Monday, February 27, 2017

विकिपीडिया मुक्त ज्ञानकोश

आज २७ फेब्रुवारी... कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस... आणि मराठी भाषा गौरवदिन !!!

समस्त वाचक मंडळींना आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ... !!!


आजच्या दिवशी  वाचकांसाठी काहीतरी खास लिहिले पाहिजे या हेतूने मी एखादा नवा विषय शोधात आज सकाळीच या इंटरनेटच्या महाजालात प्रवेश केला. बरीच पाने उघड-बंद करता करता मी एका नव्या आणि विशेष पानावर पोहोचले....https://mr.wikipedia.org/



सुरुवातीला हा प्रकार फारसा कळत नव्हता पण काहीतरी खूप मोठी संधी आहे हे मात्र जाणवत होते. जरा वेळ काढून नीट वाचुन पहिले तर हे  विकिपीडियाचेच पण होते पण शुद्ध मराठी भाषेत. इंटरनेटवर इतके सारे मराठी एकाच वेळेस सहसा पाहायला मिळत नाही म्हणून आधी अचंबितच होते. "विकिपीडिया मुक्त ज्ञानकोश "... किती सुंदर कल्पना. मराठी भाषेच्या उन्नतीचा एक खूप मोठा मार्ग, अगदी कोणीही मराठी लेखक त्यावर चालून पुढे मराठी भाषा विकासासाठी हातभार लावू शकतो असा. आजच्या दिवशी महाराष्ट्र शासन आणि मराठी विकिपीडिया संयुक्तिकपणे, महाजालावरील मराठी भाषेतील माहिती वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने "एक परिच्छेद मराठी विकिपीडियावर " हा उपक्रम आयोजित केला आहे.नमूद केलेल्या कोणत्याही एका किंवा अनेक विषयांवर मराठी विकिपीडियावर किमान एक परिच्छेद माहिती लिहून ह्यात सहभागी होऊ शकता. 

विषय कोणता ? काय लिहायचे ? कसे ? या सर्वांची अगदी अचूक उत्तरे अगदी सहज तिथे उपलब्ध होती. थोडा वेळ दिला आणि मीही या सुंदर उपक्रमात आज सहभागी झाले. आपले लेख विकिपीडियाच्या पानांवर झळकताना पाहून वेगळेच समाधान अनुभवले मी. 

मला वाटते कि "मराठी दिन" साजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि मराठी विकिपीडियाने सर्व मराठीभाषिक प्रेमींसाठी एक नामी संधी उपलब्ध करून दिली आहे. मग चला तर, या संधीचा लाभ घेत, मराठी भाषेला जगाच्या कोपऱ्याकोपऱ्यापर्यंत वृद्धिंगत करण्यासाठी या उपक्रमात सहभागी होऊया...आपल्या लाडक्या मराठी भाषेत काहीतरी लिहूया या जगाच्या पाठीवर. 

- रुपाली ठोंबरे.  

Friday, February 24, 2017

शिव...सर्वव्यापी शून्य

चांद्रमासातील प्रत्येक चौदावा दिवस हा शिवरात्री म्हणून ओळखला जातो. वर्षभरातील १२ शिवरात्रींपैकी माघ कृष्ण चतुर्दशीला येणारी शिवरात्र ही  'महाशिवरात्री' म्हणून ओळखली जाते. तिला विशेष धार्मिक महत्त्व आहे. आजच्या दिवशी पृथ्वीचा उत्तर गोलार्ध अशा स्थिरी येतो जिथे मानवातील नैसर्गिक शक्तीची उन्नती होते. आज निसर्ग माणसाला त्याच्या अध्यात्मिक परमोच्च स्थानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आजची रात्र जागरण करून साजरी करण्याची प्रथा सुरु झाली. अशाप्रकारे अध्यात्माच्या मार्गावर असलेल्यांसाठी महाशिवरात्री विशेष महत्त्वाची असते. गृहस्थाश्रमात असलेल्यांसाठी आजचा दिवस म्हणजे शिव-पार्वतीचा विवाहदिन... आणि तो साजरा करण्याच्या हेतूने हा दिवस त्यांच्याही जीवनात महत्त्वाचे स्थान निर्माण करतो. महत्त्वाकांक्षी लोकांसाठी आजचा दिवस दिवस म्हणजे जेव्हा शिवाने सर्व शत्रुंना पराजित करून विजय मिळवला. पण योगी लोकांच्या मते आजच्या दिवशी शिव कैलास पर्वताशी एकरूप झाले तो हा शुभ दिवस. योगी शंकराला  देव नाही तर आदिगुरू मानतात जिथून सर्व ज्ञानाची निर्मिती झाली. त्यांच्यामते अखंड ध्यानानंतर शिवाला स्थिररूप प्राप्त झाले म्हणून आजची रात्र ते स्थिरतेचे प्रतीक म्हणून साजरी करतात.

शिवरात्र ही महिन्यातील सर्वात अंधकारीत रात्र असते.शिवरात्र आणि महाशिवरात्र साजरी करणे म्हणजे अंधःकार साजरा करणेच असे आज वाचनात आले . ते कसे?  हा प्रश्न उद्भवलाच असेल... माझ्याही मनात प्रथम या प्रश्नाने घर केले होते पण पुढे त्याचेच उत्तर समोर वाचनात आले आणि काही अंशी पटले देखील, म्हणून तेच स्वतःच्या शब्दांत मांडण्याचा प्रयत्न मी या पोस्टमध्ये करत आहे. 

खरे पाहिले तर कोणतेही सतर्क मन अंधाराला नाकारून प्रकाशाचाच स्वीकार करेल. पण शिव या शब्दाचा वस्तुतः अर्थ आहे - "जो नाही तो "."जो आहे तो " म्हणजे ज्याला उत्पत्ती आणि अस्तित्व आहे तो पण " जो नाही तो " म्हणजे "शिव". जेव्हा आपण आपले डोळे उघडून चहूकडे पाहतो तेव्हा जर आपली लघुदृष्टी असेल तर जे अस्तित्त्वात आहे तेच सर्व आणि अशाच पुष्कळ गोष्टी दिसतील परंतू जर दूरदृष्टी असेल तर या सर्वाना सामावून घेणारी अखंड रिक्तता(खालीपण) दिसेल जे खरोखर अस्तित्त्वात आहे पण आम्हा सामान्यांच्या नजरेस पडत नाही. हि भव्यता, हि रिकामी, रिक्तीस्थान म्हणजेच शिव. आज विज्ञानाने देखील हे सिद्ध केले आहे कि जगातील प्रत्येक गोष्ट शून्यातून जन्म घेते आणि शेवटी शून्यातच लय पावते. हा शून्य म्हणजेच देवांचा देव - महादेव .

पृथ्वीवरील सर्व धर्म निसर्गातील सर्वव्यापक अशा दैवीशक्तीला परमेश्वर मानतात. जर अशाप्रकारे विचार केला तर सर्वव्यापक असे नैसर्गिक अस्तित्व फक्त आणि फक्त अंधाराचे, शून्याचे आहे हे आढळून येईल. जेव्हा मनुष्य शुभ शोधू लागतो तो प्रकाशालाच पवित्र मानतो. पण प्रकाश हा मनातला संक्षिप्त संयोग आहे...तो शाश्वत, चिरकालीक नाही. तो केवळ सीमाबद्ध संभव आहे कारण त्याचे अस्तित्व निर्माण होते आणि कालार्धाने संपतेसुद्धा . या जगातील प्रकाशाचा सर्वात मोठा स्रोत असलेल्या सूर्याचा प्रकाशसुद्धा आपण एका हाताने थांबवून त्या जागी सावलीरूपी अंधाराचे अस्तित्व निर्माण करू शकतो.

परंतू  अंधाराने मात्र सर्वत्र घेरलेले आहे. या जगातील अविकसित बुद्धीनी नेहमी अंधाराचे वर्णन असूर, दुष्ट असेच केले आहे. पण जेव्हा आपण दैवीशक्ती म्हणजे सर्वव्यापक अशी संज्ञा निर्माण करतो तेव्हा सर्वव्यापी अंधार हीच दैवीशक्ती हे सिद्ध होते. अंधाराला कोणाच्याही आधाराची गरज नाही. प्रकाश हा नेहमी अशा स्रोतापासून उत्पन्न होतो जो स्वतः जळत असतो.त्याला सुरुवात आहे आणि शेवटही. तो एका संकुचित स्रोतापासून सुरु होतो. पण काळोखाचे मात्र तसे नाही. त्याला कोणत्याही स्रोताची गरज नाही. तो स्वतःच स्वतःचा आदि आहे. तो सर्वव्यापक शिव आहे ज्यामध्ये ही सृष्टी, ग्रह, तारे , आकाशगंगा सारे सारे सामावले आहे.

भारतीय संस्कृतीतील बऱ्याच प्राचीन प्रार्थना अशा होत्या कि ज्यात परमेश्वरामध्ये विलीन होण्यासाठी स्वतःच्या शरीरनाशाची इच्छा होती. म्हणूनच महाशिरात्रीचा उल्लेख करताना असे निश्चित समजावे कि हा एक सुसंयोग आहे जिथे मर्यादा संपवून या निर्मितीच्या अखंड शून्याला अनुभवण्याचा मार्ग आहे.

एका प्रकारे पाहिले तर शिव हा विध्वंसक आहे पण तोच शिव भोळा आणि करुणामयी देखील आहे. तो सर्वांत मोठा दाता आहे. अतिशय कृपाळू आहे. म्हणूनच महाशिवरात्री हि ग्रहण करण्याची रात्र आहे जिथे भक्तांना जे हवे ते आदान मिळण्याची शक्यता अधिक असते. तेव्हा महाशिवरात्री हि केवळ जागरणाची नाही तर या विश्वातील सर्वव्यापी शून्याला अनुभवण्याची आणि त्यासोबतच स्वतःला नव्याने जागृत करून घेण्याची रात्र आहे.


- रुपाली ठोंबरे.


संदर्भ : http://isha.sadhguru.org

Tuesday, February 14, 2017

प्रेम

असे म्हणतात लोक 
कि प्रेमाला ना कोणता रंग ना कोणताही आकार 
ते तर वाहत जाते आणि वाहवत नेते 
एखाद्या थंड हवेच्या झुळुकेप्रमाणे 
पण फक्त एकमेकांच्या दिशेने 
तिथे ना जगाचे भान ना कुणाची पर्वा 



पण तरी कधीकधी वाटते 
प्रेम बदामी आकाराचे का ?
कारण दोघांच्यात बदाम आला 
कि प्रेमाची खरी कुजबुज सुरु होते
जेव्हा कागदावर एखादाही बदाम येतो 
तेव्हा कसे बरे साधे पत्रही प्रेमपत्र बनते ?
बदामांच्या पावसात का बरे 
भावनांना अचानक प्रीतीचा पूर येतो ?
आणि तिच्या बदामी नजर कटाक्षातुन 
निघणारा तीर दो हृदयांना अचूक जोडतो


मग कधी कधी वाटते 
प्रेम गुलाबी रंगाचे का ?
प्रीतीचे वारे वाहू लागले कि 
सभोवताल कसा गुलाबी वाटू लागतो ?
प्रेमाच्या सोबत असताना 
साधी पहाटही कशी बरे गुलाबी थंडीची बनते ?
गालावर गुलाबलाली उधळली 
कि कसा बरे प्रेमाचा रंग दाट होत जातो ?
लाखो गुलाबकळ्यांनी उमलावे तसे 
अत्तर उधळत गुलाबी रंग लहरत जातो 

पण मग कधीकधी वाटते 
प्रेम एखाद्या जादूगारासारखे 
क्षणाक्षणाला रूप बदलणारे 
प्रेम मिळाले कि सर्वच गुलाबी वाटते 
प्रेम हरवले कि तेच सर्व धूसर पांढरे 
चूक घडली तर त्यावर काळा ठसा उमटतो 
आणि सूडामध्ये तेच प्रेम लाल रक्ताने माखते 
नभनिळाई आणि वनहिरवळीमध्ये 
मनाच्या कोपऱ्यात स्फुरणाऱ्या आठवणींमध्ये 
प्रेम मोरपिसापरी अलगद मोरपिशी भासते 

खरेच प्रेम म्हणजे इंद्रधनूची सप्तरंगी कमान 
ऊनपावसाच्या लपंडावात डाव आपला मांडणारे 
आनंदाच्या पावसात प्रणयमोती बरसणारे 
तुम्हा-आम्हा सामान्यांना अमृतानुभूती देणारे
स्वर्गाच्या राज्यात, स्वप्नांच्या नगरीत नेणारे 
फक्त दोघांचे असे एक गोड गुपित 
जिथे ना जगाचे भान ना कुणाची पर्वा


- रुपाली  ठोंबरे. 

Wednesday, February 8, 2017

एक ध्येय पण मार्ग हजार

दुपारची वेळ. सहज म्हणून घराबाहेरच्या ओट्यावर उभे राहून आसपासची गंमत पाहत होते. उन्हाळ्यातली भर दुपार...फारसे कोणी बाहेर दिसत नव्हतं. दूर रस्त्यावरून एखादी पुसट आकृती चालताना दिसे. हिंदी-मराठी विविध मालिकांची मधूनच ऐकू येणारी शीर्षकगीते,कित्येकदा घोळका करून गप्पाटप्पा मारणाऱ्या गृहिणी यावेळेस घरात का बंदिस्त झाल्या आहेत याची वार्ता देत होते. त्या पिवळ्याधम्म कडक उन्हात वाळत ठेवलेले पापड मध्येच येणाऱ्या गरम वाऱ्याच्या झुळुकीबरोबर फडफडत होते. असे सर्व चित्र आजूबाजूला असताना माझे विशेष लक्ष वेधले ते आमच्या शेजारच्या रोहितने. बराच वेळ मला दुरून  नक्की उमगलेच नाही कि हा नक्की काय करतो आहे . त्यामुळे मीच थोडे जवळ जाऊन पाहिले तर याचा एक नवा खोडकरपणा सुरु होता... एका मुक्या प्राण्याला उगीचच त्रास देण्याचा.

रोहितच्या आईने मोठ्या परातीमध्ये रवा उन्हात ठेवला होता. त्यात चुकून भेसळ होऊन मिसळल्या गेलेल्या साखरेसाठी एक मुंगी सारखी तिथे ये-जा करत होती.प्रत्येक वेळी ती यायची , परातीची ती उंच भिंत पार करून त्या रव्याच्या राज्यात शिरायची आणि तेथे असलेला साखरेचा शुभ्र चमकदार घनाकार इवल्याशा डोक्यावर घेऊन पुन्हा ती भिंत पार करून तिच्या घरी जायची. असा तिचा कार्यक्रम बराच वेळ सुरु होता. आणि या तिच्या सुरळीत सुरु असलेल्या कार्यक्रमात विघ्न आणण्याचे काम हा ४ वर्षांचा रोहित करत होता. तिच्या रस्त्यात मध्येच बोट ठेवून काही अडथळा निर्माण करी. पण मुंगी सुद्धा काही कमी नव्हती. परातीची ३ इंचाची भिंत ओलांडणारी ती त्या इंचभर बोटाची उंची अगदी सहज पार करून जाई. कधीकधी कडकडून चावा घेऊन क्षणभरासाठी तरी स्वतःचा मार्ग मोकळा करून घेई. मग तो चिमुरडा सुद्धा चिडे... धावत जाऊन कुठून तरी पाणी आणले आणि दिले ओतून त्या रस्त्यात. बिच्चारी मुंगी...फारसे पोहता येत नाही पण लक्ष्य मात्र मिळवायचेच. त्या पाण्याच्या ओघळातून निर्माण झालेल्या तळ्याभोवती काठाकाठाने चांगल्या २ फेऱ्या मारल्या तिने. थोडा वेळ तशीच थांबली. खूप वेळ झाला तसे एका बाजूला पाण्याचा प्रभाव कमी जाणवला किंवा उन्हात त्यातले थोडे पाणी उडून गेले आणि मुंगीला तिचा टीचभर मार्ग मिळाला. लगेच ती त्या चक्रव्यूहातून आत शिरली. या पठ्ठयाने पुढे परातीच्या पायाशी मोठा ओबडधोबड दगड आणून ठेवला. पण मुंगीने न हरता , न वैतागता तोही कसाबसा पार केला आणि शेवटी आपल्या लक्ष्यापाशी येऊन थांबली. असे बराच वेळ चालले. शेवटी रोहितच कंटाळला आणि तो पुन्हा त्या मुंगीच्या वाटेला गेला नाही. आधी परिश्रम घेतले, एक निश्चय मनाशी बांधला आणि त्या निश्चयाशी कायम राहून कितीही अडथळे आले तरी सातत्याने प्रयत्न करत राहण्याची मुंगीची जिद्द शेवटी तिच्या कामी आली. आता सर्वच खूप सुकर झाले होते. हे करताना ध्येय जरी एकच असले तरी ते पूर्ण करण्यासाठी अवलंबलेले मार्ग मात्र सर्व प्रकारे वापरले होते. त्यासाठी अजिबात कंटाळा नव्हता. 

ही छोटीशी घटना किती काही शिकवून जाते. आयुष्यात निश्चय अगदी ठाम असावा. तो डगमगणारा नक्कीच नसावा. पण तो पूर्ण करण्यासाठी स्वीकारलेल्या मार्गावर जरी अडथळे आले तरी वैतागून न जाता नवा मार्ग शोधून त्यावर चालत राहून ध्येय गाठावे.

थोडक्यात काय तर, निश्चयावर ठाम असावे मात्र त्याला पूर्णत्वाला नेण्यासाठी स्वीकारलेला मार्ग मात्र नेहमी परिवर्तनशील असावा. 

- रुपाली ठोंबरे.

Blogs I follow :