Monday, August 10, 2015

ओळख आपल्यातल्या दोन 'मी' ची

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो !…

संदीप खरेंचे हे गाणे तुम्ही ऐकले असणारच . संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी हे हल्ली महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले नाव. ते त्यांच्या गाण्यांच्या सुरेख मैफिलीमुळे - " आयुष्यावर बोलू काही ".ती नुसती मैफिलच नाही तर मनसोक्त जीवनाचा आनंद बहाल करणारी तहानलेल्या रसिकांना एका वाटेवर भेटलेली एक पाणपोईच !

खरेच आयुष्यावर बोलता बोलता हे दोघे थेट रसिकांच्या हृदयाला भिडतात. अगदी रोजचेच ,आपले असे वाटणारे आपल्या नकळत  समजून घेतात आणि आपल्या कानी बहाल करतात तो एक अमुल्य नजराणा….अर्थपूर्ण पण अगदी साध्या सोप्या शब्दांत गुंफलेल्या कवितांचा आणि तितकीच सहज सोपी चाल . अबालवृद्धांपासून सर्वांनाच सहज गुणगुणता येईल असेच काहीतरी खास. म्हणूनच त्यांच्या हजाराव्या प्रयोगालाही लहान चिमुरडीपासून ते ८० वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्वांचीच खच्चून उपस्थिती जाणवली.

यांची प्रत्येक कविताच मनात खोलवर रुजते. माझे म्हणाल तर माझा दिवस सुरु होतो तो या कवितांनी आणि संपतो तोही यांच्याच सानिध्यात. पण त्यातली ही कविता अधिक प्रिय आहे मला . हे गाणे कितीदा तरी ऐकले असेल तुम्ही पण कधी आतला अर्थ जाणून मर्म ओळखण्याचा प्रयत्न केला ?

आपण स्वतःबद्दल 'मी' हे संबोधन अगदी सहज वापरतो . पण कधी या 'मी'ला ओळखले? खरेतर कवीने या कवितेत सांगितल्याप्रमाणे आपल्या प्रत्येकातच दोन 'मी' असतात . एक नेहमी रडणारा ,कोणत्याही परिस्थितीतील वाईट बाजू अगदी अचूक ओळखणारा आणि मग अशा 'मी' ला सतत चिंता भेडसावत असते . एखादी अनामिक भीती कायम पाठराखीण म्हणून सोबतीला उभी असते . याउलट आपल्यात असाही एक 'मी' असतो जो सुख असो व दुःख कायम आनंदात, जणू दुःख ,वेदना ,काळजी या सर्वांशी त्याचे दूरदूरपर्यंत नातेच नाही. एक 'मी ' नेहमी क्षुद्र विचारांच्या काळोखात बंदिस्त झालेला तर दुसरा स्वच्छंदी मनाने मोकळ्या हवेत तरंगणारा. एक जिंकता-जिंकताही रडत राहतो तर दुसरा हरुनही आनंदात असतो . एक, सतत या न त्या मागण्या ,इच्छानी नवसांची बोली लावत सतावणारा तर दुसरा -

तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्‍या
अन्‌ 'धन्यवाद' देवाचे घेऊन जातो !!

या पंक्तीप्रमाणे देवाचेच धन्यवाद मिळवणारा.खरेच आपल्या एका बदलेल्या दृष्टीकोनातून देवाकडूनच आपले आभार प्रकट होत असेल तर त्या सारखा आनंद हजार सुखांतही मिळणार नाही .
आणि अशा सकारात्मक दृष्टीकोनातून जीवनवृक्षावर कधी नव्या संधींचे फाटे फुटतील आणि कधी ते आनंदाच्या फुलोऱ्याने बहरून जाईल हे आपले आपल्यालाच कळणार नाही. मग सुखाची टवटवीत फळे आपण होऊन झोळीत येवून म्हणतील " उपभोग आता हवे तेवढे ".

अशाप्रकारे आपल्यातला एक 'मी'च आपल्याला हवे ते आपल्या नकळतच मिळवून देईल. फक्त तो 'मी' सकारात्मक हवा कि नकारात्मक हे ज्याचे त्यानेच ठरवावे लागेल.

मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार
लपतो न परि चेहरा आत भेसूर !
तो फक्त ओढतो शाल नभाची तरीही
त्या श्यामनिळ्याच्या मोरपीसापरी दिसतो !!!


***




1 comment:

  1. Sandeep khare ani salil kulkarni songs nahi te bhavana lihitat...

    ReplyDelete

Blogs I follow :