( लहानपणच्या खेळातली भातुकली आपण सर्वानीच अनुभवलेली असते . पण लहानपणी खेळ रंगत असताना आपला सवंगडी अचानक कुठे गेला तर जीव कासावीस होतो …खेळातही मन करमेनासे होते… आणि मग त्या मित्राची आठवण काढत दिवस जातात ……असेच कधीकधी आयुष्याच्या खेळातही होते…. हो ना ?)
ये रे गड्या , आता नको खाऊ जास्त भाव
का गेलास असा सोडून अर्ध्यावर भातुकलीचा डाव
नव्या कल्पना,नवी खेळणी घर नवे होते आपण थाटले
होते सारे कसे छान छान, मग मध्येच काय हे तुला सुचले
तुझ्याविना आता करमतच नाही,हिरमुसते मी तुझी कळी
तू नाहीस खेळात तर सारे हरल्यासारखेच वाटते मुळी
आता कुठे आणली होती आपण नवीन कोरी बाहुली
तिच्या संगे खेळायचे सोडून का गेलास असा दुरवरी
आठवते का तुला,जरा काही झाले मला कि ओरडायचा तू सुमीला
आता कशी मी सांभाळते सर्व कळतंय तरी का हे तुला
देईन मी तुला हवा तो खाऊ ,नाही तुझ्याशी कधीच भांडणार
येशील ना रे तू परत जर म्हटले,"तू म्हणशील तसेच मी वागणार"
आता खूप झाले,सांग त्यांना तू आहेस जिथे
"रडतात माझे सखे सोबती जावू द्या मला घराकडे "
आणि हो म्हणाले कि जराही वेळ न दवडता अस्सा पळत ये तिथून
मी अजूनही तस्साच ठेवलाय बघ डाव जसा गेला होतास तू मांडून
आणि नाही म्हणाले तर … आणखी काय मी आता सांगू?
मीच आनंदाने पूर्ण करेन हा डाव.....पण तू नको तिथे रडू.
- रुपाली ठोंबरे
Heart touching :)
ReplyDeleteVery touching Rupali.....Awsome...
ReplyDeleteRupali tu kharech try to publish your own book. Khoop sundar ani realistic kavita ahet tujhya.... it shows pain hidden inside you... heart touching
ReplyDelete