Saturday, April 4, 2020

This Too Shall Pass


आज तब्बल १२ झालेत माणूस आपल्याच घरात अडकून पडला आहे पण कशासाठी ? तर स्वतःला आणि आपल्याच प्रियजनांना एका कोरोना नामक राक्षसी शक्तीपासून वाचवण्यासाठी. एकमेकांपासून दुरी हा एकमेव उपाय आहे याला आपल्यापर्यंत पोहोचण्यापासून रोखण्याचा. काही मूर्ख अपवाद वगळता देशातला प्रत्येक जण या २१ दिवसांच्या लॉक-डाऊनमधिल नियमांचे अगदी काटेकोरपणाने पालन करताना दिसत आहे. खरेतर विशेष कौतुक वाटते ते लहानग्यांचे. दिवसभर शाळा , थोडा अभ्यास त्यानंतर खेळ असा त्यांचा साधारण नियमित दिनक्रम... मजामस्ती करत अक्खा दिवस कसा पार पडतो हे त्यांनाही कळत नाही. या रोजच्या कार्यक्रमात एक- दोन दिवसांत येणारी सुट्टी म्हणजे आनंदच आनंद . पण हा सर्व आनंद लॉक-डाऊनमध्ये मिळालेल्या सुट्ट्यांमध्ये मात्र त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. आणि खरंच फार कठीण आहे तासभरही एका ठिकाणी शांतपणे न बसणाऱ्यांना असे १० दिवस घराबाहेर जाऊ नकोस असे सांगणे आणि त्यांनीही ते समजूतदारीने पाळणे. नोकरीधारकांना ऑफिसमध्ये जाण्यास मनाई असली तरी वर्क फ्रॉम होम च्या माध्यमातून थेट ऑफिसच त्यांच्या घरी अवतरलेले दिसते. या सर्वातून वेळ काढत आपल्या मुलांसोबत वेळ घालवणे हेही एक कौशल्यच.

आमच्या घरी सुद्धा काहीसे असेच दृश्य... ५ वर्षांचा ओम शाळेतील परीक्षा रद्द होऊन १५ तारखेपासूनच घरी. सुरुवातीला कोरोनाचे इतके प्रस्थ मुंबईत वाढले नव्हते त्यामुळे दिवसभर खाली गार्डन मध्ये मुलांचा नुसता हल्ला-गुल्ला. पण हळूहळू हे चित्र बदलत गेले. वातावरण अधिक गंभीर होत गेले. सोसायटीच्या आतमध्ये सुद्धा वर्दळ विरळ होत गेली. मग घरातल्या घरात मुलांना रमवण्याचे प्रयत्न सुरु झाले. सारे बैठे खेळ मांडले गेले... कधी चित्रकला कधी आणखी काही. या दिवसांत ओमची एका खेळासोबत खास मैत्री जमली. जगाच्या नकाशावर देशांचे कोडे आणि त्यानंतर त्या परिपाटावर वेगवेगळ्या देशांच्या झेंड्याची अचूक मांडणी. तासनतास या खेळात तो रमून जायचा. सुरुवातीला आजी, आबा, मी ... सर्वांकडून  मदत घेऊन तो ती मांडणी पूर्ण करायचा पण नंतर आमच्या शिवायच तो खेळ पूर्ण होऊ लागला . दिवसेंदिवस कोरोनाच्या बातम्या वाढू लागल्या. इतर देशांचे बदलते रूप पाहून आपल्या देशात असलेली 'सोशल डिस्टन्सिंग' ची निकड अधिक तीव्रतेने जाणवू लागली. रोज टीव्हीवर जगाच्या नकाशावर कोरोनाग्रस्त देशांचे गणित आणि समोर ओमच्या खेळातील तेच सुंदर देश... या सर्वाला पाहता पाहता एक कल्पना सुचली...आणि जन्म झाला एका नव्या कलाकृतीचा.

खरेतर सगळीकडे पहिले तर कोरोनाची भीषणता , त्यामध्ये हतबल झालेले देश, काय करावे आणि काय करू नये याबद्दल जनजागृतीकरण ... असेच काहीसे दृश्य. मी काही वेगळे करण्याचे ठरवले. 'The Secret' मध्ये सांगितल्याप्रमाणे जितका सकारात्मक विचार करू तितके चांगले घडू शकेल हा विचार डोक्यात आला आणि जगाच्या येणाऱ्या नव्या भविष्याचे रूप डोळ्यांसमोर आले... नक्कीच कोरोनाच्या हल्ल्यानंतर मुक्त झालेली पृथ्वी,जनजीवन अगदी लगेच पूर्वस्थानावर येणार नाही पण तरी या कोरोनापासून भविष्यात मिळवलेली दुरी हे एक खूप मोठे यश असेल. दिवसभर कंटाळून सर्वांना त्रस्त करणाऱ्या ओमलाही मी यात सामिल करून घेतले. झेंड्यानी पृथ्वीवरील जनजीवन दाखवणे हि काहीशी त्याची कल्पना. मागे 'डॉट टू  डॉट ' या माझ्याच प्रदर्शनाच्या वेळी बिंदू , वर्तूळ यांबद्दल मनात विशेष रुची. शिवाय पुथ्वी गोल...या भयानक विषाणूचा आकार गोलाकारच. सर्व काही अगदी छान जुळून येत होते. नकाशातील प्रत्येक ध्वजांचे रंगकाम म्हणजे फार वेळ घेणारे आणि तितकेच महत्वाचे. ती पूर्ण जबाबदारी ओमने स्वतःच्या खांद्यांवर घेतली. मी फक्त झेंडे काढून दिले पण त्यांना खरे रूप दिले ते याच चिमुकल्यानेच. अगदी कोणता देश कोणत्या दिशेला .आसपासचे देश कोणते . त्यांचा आकार ... हे सर्व लक्षात घेऊन सर्व मांडण्याचा त्याचा आग्रह . किती उत्साह आणि धीर होता तेव्हा त्याच्यामध्ये. उरलेल्या जागेत आम्ही डोंगर आणि जंगलांचे दर्शन घडवले. महासागरांचे निळे पाणी दृष्टीक्षेपात आले आणि चित्रातली पृथ्वी आपलीशी वाटू लागली . ओमला तर भारीच मज्जा येत होती. पृथ्वी हे एक जग आणि कोरोना विषाणू ये दुसरे... ते विषाणू आपल्या मातीवर उतरले आणि संपूर्ण दुनियेत हाहाकार झाला. डॉक्टर्स , नर्सेस दिवसरात्र प्रयत्नांची शिकस्त करत आहेत. शासन , प्रशासन आणि जनता सर्वच एकीने लढत आहेत. या सर्वाना नक्कीच यश मिळेल. आणि हा विषाणू पृथ्वीपासून कितीतरी दूर जाऊन पडेल. आणि पुन्हा येण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्याला शिरकाव करण्यास वाव मिळणार नाही एवढी सोशल डिस्टन्सिंग निर्माण झाली असेल या दोन जगांत. तीच पोकळी निर्माण केली आहे आम्ही दोघांनी. दिवसभर सगळीकडे कोरोना कोरोना पाहून मुलांच्याही मनात काहीशी भीती निर्माण झाली आहे. कोणी भाजीपाल्यासाठी बाहेर जाऊ लागले कि अडवतात कि "बाहेर कोरोना आहे.नका जाऊ." चित्रातील कोरोनाची मालिका काढत असतानाही ओम विशेष काळजी घेत होता कि चुकूनसुद्धा त्याचा स्पर्शही नको आपल्या पृथ्वीला.

आणि खरेच हेच भविष्य आज जगातील प्रत्येक देश, प्रत्येक माणसाला लवकरात लवकर हवे असेल. हेच त्याचे स्वप्न असेल ... "Today's World's Dream "... म्हणजे "आजच्या जगाचे स्वप्न" जे लवकरात लवकर हकिकतेत उतरावे हीच यावेळी एकमेव प्रार्थना.जरी काही कारणांमुळे यावर पूर्ण मात करता आली नाही तरी त्यातून बरेच काही शिकून पुढे सावधानता बाळगणे केव्हाही उत्तम.हे एक जगमान्य सत्य  आहे कि जगात अशी कोणतीच परिस्थिती नाही जी कायम टिकून राहील ... वेळ ही सतत बदलत असते . आज दुःख आहे तर उद्या सुख नक्कीच वाट्याला येईल. परंतु अशा बिकट प्रसंगी गरज आहे ती संयमाची आणि धीराची . विचार सकारात्मक ठेवा ... घरीच राहा ... शक्यतो घराबाहेर अधिक पडू नका... नियमांत राहून आजही आणि सर्व ठीक झाल्यावरही जमेल तेव्हढी मदत करण्याचा प्रयत्न करा ... म्हणजे नक्कीच हे  जग अंधःकारातून प्रकाशाकडे जाण्यास सक्षम ठरेल यात कणभरही शंका नाही.आणि आपणा सर्वाना हेच हवे आहे. हो ना ?
या कोरोना नामक सूक्ष्म परंतू अतिभयानक राक्षसांपासून या मानवजातीला वाचवायचे आहे.
त्याला हरवायचे आहे आणि आपल्याला जिंकायचे आहे .
पण हे एकट्या मनुष्याच्या हातात अजिबात नाही. म्हणून शरीराने दूर राहूनही मानाने मात्र एकत्र येऊ.
एकत्र लढूया म्हणजे विजय आपल्याच हातात आहे.


- रुपाली ठोंबरे    

4 comments:

  1. Khup sundar chitra , ani tyachi mandani.. Om che vishesh kautuk������

    ReplyDelete
  2. चिमुकल्यांची व्यथा आणि सद्य परिस्तितीचे अवलोकन मस्त झाले आहे, तू म्हणालीस तसं मनाने एकत्र राहूया आणि कोरोना वर मात करूया.. सुंदर लेख 👌👌

    ReplyDelete
  3. Khup mast om ne agdi maan laun kele aahe .... Sundar....❤️❤️

    ReplyDelete
  4. Mast ...khup mast ...om is doing very good

    ReplyDelete

Blogs I follow :