Monday, March 12, 2018

प्रदर्शन...नात्यांची एक वीण

"प्रदर्शन... नव्या जुन्या नात्यांना जोडणारा एक दुवा "

का कुणास ठाऊक पण काल आमच्या ४ दिवसांपासून सुरु असलेल्या प्रदर्शनाची सांगता झाली... आतापर्यंत  गॅलरीत दिमाखात  उभी असलेली सर्व चित्रे कागदांमध्ये व्यवस्थितरीत्या बंद झाली...गाडीच्या चक्रांसोबत त्यांनी घराच्या दिशेला धाव घेतली... आणि त्याच गतीसोबत माझ्या मनात तरंगत अलवार नकळत हा असा विचार आला. 


खरेच एखादया प्रदर्शनातून त्याचा निरोप घेताना लक्षात येते कि या काही दिवसांत किती काही आपण आपल्या सोबत घेऊन जात आहोत. आपली चिकाटी, मेहनत ,कला या सर्वांचे प्रतिबिंब असलेली चित्रे पाहायला जेव्हा आपलेच नातेवाईक , घरचे मंडळी , मित्रमैत्रिणी अगदी आवर्जून चित्रप्रदर्शनाला भेट देतात... आपल्या कलाकृतींना अगदी भरभरून प्रतिसाद देतात ... कौतुकाच्या शब्दांनी पाठ थोपटतात तेव्हा त्यांच्याबद्दलचे प्रेम आणि आदर नव्याने जागृत होतो आणि त्याच क्षणी जुन्या नात्यांना एक नवा बहर येतो... हो कि नाही ? 

आदिशक्ती-अक्षरशक्तीच्या या प्रदर्शनातून आलेले माझे अनुभव तरी हेच सांगतात. आम्ही सर्व जणी एकाच अक्षरशाळेच्या विद्यार्थिनी तरी आमच्या बॅचेस वेगवेगळ्या... पण प्रदर्शनासाठी काम करताना हे कधी जाणवलेच नाही. अर्थातच या सर्वांना एकत्र बांधून ठेवणारा अच्युत पालव हा एक अत्यंत महत्त्वाचा अनमोल धागा... ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व अक्षरमाळा अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत एकत्र राहतात ... आणि महत्त्वाचे म्हणजे कोणताही भावनिक गुंता न होता. असे म्हणतात जिथे २ स्त्रिया एकत्र आल्या तिथे भांडणे उद्भवतात पण आम्ही १७ जणी असो वा २० जणी कलह ,ईर्ष्या अशा व्यर्थ भावनांना मात्र आमच्या ठायी  कधीही जागा नव्हती. याउलट सर्व जणी एकमेकांसोबत राहून , एकमेकींना सहकार्य करत एकीने  राहिल्या.  एकीला काही कारणांमुळे वेळ नाही तरी दुसरी लगेच तिच्या कलाकृतींची जबाबदारी घेण्यास पुढे होते. उद्या त्याच दुसरीच्या कामासाठी ती पहिली अगदी न सांगता तयार होते. हे असे दृश्य आजच्या स्वार्थी जगात पाहायला आणि अनुभवायला मिळणे हे  भाग्यच. याचे एक उदाहरण घ्यायचे झाले तर प्रेक्षकांना माहिती सांगताना दीपाच्या एका योजनेवर सर्वानी एकत्र अंमल केला आणि प्रदर्शनाला एक वेगळेच शिस्तीचे स्वरूप प्राप्त झाले. अगदी जेवताना सुद्धा हा एकोपा दिसून आला. एकीच्या डब्यातला एखादा पदार्थ अशा प्रकारे ना कळता सर्वांमध्ये वाटला जातो कि त्या क्षणी न राहवून दिवस आठवतात ते शाळेचे... त्या निरागस मैत्रीचे. सर्वांचे खूप खूप आभार पुन्हा त्या जुन्या कुठेतरी हरवलेल्या मैत्रीच्या निःस्वार्थ नात्याला आपल्या सर्वांत आणण्यासाठी. 

पहिल्या दिवशी मी हजर नसतानाही माझ्या कलाकृती कलादालनात उभ्या राहिल्या हे आमच्यातील समजूतदारीचे एक उत्तम उदाहरण.वाशी येथील कलादालनात जेव्हा प्रत्येकीने आपल्या कलाकृती पाहिल्या तेव्हा इतक्या महिन्यांच्या कष्टाचे सार्थक झाल्याचे भाव प्रत्येकीच्याच चेहऱ्यावर उमटले. आज जिथे फक्त पैसा पैसा सुरु असतो तिथे काहीही न घेता आमच्या सारख्या नवोदित कलाकारांना इतका मोठा व्यासपीठ तयार करून देणे, योग्य मार्गदर्शन करून प्रत्येक नाव यशाच्या किनाऱ्याशी घेऊन नेणे हे फक्त आमचे अच्युत सरच करू शकतात आणि त्यासाठी त्यांचे कितीही आभार मानले तरी कमीच. अवधूत , स्मिता , प्रतिमा, सरांच्या ऑफिसचा स्टाफ असे सर्वजण , ज्यांची स्वतःची चित्रे नाहीत तरीही या प्रदर्शनाच्या प्रत्येक लहानमोठ्या कामाला हातभार लावण्यात ते यत्किंचीतही कमी पडले नाहीत. आणि हे सर्व एखाद्या दबावाखाली नाही तर प्रत्येकजण प्रेम आणि आपले कर्तव्य समजूनच करत होते, जसे आमच्या एका मैत्रिणीने कालच म्हटले - ' हे सर्वजण अगदी घरचं लग्न असल्यासारखे राबत असतात'. आणि या प्रत्येक लहानमोठ्या प्रसंगांतून एक कृतज्ञतेचा नाजूक बंध जुळला जातो आणि नात्याची एक न उसवणारी घट्ट वीण हळूहळू आकार घेत जाते. 

या प्रदर्शनातील चित्रांच्या निर्माणामागे जर एखादी अदृश्य शक्ती असेल तर ती म्हणजे आपापल्या कुटुंबाचा पाठिंबा. त्याशिवाय हे सर्व इतक्या कमी वेळेत निर्माण होणे केवळ अशक्यच. यात सहभागी असलेल्या साऱ्या जणी कुठेतरी एक वेगळी भूमिका पार पाडत असतात आणि त्यातून वेळ काढून या अक्षरशक्तीला पुजण्यासाठी त्यांना प्रवूत्त करणारे जर कोणी असतील तर ते तिच्या घरातील सदस्य, तिचे कार्यसहकारी ज्यांनी वेळप्रसंगी तिच्या या नव्या वाटचालीसाठी स्वतःच्या वेळा आणि कामाला वाढवले आणि तेही विनातक्रार. जिथे आज सासू-सुनेचे नाते उगाचच मलिन झाले आहे तिथे या प्रदर्शनात मात्र एक वेगळेच चित्र दिसून येते. जसे आई-वडील तसेच सासू-सासरे देखील अगदी जोडीने आपल्या सुनेच्या प्रदर्शनाला आवर्जून हजेरी देतात... तोंड भरून कौतुक करतात... प्रोत्साहित करतात... त्याप्रसंगी त्यांच्या सुनेबद्दल वाटणारा अभिमान त्यांच्या सुरकुत्या चेहऱ्यांवर झळाळत असतो... आणि या नात्याची एक मायेची झलक दृष्टीक्षेपात येते. चिमुरडी मुले कुतूहलाने आपल्या आईच्या चित्रांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. या प्रदर्शनाच्या तयारीसाठी त्या मुलांची अप्रत्यक्षरीत्या झालेली मदत ही केवळ ती एक आईच सांगू शकेल. शेवटच्या दिवशी आपल्या पत्नीने केलेले अप्रतिम काम काढून व्यवस्थितरीत्या घरपोच आणण्याची जबाबदारी आता केवळ माझ्यावरच आहे या अविर्भावात आलेले सर्व पतीदेव पाहून मनात विचार आला कि कोण म्हणतं एका यशस्वी पुरुषाच्या पाठी एक खंबीर स्त्रीच असते...ही जगप्रसिद्ध उक्ती येथे उलट्या दिशेने वाहताना दिसेल. कारण येथील प्रत्येक स्त्री कलाकाराच्या यशाच्या पाठी तिला पाठिंबा देणारा तिचा प्रेमळ नवरा आहे. तिच्याबद्दल वाटणारा अभिमान , तिच्या कामात तिला वेळप्रसंगी लागणारी मदत, तिला योग्य मार्गदर्शन , वेळोवेळी दिले जाणारे प्रोत्साहन या सर्वांमुळे ती स्त्री पूर्णार्थाने अधिक सुंदर होत जाते.

जाहिरात वाचून आलेले , मित्रांचे मित्र , आप्तस्वकीय असे कितीतरी ओळखी-अनोळखी चेहरे कितीतरी वर्षांनी समोर येतात ते या प्रदर्शनामुळे. उदघाटनप्रसंगी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देणारे मान्यवरांचे बोल कलाकारांतील विचारांना एक नवी उंची गाठून देतात. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत माझ्या चिमुरड्या हातांनी चित्रकलेच्या वहीत पहिली रेघ ओढली त्या माझ्या कुलकर्णी सरांना जवळजवळ १८ वर्षांनी भेटून आपली प्रगती दाखवताना खूप छान वाटत होते. आपली विद्यार्थिनी इथवर पोहोचल्याचा चेहऱ्यावर झळकलेला अभिमानी कौतुकास्पद आनंद हीच तिच्या चित्रांना मिळालेली यशाची अमूल्य पावती होती. शाळेतले , ऑफिसमधले मित्रमैत्रिणी यांची आवर्जून हजेरी हादेखील याच प्रेमाचा आणि अभिमानाचा भाग. अतिशय अनपेक्षित असलेली माझ्या शाळेतील फादरांची भेट ही अवर्णनीय होती.त्यांना इथवर आणणाऱ्या आशाचे खूप आभार. कधीकधी हरवलेली किंवा चुकून हरवत चाललेली नाती ही अशी पुन्हा नव्याने जुळून येतात... एका प्रदर्शनाच्या माध्यमातून, अनोळखी कलारसिकांपर्यंत आपले विचार पोहोचू शकतात... एका प्रदर्शनाच्या माध्यमातून, आणि मनाच्या एका कप्प्यात पुन्हा एक नवे नाते जन्म घेऊ लागते... एका प्रदर्शनाच्या माध्यमातून. 

महिला दिनाच्या दिवशी मिळणारे हे इतके सर्व प्रेम, आदर, प्रोत्साहन नक्कीच एखाद्या महिलेसाठी जगातील कोणत्याही भेट्वस्तूपेक्षा निश्चितच मौल्यवान असेल....आणि त्यासाठी पुन्हा एकदा आभार सर्वांचे हे इतके सुंदर प्रदर्शन जीवनात घडवून आणण्यासाठी. खरे तर आज असे वाटत आहे कि 'आदिशक्ती अक्षरशक्ती' हे प्रदर्शन फक्त स्त्रीशक्तीचा ,अक्षरांचा आणि लिप्यांचाच उत्सव नाही तर हा एक नात्यांना जोडणारा उत्सव आहे. आज वाशी येथील प्रदर्शन संपले असले तरी हा उत्सव घेऊन आम्ही पुन्हा कलारसिकांच्या भेटीला मुलुंड येथे प्रदर्शन घडवून आणत आहोत. 

मग याल ना आमच्या 'आदिशक्ती अक्षरशक्ती' प्रदर्शनाला ?
स्त्रीशक्तीला सलाम द्यायला ?
लिप्याना अनुभवायला ? 
तुमच्या-आमच्यातील नात्यांची वीण अधिक घट्ट करायला ?


- रुपाली ठोंबरे.
वाचण्यासाठी आणखी काही
नजराणा लिप्यांचा...
आदिशक्ती-अक्षरशक्ती--वर्ष तिसरे

5 comments:

  1. सगळ्यांच्या भावना सुरेख शब्दांत मांडल्या आहेस रुपाली!

    ReplyDelete
  2. Khoop chhan lihile ahes Rupali

    ReplyDelete
  3. Khup sundar lihites Rupali...mastch.

    ReplyDelete
  4. Thanks a lot dear.....
    Khup chan lihila gelay, as usual!

    ReplyDelete
  5. Khup touching and emotional words.... Refresh memories..

    ReplyDelete

Blogs I follow :