बाबांनी दार उघडलें. समोर सार्थक त्याच्या आईबाबांसमवेत उभा होता. बाबांचा हसतमुख चेहरा अगदी क्षणभरासाठी विचलित झाला. यांना कुठेतरी पाहिल्यासारखे वाटते आहे असा विचार करत बाबानी किंचित चष्म्याची काच व्यवस्थित करून समोर उभ्या मंडळींना नीट निरखून पाहिले.पण काही आठवत नाही तेव्हा ते लगेच भानावर आले. आणि आलेल्या पाहुण्यांचे हसतमुखाने स्वागत करत त्यांना आत घेतले. निर्वीची आईसुद्धा तोपर्यंत तिथे पोहोचलीस होती. पण आलेल्या पाहुण्यांना पाहून ती चपापलीच.तिच्याही नकळत ती पुटपुटली ,
" आता ही बाई या वेळेला इथे कशी काय?"पाण्यानी भरलेले ग्लास ट्रे मध्ये घेऊन येणाऱ्या वहिनीने लगेच आईंना असे गोंधळलेले पाहून प्रतिप्रश्न केला.
" आई, काय झाले?"
" अगं, काही नाही. पाणी दे त्यांना."असे म्हणून आई पुन्हा हसतमुखाने पाहुण्यांना सामोरी गेली.
" निर्वीच्या आई , घर अगदी छोटंसं असलं तरी खूप चांगल्या रितीने सजवलंय हां तुम्ही. छान."ते ऐकून निर्वीच्या आईच्या कपाळावर आठ्याची किंचित लकेर उमटली. देशमुख बाईंच्या बोलण्याला टोमणा समजावे कि स्तुती हेच तिला कळेना. पण थोडे गोड बोलून ही वेळ मारून घेऊ आणि या पाहुण्यांना परतीला पाठवावे असा विचार गोदावरीबाईंच्या मनात तरळून गेला आणि कपाळावरची ती रेषा कुठल्या कुठे हरवून गेली.कारण तिला निहाल आणि निहालच्या घरच्यांच्या स्वागतासाठी तयार व्हायचे होते. काही काळ शांतता पसरलेल्या त्या वातावरणात आतली कुजबुज जाणवू लागली. आत निर्वी तयार होऊन बाहेर येण्यासाठी उत्सुक होती पण आईच्या सांगण्यावरून वहिनीने तिला थांबवून ठेवले होते.
" अगं वहिनी , काय झाले आहे ? तो आला आहे ना ? मग झाले का तुमचे पाणी वैगरे देऊन. त्यानंतर माझी एन्ट्री होईल असेच ठरले होते ना आपले.... "
"निरू, हो गं. पण ना बाहेर तो आलेलाच नाही. कोणीतरी वेगळेच पाहुणे आले आहेत.असे एकंदरीत आईंच्या वागण्यावरून जाणवले मला. "
"काSSS य ? कोण ?"
" नक्की नाही माहित. पण आई ओळखतात त्यांना. आई बोलत आहेत त्यांच्याशी. तुला पण ओळखतात ते."वहिनीचे बोलणे ऐकून निर्वी पुन्हा एकदा संभ्रमात पडली. अर्ध्या तासापूर्वीच सार्थकचा मेसेज आला होता. ते घरातून निघाले असल्याचे त्याने कळवले होते. त्यांचे घर इतकेही दूर नाही. मग इतका उशीर कसा होतोय? आणि त्याबद्दल काही सांगितलेही नाही. आणि नेमके आत्ता कोण तडमडले असणार? आपले जुने ओळखीचे ... ? कोण ? अशा प्रश्नांमध्ये निर्वी हरवून गेली होती. बाहेर सुरु असलेली बोलणी कानांवर पडत असली तरी त्यातून काहीच तर्क काढता येत नव्हता. हातात घेतलेल्या फोनवर अचानक सुरु झालेली स्पंदने जाणवली आणि ती शहारली.
" ह्म्म्म... कोण असतील? आणि हीच वेळ मिळाली का त्यांना. मग वहिनी, आत्ता ?"- निर्वी.
" निरू, तू ती काळजी करू नकोस. आई प्रयत्न करत आहेत. ते बरे झाले ठरलेल्या पाहुण्यांना जरा उशीरच होतो आहे ते. "
'इंतेहा हो गयी इंतजारकी...आयी ना कुछ खबर मेरे यारकी'
सार्थकचा या अशा प्रसंगी आलेला हा मेसेज पाहून ती जराशी चक्रावलीच. पुढे विचारांची गाडी पुढे सरकेल तोच त्याचे पुढचे मेसेजेस न थांबता येत गेले आणि ती डोळ्यांची पापणीही न लावता ते वाचत गेली.
" अजून किती वेळ वाट पाहायची आम्ही तुमच्या येण्याची."आता निर्वीच्या जरा जरा लक्षात येऊ लागलं आणि ती ताड्कन उठून उभी राहिली.
" किती तयार होशील. तू कशीही तयार झालीस तरी छानच दिसशील.'
' ये ना लवकर बाहेर.'
'खूप आतुरतेने तुझी वाट पाहतो आहे मी.'
" निरू काय झालं गं ?"
"वहिनी, नक्की सांग. बाहेर कोण आलं आहे ?" ती अगतिकतेने विचारू लागली.
" अगं , खरंच मी पूर्वी नाही पाहिलं त्यांना कधीच. तुमचे जुने ओळखीचे आहेत. त्यांच्या गप्पांवरुन तरी इतकेच जाणवले कि तो मुलगा आणि तू एकाच शाळेत शिकत होतात आणि आता तो परदेशात असतो म्हणे. तोच आता बऱ्याच वर्षांनी आला आहे परत म्हणून भेटण्यासाठी आले ते असेच सांगितले त्या बाईंनी. फारच फॅशनेबल बाई वाटली ती मला तर....पण तू नकोस काळजी करू. तुझे पाहुणे येण्याआधी आई नक्कीच त्यांना परत पाठवेल बघ."हे ऐकून निर्वी धीम्या आवाजात पण शक्य तितके ओरडून सांगू लागली,
" अगं वहिनी, हा तोच मुलगा आहे... सार्थक."
" हो हो सार्थक असेच काहीसे नाव सांगितले तेव्हा त्यांनी."निर्वीचा चेहरा रडकुंडीला आला होता.
" ते लोक माझ्यासाठी तिथे ताटकळत बसले आहेत कधीपासून आणि मी? मी, इथे काय करते आहे? आईला बोलावं तू पट्कन.तिचे काय सुरु आहे कळतच नाहीय.सार्थकच येणार हे माहित होते ना तिला?मग ती अजून कुणाची वाट पाहत बसली आहे ?"वहिनी, बाहेर जाऊन आईला बोलावणार तोच तीच लगबगीने आत आली. आणि निर्वीला म्हणाली,
" आपले पाहुणे अजून तरी आले नाहीत. पण आयत्या वेळी त्या देशमुखबाई आल्यात बघ आपल्या परदेशातून परतलेला मुलगा दाखवायला.उगाच फुशारक्या मारायची सवयच आहे त्या बाईला. मी बराच प्रयत्न केला पण ते लोक तुला भेटल्याशिवाय जाणार नाहीत वाटते. म्हणून तू जा आणि थोडे बोलून ये. आणि जरा त्यालाही फोन करून बघ कि ते कधी येत आहेत. इतका उशीर का झाला?"निर्वी आणि वहिनी दोघेही स्तब्धपणे उभ्याच होत्या हे बोल ऐकून. निर्वीला काहीच उमगत नव्हते कि आई अशी का वागते आहे ते. आणि वहिनीला इतके मात्र कळून चुकले होते कि आपले चुकून काहीतरी नक्कीच चुकले आहे. त्यामुळे तीही शांतच होती.
"अगं आई , तू असे का करते आहेस गं ? सार्थकच तर तो मुलगा आहे ना ज्याच्याशी मला लग्न करायचे आहे आणि म्हणूनच तर त्यांना बोलावले आहे ना मी इथे तेही तुमच्याच सांगण्यावरून... मग आता काय झाले?"आईने आपल्या सुनेकडे पाहत दोघीनांही जाब विचारला. निहालचे नाव ऐकताच निर्वी जितकी चकित झाली ती तितकीच चिडली सुद्धा?
" काय ? या सार्थकशी लग्न करायचे होते तुला? "
" होते नाही करायचे आहे . मग तुला काय वाटले ?"
" हिने मला निहालबद्दल सांगितले होते म्हणून तर आम्ही तयार झालो होतो...तूच सांगितले होते ना गं? पण मग हा काय प्रकार आहे ?"
" निहाल ? ते कसे शक्य आहे ? आणि हा विचार तर मी स्वप्नात देखील करू शकत नाही. "आईला राग आता अनावर होत होता. निर्वीची स्थिती सुद्धा सारखीच होती. आणि हे पाहून वहिनी पार घाबरून गेली होती.
"आणि मी तुला या गर्विष्ठ बाईच्या घरी नांदायला पाठवेन असा विचार तू आता स्वप्नातदेखील करू नकोस."
बाहेर पाहुण्यांसोबत स्वतःही झालेल्या प्रकाराबद्दल अलिप्त असलेल्या बाबांना आतली कुजबुज ऐकू येत होती.
" काही प्रॉब्लेम आहे का ?"सार्थकच्या बाबांनी प्रश्न केला. काय सुरु आहे ते पाहण्याकरता बाबा आत आले. घडला प्रकार आईने एका झटक्यात तिच्या शब्दांत वर्णन करून सांगून टाकला. बाबांसाठीही ही गोष्ट गोंधळात टाकण्यासारखीच होती . पण ती वेळ असे भांबावून जाण्याची नव्हती हे त्यांनी एका क्षणात हेरले आणि धीम्या आवाजात पण ठामपणे त्यांनी तिघींना बजावले,
" आता घडले ते घडले. त्यावर चर्चा करत बसण्याची ही वेळ नाही. बाहेर पाहुणे ताटकळत थांबून आहेत. आपल्या चुकीमुळे त्यांना असे सोडून इथे येणे मला ठीक वाटत नाही. मी बाहेर त्यांच्याकडे जातो. तुम्हीसुद्धा २ मिनिटांत मला तिथे हजर हव्या आहात. त्यांना आपण आमंत्रण दिले आहे तर कार्यक्रम करावाच लागेल. पुढचे पुढे बघू"आईचे बोलणे क्षणभरही ऐकून न घेता आणि इतर कुणाकडेही न पाहता बाबा तडक बाहेर निघून गेले.
"आपले तर या घरात कोणीच काही ऐकत नाही . बाईसाहेब, चला आता. घातलेला गोंधळ निस्तरायला तर हवा आता."आई दुःखी कष्टी होत उभी राहिली आणि नाराजी दाखवत हात झटकून त्यांच्या पाठोपाठ निघून गेली. वहिनी नेहमीप्रमाणे हात मुठीत धरून तशीच उभी होती. तिलाही काय करावे ते सुचत नव्हते. तिच्यामुळे झालेला गैरसमज आणि त्यामुळे उडालेला हा गोंधळ आता प्रकर्षाने तिला जाणवत होता. पण माफी मागण्याची सुद्धा आता सोया उरली नव्हती. आणि माफी मागायची तरी कुणाची हा सुद्धा एक प्रश्नच. "
अशा विचारांतच हरवून गेलेली असताना निर्वी मात्र पुन्हा एकदा चेहऱ्यावर हास्य पांघरून दरवाजाच्या दिशेने निघाली. तिच्यापाठोपाठ वाहिनी बाहेर आली.
निर्वीला पाहताच सार्थक पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडला. त्या पिवळ्या साडीमध्ये ती एखाद्या सोनपरीसारखी भासत होती त्याला. त्यानेच गिफ्ट केलेले नाजूक सोनेरी डूल मंद लयीत डुलत होते. त्याच्या आईच्या चेहऱ्यावर मात्र किंचित देखील कौतुक नव्हते. पण तरी त्यांनी निर्वीला जवळ बोलावून शेजारी बसवले. इकडची तिकडची चौकशी करत बराच वेळ होऊन गेला. खूप गप्पा झाल्या पण त्यांत देशमुखबाईंचा श्रीमंती आणि परदेशातून आलेला मुलगा या बद्दलची घमेंड प्रकर्षाने जाणवून येत होती. त्याचे वडील अधून मधून सर्व सांभाळण्याचा आव आणत परंतु या सर्वाचा बराच परिणाम निर्वीच्या आईबाबांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. आणि निर्वी -सार्थक ? त्यांना तर कशाचे भानच नव्हते. आणि या सर्वाची साक्ष बनून वहिनी तिथेच गुमान उभी होती.
बोलता बोलता मिस्टर देशमुखांनी विषय काढला ,
"खरेतर सार्थकसाठी कितीतरी उच्चशिक्षित , श्रीमंत मुलींची स्थळे गेला २ वर्षांपासून येत होती . दिसायला तर एकापेक्षा एक. तसा सार्थकसुद्धा कुठे कमी नाही ना? पण आम्हाला वाटले त्याला इतक्या लवकर लग्न करायचे नसेल म्हणून आम्ही कधी विषयच काढला नाही . पण गेल्या आठवड्यात इथे आल्यावर हा असा अचानक या दोघांच्या प्रकरणाबद्दल सांगू लागला तेव्हा तर आम्ही थक्क झालो . पण शेवटी आमच्यासाठी'त्याचा आनंद महत्त्वाचा ... आणि तुम्हीही बोलावून घेतले तेव्हा आज भेटण्याचा बेत आम्ही आखला. "
काहीसे चेहऱ्यावर हसू आणत निर्वीचे बाबा त्यांचे बोलणे ऐकत असतानाच देशमुख बाईंनी मध्येच नाक खुपसले.
" हो ना . अगदी धक्काच दिला हो याने तर आम्हांला . पण काय करणार? तशी तुमची निर्वी बरी आहे. आम्ही शोधलेल्या सर्वपरीने कितीतरी चांगल्या होत्या पण शेवटी ज्याची त्याची आवड, नाही का? आणि जर आता त्याचीच इच्छा असेल तर आम्हाला पुढे जायला हरकत वाटत नाही.आम्ही इतर सर्व विसरून आनंदाने या लग्नात सामील होऊ. फक्त लग्न आमच्या पद्धतीत मोठे थाटामाटात व्हावे अशी आम्हा दोघांचीही इच्छा. एकुलता एक मुलगा आहे हो हा आमचा . "
कार्यालयात साधी नोकरी करणारे निर्वीचे बाबा यावर निरुत्तरीत झाले . परंतू , निर्वीची आई मात्र शांत राहिली नाही .
"खरे आहे ताई तुमचे . तास धक्का तर आम्हांलाही आमच्या निर्विने दिला आहे. तुमचे सर्व रास्त असेलही पण निर्वीदेखील अजिबात कशात कमी नाही. आमच्या जातीमध्ये तर कितीतरी जण कधीपासूनच मागे लागलेत. एकापेक्षा एक... हिने पण अजून काही पाहिले नाही म्हणून तर हे सर्व इथवर पुढे गेले आहे . पण आम्ही तुमच्यासारखा लगेच निर्णय घेऊ शकत नाही . २ दिवसांत कळवू आम्ही .तुम्ही येऊ शकता आता . "गोदावरीबाईंच्या बोलण्यातली नाराजी त्या तिखट वाक्यातून सहज उमटत होती. निर्वीला मनातल्या मनात आईबद्दल राग येत होता . कारण सार्थकच्या प्रेमात आता ती पूर्णपणे विलीन झाली होती. सार्थकच्या आईबाबांसाठी अशाप्रकारचा नकार हा एक दुसरा धक्का होता . ते पुढे अधिक काळ न घालवता निरोप घेऊन तडक तिथून निघाले . हे असे काही होईल याची कल्पनाही सार्थकने केली नव्हती म्हणून तोही नाईलाजाने त्यांच्या पाठोपाठ निघून गेला. सर्व पाहुणे अशाप्रकारे निघून गेल्यावर निर्वीच्या आईला बोलण्यासाठी रान मोकळे झाले आणि ती पुन्हा पुन्हा निर्वी कशी चुकली हे सर्वांना सांगू लागली. बाबा तर अजूनही वेगळ्याच चिंतेत होते. निर्वीलाही आता राग अनावर होत होता . पण ती काही न बोलता तिच्या खोलीत रडत निघून गेली. आईच्या तोंडाचा पट्टा अजूनही सुरूच होता हे पाहून आतापर्यंत शांत असलेले बाबा कडाडले ,
" खूप झाले आता. विषय संपला आहे तेव्हा रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागा जरा ."आणि लगेच गोदावरीबाईंनी आपला मोर्चा वहिनीकडे वळवला.
"सुनबाई , ऐकलेस ना ? चला आता कामाला.हा सर्व जो गोंधळ आज घडला तो फक्त तुझ्यामुळे . नीट ऐकले नाही ...समजून घेतले नाहीस ... अर्धे अधिक काहीतरी ऐकून स्वप्नात गुंतवले आम्हांला आणि प्रत्यक्षात विचित्रच घडत होते मागे."खरेतर आईंच्या बोलण्यात चूक नाही हे सरितालाही चांगलेच ठाऊक होते आणि तिला या गोष्टीचे खूप वाईट वाटतही होते . तिची चूक केव्हाच तिच्या लक्षात आली होती. पण तरीही तिच्या मनात जे काहूर माजले होते ते फक्त आणि फक्त निर्वीच्या भविष्याला घेऊन . आज जेवताना सर्वांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न दिसत होता,
"आता पुढे काय ? "
No comments:
Post a Comment