Sunday, May 8, 2016

"Four shades"...आज अनुभवलेले नाविन्यपूर्ण असे काहीतरी

आज बऱ्याच वर्षांनी जहांगीर आर्ट गैलेरीला जाण्याचा योग चालून आला…. मनाला मुग्ध करणाऱ्या चित्रांच्या एका प्रदर्शनामुळे… प्रदर्शन "Four  shades".

एकच गैलेरी… पण ४ विविध कलाशैलीनी नटलेली… ४ वेगवेगळ्या कलाकारांच्या प्रतिभेच्या विविधढंगी कुंचल्यातून साकारलेली, एकाच जागी एकरूप झालेली.…पाहणाऱ्याचे भान न हरपले तर नवलच. याचे पूर्ण श्रेय जाते या तरुण कलाकारांना.
शशांक म्हशीलकर या शिल्पकाराच्या शिल्पकलेतुन सत्य-असत्य, हकीकत-कल्पना यांची योग्य जडणघडण झाल्याने या जीवनातील बारकावे नकळत मनात कोरले जातात. आजपर्यंत शंकर मंदिरात कित्येकदा गेले पण तेथील शिवशक्तीचे खरे रूप आज या नेत्रांस दिसले , रात्रीचा सुर्य आज प्रथमच कल्पनांच्या जगातून फार पूर्वी उगवल्याचे ध्यानात आले ,माशाचे खरे वास्तव्य आपण व्यर्थ म्हणून फेकलेल्या हाडांत दडलेले असते हे आजच कळले , ज्या कल्पतरूचा प्रत्येक भाग उपयुक्त असतो त्याकडून मिळालेली 'नारळ ' ही देण असो वा माणसाची सर्वात प्रिय पैशांची नाणी-नोट असो ती मानवानेच कल्पनाविश्वात राहून निर्मिलेल्या देवासमोर वाहून वाया घालवणे हे योग्य कि अयोग्य … असे आणखी कितीतरी प्रश्न , कितीतरी नवे खुलासे आज झाले… ते शशांकनी साकारलेल्या ब्राँझ या सर्वात कठीण धातूपासून घडविलेल्या शिल्पांतून.

मूळ वास्तव आणि कल्पनात्मक जग यांतील पोकळी दाखवण्याचा सफल प्रयत्न समीर पाटीलच्या लक्षवेधी चित्रांतून सहज नजरेस पडतो. वर्तुळ ,त्रिकोण ,चौकोन या भौमितिक आकारांतून आपल्याला या खऱ्या आणि खोटया जगाची सैर करून आणण्यात या चित्रकाराने खरेच यश संपादन केले आहे. विविध रंगांच्या रंगछटा असो वा फक्त काळ्या पांढऱ्या ऊन सावल्यांचा खेळ… बघणारा पाहतच राहतो. विविध रंगछटामधून साकारण्यात आलेला ३D इफेक्ट हा एक कौतुकाचाच भाग आहे. सगळीकडे वर्तुळ हा आकार प्रामुख्याने त्याच्या चित्रांत दिसून येतो. याचे कारण सांगताना तो म्हणतो ,
" पृथ्वी , सुर्य ,ग्रह असे कितीतरी निसर्गातील प्रमुख गोष्टी वर्तुळाकार आहेत म्हणून निसर्गाचा हा विषय हाताळताना वर्तुळाला मी विशेष प्राधान्य दिले आहे".   
याची चित्रे वरवर जरी सारखीच भासत असली तरी ती खूप बोलकी आहेत, वेगळी आहेत आणि रंगाच्या योग्य वापरामुळे ती कोणत्याही भिंतीवर अगदी उठून दिसतील यात शंकाच नाही.

प्रवीण पाटील या कलाकाराच्या चित्रांतून कधी बालपण आणि बालपणीच्या ओसंडून वाहणाऱ्या प्रतिभेचे दर्शन घडते तर कधी 'जैत रे जैत' या सुप्रसिद्ध चित्रपटामधील नायक नायिकेच्या भूमिकांचे सुंदर वर्णन , कधी अजिंठा-वेरूळ मधल्या शिल्पांच्या त्या स्तब्ध आकृत्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात तर कधी आपले अवघे आयुष्य मागे सोडून इतरांच्या लग्नकार्यात एकरूप होणारी धवलारीण नवरंगांत प्रकट होते. लहानपणी नावडते झालेले गणिती आकडे आज चित्रकला या आवडत्या विषयात वापरून प्रवीणने त्याचा एक सकारात्मक दृष्टीकोन जगासमोर दर्शविला.

इंद्रधनूचे इतर सर्व रंग डावलून हेमंत भोर या चित्रकाराने फक्त पेन्सिलच्या काळ्यापांढऱ्या , गडदपुसट रंगछटांतून आणि शब्दांच्या माध्यमातून आजच्या जगातील अनेक विषय अगदी योग्यरित्या मांडले आहेत. त्याच्या चित्रांत कुठे अभ्यासासाठी भुकेलेली चिमुरडी भेटते तर कुठे अशीच एक चिमुरडी सेल्फिच्या आहारी गेलेली आढळते . हेमंतची चित्रे बोलतात आणि बोलताना या चित्रांत आपल्याला सहज दिसून येते… एक आभासी जग , स्त्रीचे एक अनोखे विश्व ,आजचे स्पर्धामय झालेले हे वास्तवातील जग , आधुनिकतेच्या नावाखाली हतबल झालेले तारुण्य ,एखादी कृती करण्याआधी मनात उठणारे वादळ. नवरसांच्या विविध भावना दाखवत अशी ही सर्व चित्रे प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच भुरळ पाडतात.सोबत असलेली त्या चित्राच्या संदर्भातील शाब्दिक रचना विशेष उल्लेखनीय आहे. 

असा हा चतुर्शैली महोत्सव या आठवडयात जहांगीरमध्ये रंगला आहे. आणि आज तिथे प्रत्यक्ष भेट दिल्याने एक वेगळेच समाधानाचे भाव चेहऱ्यावर घेऊन मी घरी परतले.


- रुपाली ठोंबरे.  


No comments:

Post a Comment

Blogs I follow :