फोनवरच्या कर्णकर्कश गजराने ती पहाटे ठरल्या वेळीच उठली. डोळे उघडून आसपास नजर टाकली तर काल रात्रीचा अस्ताव्यस्तपणा तसाच टिकून होता. ते कालचे विस्कटलेले कपडे ,लॅपटॉपच्या अस्ताव्यस्त वायर्स, प्रेसेंटेशन्स चे सर्व पेपर्स सर्व तसेच निपचित पडून होते. तेव्हा तो सारा पसारा पाहून तिला आठवले , काल रात्री लॅपटॉप शट डाऊन केल्यानंतर ती बराच वेळ विचार करत तशीच पडून राहिली होती. आणि नंतर केव्हा डोळा लागला ते कळलेच नाही. रात्रीच्या गोष्टी तिला जशाच्या तशा आठवत होत्या पण तिला आता पुन्हा त्यावर विचार करत बसण्याची इच्छा नव्हती आणि तिच्याकडे तितका वेळही नव्हता. तिने सर्व आवरले आणि ठरल्या वेळेनुसार खाली येण्यासाठी निघाली. एकदम फ्रेश होती ती आज.काल घडलेल्या संभाषण आणि त्यानंतर झालेल्या भ्रमनिराशाची एक हलकीशी खूण देखील त्या सुंदर चेहऱ्यावर नव्हती.
काल संध्याकाळप्रमाणे आताही ब्रेकफास्टच्या ठिकाणी पोहोचलेली ती पहिलीच पाहुणी होती. सर्व टेबले अतिशय उत्तम पद्धतीने सजली होती. तिने एका टेबलवर आपली लॅपटॉपची बॅग ठेवली आणि हातात प्लेट घेऊन पुढे जाऊ लागली. इतक्यात मागून ओळखीची हाक आली आणि ती तशीच मागे वळली. कालचा मॅनेजर व्यवस्था पाहण्यासाठी तिथे आला होता.
" हॅलो , गुड मॉर्निंग मॅडम . कशा आहात तुम्ही ? झोप व्यवस्थित झाली ना ? अजून काही त्रास तर नव्हता ना ? "
" अरे मॅनेजर साहेब , तुम्ही ? गुड मॉर्निंग . मी छान . सर्व अगदी व्यवस्थित . खरंच थँक्स . काल तुमची फारच मदत झाली . आता पुढे बघू काय नशिबात वाढले आहे ते .२ महिने काढायचे आहेत ना आता या बेटावर!"
"त्याची काही काळजी करू नका, मॅडम. न्याहारी तर तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. दुपारचे जेवण सुद्धा तुमच्या कंपनीकडून स्पेशल ऑर्डर देऊन बनवून घेतल्यामुळे तुमच्या पसंतीस पडेलच. आणि आता राहिला प्रश्न रात्रीच्या जेवणाचा. तर तेही मी जातीने स्वतः लक्ष देईल . आमचे पाहुणे खुश तर आम्ही खुश. So now Enjoy your breakfast . मी निघतो . लवकरच भेटू. "आणि तो हसतमुखाने रिसेप्शनच्या एरियामध्ये निघून गेला. तीसुद्धा न्याहारीसाठी पुढे गेली. त्याने सांगितल्याप्रमाणे ब्रेकफास्ट खरंच उत्तम होता. तिला तिचे सहकारीदेखील तिथेच भेटले . त्यानंतर ती कॉन्फरेन्स मिटिंगसाठी तिथून निघून गेली.
रात्रीच्या जेवणाच्या वेळी पुन्हा तो मॅनेजर भेटला. त्याने आज तिच्यासाठी खास भाजी आचाऱ्यांकडून कडून बनवून घेतल्याने आज अजिबात तक्रार नव्हती . अगदी मनसोक्तपणे स्वादिष्ट जेवणावर ताव मारल्यानंतर ती आज बराच वेळ लॉबी मध्येच बसून होती.... आसपासच्या कुतूहल वाटणाऱ्या वस्तू आणि व्यक्तींचे निरीक्षण करत. तिच्या या नजरेतून आज हा मॅनेजरसुद्धा सुटला नव्हता. ती बराच वेळ त्या मॅनेजरला टक लावून पाहत होती. शरीरयष्टीने चांगला उंच , रंगाने गोरा नसला तरी देखणा होता तो. एक वेगळेच व्यक्तिमत्त्व होते ते. निहाल... त्याच्या नावानेही तिला एक वेगळीच भुरळ घातली होती.अगदी शोभत होते त्याला ते नाव... सदा आनंदी ,समाधानी ,इतरांवर आपल्या आनंदाचा वर्षाव करणारा नवा ऋतूच जणू... या एवढ्या मोठ्या हॉटेलची जबाबदारी त्याच्यावर असली तरी चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे टेन्शन दिसणार नाही. सदा हसतमुख. आज सकाळपासून आला आहे. १२ तास तर कधीच उलटून गेले तरी हा मात्र तितकाच उत्साही. सतत घाईगडबडीत. या हॉटेलच्या कामातसुद्धा कित्ती काम असते(स्वगतच मनात तिला तिचा IT मधला एका कॉम्पुटरसमोर संबंध दिवस बटणांची खाडखाड करणारा जॉब आठवला ). आज तर ती मुलगी पण नव्हती ना ! काय बरे तिचे नाव ?... ती मनाशीच आठवण्याचा प्रयत्न करत होती. ती ते नाव शोधण्यात गुंग होती आणि ती गुंगी क्षणात भंगली ,
" मॅडम , इथे काय करता तुम्ही ? जेवण तर छान झाले ना? निश्चितच आवडले असेल तुम्हांला. "
" हो . थँक यु सो मच. आज सहजच आले आणि बसले आहे इथे. रूममध्ये पण एकटीला कंटाळा येतो ना आणि आज काही विशेष कामसुद्धा नाही. खरंतर इथे आसपासची गंमत पाहण्यात पण एक वेगळीच मज्जा आहे .तिचाच आस्वाद घेते आहे . "
"छान... !" तिच्या बोलण्यावर त्याला आणखी काही सुचलेच नाही.
" पण तुमची ड्युटी फारच मोठी असते हो . आणि विशेष म्हणजे अजूनही तुम्ही मात्र एकदम ताजे वाटत आहात.खूप छान "
" नाही असे काही नाही , मॅडम. आज आमिरा नाही आली ना आणि त्यात आज नवे बुकिंग्स पण खूप होते त्यामुळे... "तिला त्या मुलीचे नाव कळले आणि न जाणे स्वतःलाच काय ते समाधान मिळाले तिला. ती पुन्हा ते नाव पुटपुटत होती.
" आमिरा... "
" हो ना ! तिच्या मुलाची तब्येत आज ठीक नव्हती म्हणून जरा सुट्टी घेतली तिने."ते ऐकले आणि ती उडालीच.
"काय ? तिचे लग्न झाले आहे ? किती लहान वाटते ती. पण असो. खूप सुंदर दिसते ना ती !"निर्वीच्या या बोलण्यावर निहाल फक्त हसला आणि पुन्हा त्याच्या कामाकडे वळला. ती सुद्धा तिच्या रूममध्ये आली. लॅपटॉपवरचा थोडा टाईमपास , थोडे काम झाले आणि तिची नजर वळली मेसेंजरकडे. एकदोनदा बझ्झ केले , थोडी वाट पाहिली आणि तशीच झोपी गेली.
पुढे कित्येक दिवस तिची थोडीफार अशीच दिनचर्या असायची. त्या दोघांसोबत आता तिची चांगलीच गट्टी जमल्यामुळे ट्रेनिंग नंतरचा बाकी सर्व वेळ ती रिसेप्शनच्या इथेच असायची. रात्री उशिरापर्यन्त खालीच वेळ घालवल्यानंतरसुद्धा आल्यावर त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणे हा तिचा नित्यनियम असायचा. बऱ्याचदा तो उपस्थित नसायचा आणि कधी असलाच तर फार व्यस्त असल्याने काही मिनिटांतच तो संवाद संपायचा. पण आता ती त्या गोष्टीचा खूप विचार करत नसायची. तिच्या मनात आता त्या नवीन देशाने आणि तिथल्या नव्या माणसांनी एक नवेच घर निर्माण केले होते ज्यात रमणे तिला आता आवडू लागले होते.
एका संध्याकाळी निर्वी रूममध्ये पोहोचली आणि फोनची रिंग वाजली. रिसेप्शनवरून येणाऱ्या फोनची आता तिला सवयच झाली होती पण तरी हा फोन सुद्धा तितक्याच आतुरतेने आणि तत्परतेने तिने उचलला.
" मॅडम , आज पुरणपोळी खाणार का ?"
" अरे वा ! तुमच्या हॉटेलमध्ये हा मराठमोळा मेनू सुद्धा मिळायला लागला वाटतं. "
" अरे तसे नाही. घरून आणली आहे. त्या दिवशी तुम्ही पुरणपोळीची आठवण काढली आणि २ दिवसांपूर्वी अगदी सहज तुमचा विषय आमच्या घरी निघाला म्हणून आज आईने मुद्दाम बनवून पाठवल्या आहेत. या लवकर रिसेप्शनवर. मी वाट पाहतो आहे. "तिने फोन ठेवला आणि आनंदाने आधी २-४ उड्या तिथे बेड वरच मारून घेतल्या. ती लगेच निघाली आणि अवघ्या काही मिनिटांत ती त्या निहालसमोर हजर होती.
" या या , आज तुम्हांला एकदम तुमच्या आवडीचे जेवण मिळेल . मी म्हटले होते ना कि तुमच्या जेवणाची काळजी आता आम्हांला. "निर्वीने लगेच 'थँक यू , थँक यू ' म्हणत पुढे केलेल्या डब्यातून पुरणपोळी हातात घेतली आणि ती पूर्णपणे संपेपर्यंत पुढे तोंडातून एक ब्र सुद्धा काढला नाही . जणू त्या प्रत्येक घासाला ती मनसोक्तपणे अनुभवून घेत होती.पुरणपोळीचा शेवटचा घास फस्त केल्यावर ती आपले तोंड पुसून घेत सांगू लागली,
" मी सांगू शकत नाही मला कित्ती आनंद झाला ते! घराला खूप मिस्स करते आहे. आणि पुरणपोळी हा तर माझा सर्वात मोठा वीक पॉईंट. तुम्हाला सांगते, मागच्या ट्रीपच्या वेळी घरी पोहोचल्यावर काय हवे असे जेव्हा आईने विचारले होते तेव्हा मी पुरणपोळीच सांगितले होते. मला त्या दिवशी वाटले होते कि अजून दीड महिना तरी लागेल आता पुन्हा तो अनुभव घेण्यासाठी. पण तुम्ही खरंच खूप मोठ्ठ सरप्राईझ दिले मला आज. मावशींना खूप खूप धन्यवाद सांगा. "
" अरे परवा तुम्हीच सांगा तिला. इथे येणार आहे ती. ते काय आहे ना , माझी बहीण आणि तिची फॅमिली आली आहे भारतातून ...एरव्ही मी आणि आई आम्ही दोघेच असतो इथे... मी माझ्या कामात आणि तिलाही तिची पाळणाघराची कामे असतात... कुठे सहसा जाणे होत नाही... पण मग कोणी भारतातून इथे आले कि आमची दुबई सैर ठरलेली असते... आमचे सर्व पाहून झाले आहे पण तरी यावेळी मीच म्हणालो आईला कि घरीच एकटी काय करशील ... तू पण चल सोबत... सो, उद्या इथले सर्व व्यवस्थितरीत्या पार पडले कि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सुरु होईल आमची दुबई ट्रिप... Full to enjoy !!!"
" wow ! कित्ती छान ! मला पण दुबई बघायचे आहे. मग माझ्यासोबतसुद्धा पुढची सैर करा...याल ना माझ्यासोबत ? "
" अहो पुढची कशाला ? आताच चला ना आमच्या सोबत.दोनच दिवसांत परत येऊ आम्ही. तिथे राहण्याची व्यवस्था आम्ही केली आहे , त्यातच तुम्हाला पण सामावून घेऊ. ती काळजी करू नका. फक्त तुमच्या कामाचे बघा. म्हणजे काही काम असेल तर. नाहीतर आमच्या सोबतच हा वीकेंड स्पेंड करा... आम्हालाही एक गोड कंपनी मिळेल. "
" अरे हो, आयडिया छान आहे.काम तसे नाही काही. आणि गोड कंपनी काय ?... anyways छान. थँक यू. उद्या सांगा कधी निघायचे असेल ते म्हणजे तशी तयार राहीन मी सकाळीच."निर्वी खरंच खूप आनंदी होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता आणि तो पाहून निहालच्या चेहऱ्यावरसुद्धा आता उत्साह झळकला होता.
नेहमी प्रमाणे निर्वी आणि निहाल आजही त्यांच्या नेहमीच्या जागी येऊन बसलेले होते. आता बरीच रात्र झाली होती पण गप्पा खूप रंगल्या होत्या. आज निहाल हॉटेलमध्येच थांबला होता. अगदी पहाटेच खूप सारे महत्त्वाचे पाहुणे तिथे येणार होते. आमिरा मात्र लवकरच निघून गेली होती. त्यांच्या बोलण्यात आज प्रथमच अचानक अमिराचा विषय आला आणि निहालने अमिराची कहाणी तिला सांगितली.ती ऐकली आणि निर्वीच्या पायाखालची जमीनच काही क्षणांसाठी नाहीशी झाल्याचा भास तिला झाला. ती काही वेळ तशीच शांत होती. तो सुद्धा शांतच ... समोरच्या संथ झालेल्या पाण्याकडे एकटक पाहत.अचानक एक हवेची झुळूक त्यांच्या दिशेने वाहून गेली आणि दोघेही त्या विचारातून बाहेर आले. पण कोणीच काहीच बोलत नव्हतं. मध्येच तिला काहीतरी सुचले आणि ती शांतता सुद्धा शेवटी भंग पावली,
" माझी आई म्हणते कि लग्न हा खूप मोठा जुगार आहे. बरोबर पत्ते पडले तर सुखाचे दरवाजेच दरवाजे असतात समोर आणि चुकीच्या हातात पडलो तर वर्षांपासूनचे स्वर्गसुख क्षणात नाहीसे होऊ शकते.लव्ह मॅरेज असो वा अरेंज, सारखाच अनुभव.... "निर्वी बराच काळ असेच बोलत राहिली. निहाल मात्र फक्त ऐकतच होता. कुठल्यातरी खोल विचारांमध्ये तो पोहोचलेला होता.तिच्या बोलण्यात 'प्रेम' शब्दाचा उल्लेख झाला आणि त्या कधीपासून स्थिर असलेल्या मुखातून शब्द बाहेर पडले.तो आकाशातील अगण्य ताऱ्यांना साक्षीला ठेवून बोलत राहिला.
" हो ना ! पण प्रेम ही खरेच या विधात्याने निर्माण केलेली किती अप्रतिम भावना आहे. प्रेमामध्ये एक विराट शक्ती असते. प्रेमामध्ये माणूस एकाच क्षणी हसू आणि रडूही शकतो. सर्व सुखच सुख. प्रेमाची खूप सुंदर रूपे असतात. प्रेम खरंच काय कमाल चीज आहे. माणसाला क्षणात बदलून टाकते. प्रेम मिळाले कि साधे आसपासचे जग सुद्धा तो इंद्रपुरीचा स्वर्ग भासू लागतो आणि.... ... "
" ... आणि आणि आम्हांला तुमचे गुपित कळले. अंधारात केले तरी उजेडात आले बरे का ! तर आमचे मॅनेजर साहेब कुणावर तरी प्रेम करतात. खूप छान. कोण आहे ती ... म्हणजे मला सांगू शकणार असाल तरच सांगा."त्याने खोटे हसू चेहऱ्यावर आणले.
" प्रेम..? आणि मी...? आता करत नाही. तो नाद केव्हाच मागे पडलाय...पण पूर्वी करायचो... अगदी खूप ... विश्वास उडाला आहे आता...तेच बोलत होतो आणि तुम्ही मध्येच नसत्या सुखाचे स्वप्न रंगवले... प्रेम मिळाले कि साधे आसपासचे जग सुद्धा तो इंद्रपुरीचा स्वर्ग भासू लागतो आणि तेच प्रेम दुरावले तर आसपास जग असूनही ते नसल्यासारखे वाटते, खूप एकाकी बनून जाते जीवन. पण प्रेम खरंच खूप काही शिकवून जाते...मग ते प्रेम आनंद देणारे असो वा दुःख देणारे , फसलेले असो वा हरवलेले... मी तर खूप काही शिकलो माझ्या प्रेमामुळे ...कोणताही निर्णय विचार करून पण त्वरित घ्यावा नाहीतर आधीच उसवलेले पाश खूप ताणून नंतर पुन्हा शिवून एकत्र आणण्याचा नव्याने केलेला प्रयत्न फेल ठरतो... काही अर्थ नसतो त्याला... "तो बोलतच होता... मोकळा होत होता ... पण हे ऐकून ती मात्र पुन्हा शांतच झाली. काय बोलणार आता यावर? आणि एव्हाना ती स्वतःच तिने गुरफटून ठेवलेल्या तिच्या प्रेमकथेत शिरली होती.
(स्वगत)' मी त्याला सांगून टाकावे का ? पण त्याला कोणी भेटली तर नसेल. आणि खरेच मी लायक असेल त्याच्या '.
" असो. माझे जाऊ द्या. तुम्ही सांगा निर्वीमॅडम, मी तर खात्रीने सांगतो तुम्ही मात्र नक्कीच कोणाच्या तरी प्रेमात पडलेल्या आहात.... आहात ना ?"त्याचा आधीचा आवाज तिच्या कानांत शिरलाच नव्हता. पण पुढे प्रश्नार्थकी चढवलेल्या त्याच्या आवाजाने मात्र तिची विचारांची तंद्री तुटली. ती भानावर आली.
" काय ? सॉरी सॉरी... मी ना ... "
" आहात ना प्रेमात कुणाच्या तरी... चला आता सांगा लवकर कोण आहे तो. "
" मी ? छे ! छे ! काही काय ! आम्ही नाही असे प्रेमात पडत बिडत. "
" हो का ? मग असे बसल्या बसल्या , बोलता बोलता हरवून जाणे हा छंद आहे का तुमचा. जितके मला माहित आहे ही प्रेमाचीच लक्षणे आहे. आणि तुमच्यात ती सारी अगदी पहिल्या दिवसापासून पाहतो आहे मी. सदा कुठल्यातरी वेगळ्याच जगात हरवलेल्या असतात. आता सांगा. इतकी छान मैत्री झाली आहे आपली तर इतके नक्कीच शेअर करू शकता ."खूप मोठ्या निरव शांततेनंतर तिने आयुष्यात प्रथमच कोणासमोर तरी हे कबुल केले,
" हो...म्हणजे मलाच माहित नाही... हे खरेच प्रेम आहे का ... ... ...तो आणि मी ... दोघे फार वर्षांपासून ... ... ... "ती बोलत राहिली...पुढे कितीतरी वेळ. शाळेचे दिवस...चॅटिंगमधले ते गोड कडू क्षण... भारतातली त्या हॉटेलमध्ये झालेली कितीतरी वर्षांनंतरची भेट...विमानतळावरची ती नाजूक भेट ... विमानातले तिचे ते २ तास...तिच्या मनातला कोलाहल... आणि काही दिवसांपूर्वी झालेले ते अर्धवट राहिलेले चॅट..... हे सर्व तिच्या आठवणींच्या कप्प्यातून एका पाठोपाठ एक तिच्या नजरेसमोर तरळत होते आणि पुढच्याच क्षणी ओठांतून त्याच्या मनापर्यंत पोहोचत होते... ती ते प्रसंग इतके हुबेहूब त्याच्यासमोर उभे करत होती कि त्या सर्व भावना जशाच्या तशा त्याला जाणवत होत्या... परंतु ते शेवटच्या चॅटचा अंत त्याला अज्जिबात पटला नाही. त्याने तसे तिला बोलूनही दाखवले.
" छान! कमाल असते तुम्हां मुलींची. काय अर्थ होता का? कदाचित त्याने मजेत म्हटले असेल. इतके सर्व तुमच्यासाठी केले ते व्यर्थच का? मला तरी वाटतो कि काहीतरी गैरसमज होत असेल तुमचा... आणि प्रेमात गैरसमज म्हणजे विषाचे झाड... त्याला जितक्या लवकरात लवकर छाटून टाकाल तितके अधिक चांगले... नाहीतर एकदा का या झाडाची पाळेमुळे मनात घट्ट रुजून वाढत गेली तर वाढत जाणारे ते झाड नात्याला नेहमीसाठी नष्ट करेल. "
" हम्म्मम...तेही बरोबरच. पण करू काय ?"
" अरे, बोला त्याच्याशी. आता हेही आम्हीच सांगावे. By the way , असतात कुठे तुमचे हे साहेब ?"
" अमेरिका ...कॅलिफोर्निया "
" Ok Ok ... छान... बोला त्याच्याशी , लवकर सांगून टाका आपल्या मनातले सर्व... मला माहित आहे तोही वाट पाहतच असेल...वेळ घालवू नका... मी तर म्हणतो , आत्ताच फोन करा ... आता सकाळ असेल ना तिथे ... छान Good Morning surprize असेल... एकदम खुश होऊन जाईल... तुमचा तो 'मिस्टर कॅलिफोर्निया'..."
"काय बोललात ? मिस्टर कॅलिफोर्निया ?...काही काय? सार्थक नाव आहे त्याचे."
" आता तुम्ही नाव सांगत नाहीत म्हटल्यावर आम्ही म्हटले आम्हीच नामकरण करू तुमच्या मित्राचे ."हे लक्षात येता तिच्या नकळत तिची जीभ दातांमध्ये चावली गेली पण त्याने सार्थकचे केलेले हे नामकरण पाहून तिला हसूच फुटले.तिलाही ते पटले आणि खूप खूप हसले ते दोघे...ती खरे तर त्या नव्या सवंगड्याची सोबत खूप एन्जॉय करत होती.खूप रात्र झाली आहे आणि तो महत्वाचा फोन करायचा आहे अजून असे त्याने वारंवार सांगूनही ती तिथून उठण्याचे नाव घेत नव्हती. शेवटी पुन्हा निहालनेच आठवण करून दिली ,
" बघा हां , वेळ जातो आहे. लावा फोन आणि सांगा त्याला ..."
" अरे हो हो ... पुन्हा विसरलेच मी... जाते जाते... तुमच्याशी बोलण्यात ना सर्व राहून जाते ते हे असे..."हसत हसतच खोटा राग दाखवत निहालचा निरोप घेऊन ती लगेच तिच्या रूमच्या दिशेने धावायलाच लागली. मध्ये एका ठिकाणी असलेल्या मोठ्या फुलदाणीला धडकली सुद्धा. सावरले तिने लगेचच स्वतःला. मागे वळून पाहिले एकदा. निहाल निर्वीकडेच पाहत होता...स्वतःशीच हसत होता.
" अहो निर्वीमॅडम , जरा हळू हळू...माहित आहे प्रेमात हे असेच होते.पण तरी सावकाश. आज सांगूनच टाका त्याला....' यही सच हैं , शायद ... मैने प्यार किया ... तुझसे ... मैंने प्यार किया'... "
निहाल गुणगुणू लागला तशी निर्वी पुन्हा मनसोक्त हसली.तिचेही ते आवडते गीत होते पण ती तिथे आता क्षणभरही थांबली नाही. लिफ्टच्या दिशेने झपाझप पावले टाकत पुढे निघाली. आता निहालसुद्धा माघारी फिरला होता ... त्याच्या रूमच्या दिशेने. पण कितीतरी दूरपर्यंत तो गुणगुणत असलेल्या त्या गीताची धून तिच्या कानांवर येतच राहिली. त्या निरव शांततेत ती शीळ तिच्या हृदयाला भिडत होती. काही विचित्र हालचाल झाली मनाच्या एका कोपऱ्यात. पण तिचे सर्व लक्ष केंद्रित होते बंद लिफ्टच्या दाराकडे... ते उघडले गेले आणि साराच मार्ग आता मोकळा झाला...मनाचा , भावनांचा, आकांक्षांचा... प्रीतीचा...
- रुपाली ठोंबरे .
No comments:
Post a Comment