किनाऱ्यावरच्या वाळूत त्या भेटीचे ठसे उमटवत मी त्या अथांग पसरलेल्या नदीच्या पात्राशी पोहोचले.वाऱ्याच्या नाजूक झुळूकेसह हलणाऱ्या त्या गार पाण्याचा माझ्या अनवाणी पायांना तरंग स्पर्श झाला आणि त्यासोबतच कितीतरी तरंग अलगद या मनात आणि पाण्याच्या पृष्ठभागावर निर्माण झाले. पाय तसेच पाण्यात मोकळे सोडून तिथेच वाळूत खोलवर रुतलेल्या मोठया खडकावर बसले.… समोर अधूनमधून ढगांच्या आड दडणाऱ्या झगमगीत सूर्याचा सोनेरी किरणांचा रंगलेला लपाछुपीचा खेळ पाहत.
जवळचाच एखादा छोटासा खडा उचलावा आणि त्या पात्रात दुरवर फेकावा. माझा असा खेळ बराच वेळ चालला होता. सोबत मनात न सांगता येणाऱ्या-जाणाऱ्या असंख्य विचारांची ये-जा सुरु होती. फेकलेला खडा हवेत भिरभिरत जात त्या पाण्याला स्पर्श करायचा आणि अचानक आलेल्या या नव्या पाहुण्यामुळे पाणी जरा बिचकायचे, थोडे शरीर आत आकसून घेत ते जरा थरथरायचे. आणि असंख्य नवे तरंग त्यातून नव्याने जन्म घ्यायचे.त्या स्पर्शबिंदूभोवती जमलेले ते सारे तरंग आपला व्यास उंचावीत दूर दूर जात होते आणि मग शेवटी हवेच्या झुळूकेसोबत उठणाऱ्या तरंगांत विलीन होत पुन्हा ते पाणी एकरूप झाल्यासारखे भासे. तो खडाही एव्हाना गटांगळ्या खात नदीच्या खोल डोहात पोहोचलेला असेल.
या प्रत्येक खडयासोबत उठणाऱ्या तरंगासोबतच मनातल्या खोल समुद्रात आठवणींच्या लाटा बेभान होऊन उसळून येत होत्या. त्या लाटांनी फेसाळलेला तो सागर या डोळ्यांच्या कडयावरून बाहेर येऊ पाहत होता.एक … दोन … तीन …. असे कितीतरी खडे त्या पात्रात विलीन होत होते. जणू आसपासचे सारेच खडे संपतील कि काय अशी भीतीही एका क्षणी मनास स्पर्शून गेली.त्यासोबतच बेभान होऊन उसळणारा तो आठवणींचा महासागर आता अश्रू होऊन त्या नदीपात्रात समरूप होत होता. हातातून नदीच्या दिशेने भिरकावलेल्या प्रत्येक लहानमोठया खड्यांसोबत समोरच्या नदीपात्राच्या रुपेरी चादरीवर चाललेला सोनसळी सुवर्णकिरणांचा खेळ आणि मनातल्या भूतकाळातल्या गोडकडू आठवणींच्या पडद्यावर चाललेला रंगीत हवाहवासा कधी नकोनकोसा वाटणारा खेळ यामध्ये मी आता हरवून गेले होते.फार दूर न जाता जवळच पडलेल्या एका खड्याने निर्माण केलेले गार तुषार माझ्या दिशेने उडाले आणि क्षणभरासाठी सबंध अंगावर शहारे उभे राहिले. आणि त्याच क्षणी मी भानावर आले.
आता सायंकाळ झाली होती. तासाभरापुर्वीचा तो लखलखणारा सूर्य आता लालबुंद झाला होता. काही क्षणांतच तो आता डोंगराआड लय पावणार होता. शेजारच्या झाडीतून कृष्ण धूम्ररेखा लाल-केशरी-निळसर आकाशाकडे वक्र गतीने जात होत्या. त्यांची हालचाल नर्तकीच्या तालबद्ध पदक्षेपांप्रमाणे भासत होती. घरट्यांकडे परत येणारी ही पाखरे मधुर किलबिल करीत होती.जणू काही पश्चिम दिशेला सुंदर यज्ञकुंड प्रज्वलित झाले होते.त्यात मेघखन्डांच्या आहुती दिल्या जात होत्या आणि हे सारे पक्षी ऋत्विज बनून मंत्र म्हणत होते. कधी अचानक वाटे मी जणू या विश्वाच्या विशाल देवालयात ध्यान लावून बसले आहे. पश्चिमेकडं या देवळातला नंदादीप मंद मंद होत चालला आहे. जरा वर पाहिले तर जाणवे आता या मंदिरात निरांजनांमागून निरांजनं प्रज्वलित होत जातील. शेजारीच एखाद्या थोर योग्यासारखी समाधी लावलेले पानगळ झालेले नेमस्त झाड आसवांच्या पडद्याआडून पाहिले. काही क्षणासाठी त्या झाडात माझ्या उदास आयुष्याचे प्रतिबिंब मला दिसले. पण दुसऱ्याच क्षणी दूर उंच शेंड्यावर फुटलेली कोवळी पालवी नजरेस पडली,मनात काहीतरी अनामिक हालचाल झाली आणि जणू मनाच्या वाळवंटात एक नवे कल्पनेचे,चैतन्याचे कारंजे उत्पन्न झाले. काही काळापूर्वी फेकलेल्या प्रत्येक खड्यासोबत निर्माण होणाऱ्या तरंगांप्रमाणेच मनातही असंख्य विचारांच्या मालिकांची गर्दी झाली होती. सबंध शरीरभर त्याचा मानसिक थकवा जाणवत होता. तो आता अवचितच स्फुरलेल्या कल्पनेच्या कारंज्यातून येणाऱ्या लाखो सकारात्मक आणि स्फूर्तीदायक सूक्ष्म तुषारकणांमुळे क्षमलेला वाटत होता.
कसे असते ना आपले ? एका क्षणी उदास तर दुसऱ्या एका क्षणी आनंदी ,आणखी एखादया क्षणी कोमेजलेलो तर कधी उत्स्फूर्त… बरेचदा सभोवतालचे जग , त्यातील सूक्ष्म हालचाली आपल्या मनात असे काही नवे बदल घडवून आणतात कि क्षणाक्षणाला जग नवे भासते. आणि या नव्या जगाच्या ओघात आपल्या विचारांचा प्रवाह सुद्धा एक दिशा घेतो. आणि क्षणाक्षणाला जग कसे बदलत जाते याचा साक्षात्कार आपल्याला घडत जातो. ही सुद्धा या जगण्यातली एक मज्जाच आहे , नाही का ?

- रुपाली ठोंबरे
खूपच सुंदर वर्णन केलं आहे तू .. वाचताना अस वाटत कि मी ते सर्व प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहत आहे ..
ReplyDeleteMassst Rupali....kharach sollid lihala ahes tu....ek number....tuzya kautukasathi shabd apure padat ahet... Mala marathi cha hi abhimaan ahe ani tuza hi. Keep going!! Cheers!
ReplyDelete