या नंदलाला,निजल्या तान्ह्यावरी माऊली , बाळा होऊ कशी उतराई, झुलतो बाई रास-झुला... घरात हसरे तारे असता मी पाहू कशाला नभाकडे. अशा या प्रसंग , भावना , वय जरी वेगळे तरी आवाज एकच ...तो म्हणजे लता ताईंचाच.
चांद केवड्याची रात खूप वर्षांपूर्वी ऐकले होते आणि तेव्हापासून ते ओठांवर अगदी सहज विराजमान झाले. चांद मातला मातला हे अशाच अजरामर गीतांपैकी एक.माजे राणी माजे मोगा ,तो एक राजपुत्र ,धुंद मधुमती रात रे रात रे, बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती गं , शोधू मी कुठे कशी, या चिमण्यांनो परत फिरा रे, मी रात टाकली, संधीकाली या अशा,मी डोलकर, मजा लावताय डावा डोळा, भेटीलागी जीवा,अवचित परिमळू , ऐरणीच्या देवा ,मावळत्या दिनकरा ,भय इथले संपत नाही अशी एक ना हजार गीते... लता या दोन अक्षरांच्या नाजूक वेलीवर बहरलेली अजरामर अशी स्वरसुमने.
देवाची इच्छा...आता विसाव्याचे क्षण आले... आणि डोळे पाण्याने भरले
पण ही कोकीळ कुहूकुहू अनंत काळ गात राहील आणि आपणां सर्वांच्या आयुष्यात मोगरा असाच फुलत राहील.
तरी पुन्हा एकदा विचारावेसे वाटते, "हे स्वरलता... येशील कधी परतून ?"
पण शेवटी जो आवडतो सर्वांना , तोचि आवडे देवाला हे सत्य आपणही समजून घ्यायला हवे. आणि म्हणूनच,
अखेरचा हा तुला दंडवत !!!
- रुपाली ठोंबरे